पोलिसांनी टेंपो सह गुटख्याचा साठा जप्त करून टेम्पो चालकाला अटक

नवी मुंबई : लसूण असल्याचे भासवून गुजरात बडोदा येथून आयशर टेम्पोतून लपवून खोपोली येथे नेला जाणार तब्बल 51 लाख 36 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखुचा साठा पकडण्याची कामगिरी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 10 लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त करुन गुटखा वाहून नेणाऱ्या चालकाला अटक केली आहे. पोलीसांनी आता सदर गुटख्याची तस्करी करणाऱ्या शौकत व व्हॅगनार कार मधून पळून गेलेले चौघे या पाच जणांचा शोध सुरू केल्याची माहिती परिमंडळ -१ चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक गत शनिवारी पहाटे आपल्या हद्दीत गस्त घालत असताना सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास महापे एमआयडीसीतील सक्सेस लॉज समोरील सर्विस रोडवर लसणाने भरलेला एक पांढऱ्या व राखाडी रंगाचा आयशर टेम्पो संशयीतरित्या आढळून आला. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांनी संशयावरून सदर टेम्पोची तपासणी केली असता,त्यात लसणाच्या खाली तब्बल 51 लाख 36 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूने भरलेल्या गोण्या लपवून नेण्यात येत असल्याचे आढळुन आले.

 
त्यामुळे पोलिसांनी टेम्पो चालक सागर कमलेश गोहेल (३१) याच्याकडे सदर गुटख्याबाबत अधिक चौकशी केली असता, गुजरात बडोदा येथील शौकत याच्याकडून सदर गुटख्याचा साठा व्हॅगनार कार मधून त्याच्या टेंपो सोबत असलेल्या चौकडीच्या सांगण्यावरून खोपोली येथे पोहोचविण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ व्हॅगनार कारचा शोध घेतला असता, व्हॅगनार कार मधून त्याच्या टेंपो सोबत असलेले चौघे कारमधून पळू गेले. त्यामुळे पोलिसांनी टेंपो सह गुटख्याचा साठा जप्त करून टेम्पो चालकाला अटक केली आहे. पोलीसांनी आता सदर गुटख्याची तस्करी करणाऱ्या शौकत व व्हॅगनार कार मधून पळून गेलेले चौघे या पाच जणाविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानदे कायद्यासह इतर कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बंद असलेली घरे हेरून दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना नेरूळ पोलिसांकडून अटक