बंद असलेली घरे हेरून दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना नेरूळ पोलिसांकडून अटक

नवी मुंबई : बंद असलेली घरे हेरून दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ देवशरण यादव (२४) व तौफिक हावसी शेख (२४) अशी या सराईत चोरट्यांची नावे असून या दोघांनी नेरूळ परिसरात सहा घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही चोरट्यांकडून तब्बल 8 लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात नेरूळ पोलिसाना यश आल्याची माहिती परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

या कारवाईत अटक करण्यात आलेले दोन्ही सराईत चोरटे हे वेगवेगळ्या भागात फिरून बंद असलेली घरे हेरत असत. त्यानंतर संधी साधून सदरचे घर फोडून यातील मिळेल तो ऐवज चोरून पलायन करत असत. नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत फेब्रुवारी ते सप्टेंबर या ८ महिन्याच्या कालावधीत अशाच प्रकारचे ६ घरफोडीचे गुन्हे घडले होते. यात तब्बल ३० तोळे वजनाचे दागिने चोरीला गेले होते. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर माध्यमातून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा माग घेण्यास सुरुवात केली होती. गत आठवड्यात हे चोरटे घरफोडी करण्यासाठी नेरूळ मधील शिरवणे गाव सेक्टर -१ परिसरामध्ये आल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले व त्यांच्या पथकाने सदर माहितीच्या आधारे शिरवणे परिसरामधून संशयितरित्या फिरणाऱ्या सौरभ देवशरण यादव (२४) व तौफिक हावसी शेख(२४) या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणी त्यांच्याजवळ घरफोडी करण्याचे साहित्य सापडले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नेरूळ भागात ६ घरफोड्या केल्याचे कबूल केले.

त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांनी या गुन्ह्यात चोरलेले ८ लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व लेनोव्हो कंपनीचा टॅब हस्तगत केला आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सराईत घरफोडी करणारे गुन्हेगार आहेत. यातील सौरभ यादव याच्याविरोधात मुंबईतील नवघर पोलीस ठाण्यात -२, कस्तुरबा पोलीस ठाणे-१, कळंबोली, एपीएमसी सीबीडी, कोपरखैरणे येथे प्रत्येकी १, सानपाडा पोलीस ठाणे- ५, त्याचप्रमाणे पुण्यातील सिंहगड रोड व फरासखाना पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कारची काच फोडून कारमधील तब्बल १८ लाख रुपयांची रोख रक्कम लुटून पलायन