अनधिकृत इमारतींचे माहेरघर बनण्याच्या मार्गावर ‘नवी मुंबई'

नवी मुंबई ः नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामांचा धुमाकुळ सुरु आहे. यापैकी काही बांधकामांवर नवी मुंबई महापालिका द्वारे  नेहमीच कारवाईची मात्रा उगारली जाते. तर काहींवर काहीही कारवाई झाली नाही. परंतु, कारवाईचा बडगा उगारला गेलेली निम्मी अनधिकृत बांधकामे आज इमारतीत रुपांतरित झाली आहेत. निष्कासित न झालेल्या अनधिकृत इमारतींमध्ये गुण्यागोविंदाने लाखो कुटुंब वास्तव्यास गेली आहेत. या संदर्भातील अवैध बांधकामांचा नवी मुंबई महापालिकेचा अहवाल हाती सापडला आहे. दरम्यान, आजही निष्कासित केलेली अवैध बांधकामे पुन्हा जोरात चालू असल्याचे चित्र नवी मुंबई शहरात दिसत आहे. महापालिकेने जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ मध्ये आठही महापालिका विभाग कार्यालय परिसरातील सुरु असलेल्या विविध प्रकारच्या अनधिकृत बांधकामांच्या अहवालात ३२९ बांधकामे अवैध असल्याचे नमूद केले आहे. तर १८२ अनधिकृत बांधकामावर निष्कासित करण्याची कारवाई महापालिकेने केली असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर अवैध बांधकामे गावठाण, गावठाण विस्तार, सिडको भूखंडावर आणि नोड भागातील बैठ्या चाळींवर बांधकामे करण्यात आली होती. तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात आलेल्या चाळींवर देखील अवैध बांधकामे झाली आहेत.

दरम्यान, किती अवैध बांधकामावर कारवाई झाली नाही, याचीही माहिती महापालिकेने अहवालात स्पष्टपणे दिली आहे. परंतु, आजच्या घडीला कारवाई झालेली बांधकामे आणि कारवाईचा हत्यार न उगारलेली बांधकामे मागील नऊ महिन्याच्या कालावधीत पूर्णत्वास गेली आहेत.
१४० भूमाफिया भाग्यवान

अनधिकृत बांधकामांवर हातोडा न पडलेले १४० भूमाफिया सहिसलामत सुटले आहेत. त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले आहेत. दुसरीकडे बेकायदा बांधकामांवर कारवाई झालेल्या १८२ भूमाफियांना मात्र चारही बाजूने नुकसान सहन करावे लागले आहे. तर बेकायदा बांधकामांवर दुबार कारवाई झालेल्या ७ भूमाफियांचे मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु, अवैध बांधकामात अमाप पैसा प्राप्ती होते. त्यामुळे तोडक कारवाईचे भूमाफियांना काहीही वाटत नसल्याचे महापालिका सूत्र सांगतात.

आजही महापालिकेकडून विविध अवैध बांधकामावर मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई केली जात आहे. पण, सदर तोडक कारवाई होण्याच्या काही तासातच पुन्हा त्याच ठिकाणी ती बांधकामे पुन्हा सुरु होत आहेत. पुन्हा त्यावर कारवाई केली जात नाही. यामुळे कारवाई केलीच कशाला?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुन्हा बांधकाम २५ जुलै रोजी समर्थ नगर प्रवेशद्वारावर असलेली एक चार मजली इमारत नवी मुंबई महापालिका आणि सिडको कडून जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाचे कौतुक देखील केले गेले होते. परंतु हेच बांधकाम आता पुन्हा सुरू झाले आहे. वाशी, जुहूगाव सेक्टर-११ येथील खाडी किनाऱ्यावर असलेल्या मारुती मंदिर समोर असलेली इमारत देखील तोडली होती. सदर इमारत देखील आता बिनधास्तपणे नव्याने उभी राहत आहे.
आपण स्वतः नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे अवैध बांधकामांसंबंधी लेखी अहवाल मागितला होता. त्यानुसार महापालिकेने अहवाल मला दिला आहे. त्या नुसार आपण उच्च न्यायालय मुंबईत जनहित याचिका दाखल केली आहे. - मंगेश म्हात्रे, याचिकाकर्ते -नवी मुंबई.

२०२१ मधील अवैध बांधकामाची माहिती
बेलापूर विभाग
एकूण अनधिकृत बांधकामे - २९
तोडक कारवाई ः पहिल्यांदा...१२, दुसऱ्यांदा...२, कारवाई नाही...१५

नेरुळ विभाग
एकूण अनधिकृत बांधकामे - ५०
तोडक कारवाई ः पहिल्यांदा...९, कारवाई नाही...४१

तुर्भे विभाग
एकूण अनधिकृत बांधकामे - १३
तोडक कारवाई ः पहिल्यांदा...१३
वाशी विभाग
एकूण अनधिकृत बांधकामे - १९
तोडक कारवाई ः पहिल्यांदा...७, कारवाई नाही...१२
ऐरोली विभाग
एकूण अनधिकृत बांधकामे - ४६
तोडक कारवाई ः पहिल्यांदा ...३५, दुसऱ्यांदा ...३, कारवाई नाही...८
कोपरखैरणे विभाग
एकूण अनधिकृत बांधकामे ५०
तोडक कारवाई ः पहिल्यांदा...४९, दुसऱ्यांदा ... २, कारवाई नाही...७
घणसोली विभाग
एकूण अनधिकृत बांधकामे..११४
तोडक कारवाई ः पहिल्यांदा ...५७, कारवाई नाही...५७ 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पोलिसांनी टेंपो सह गुटख्याचा साठा जप्त करून टेम्पो चालकाला अटक