रबाळे एमआयडीसीतील भूखंड धारकाने विनापरवाना वृक्षतोड करुन वृक्षतोड अधिकृत असल्याचे भासवले

वाशी ः नवी मुंबई शहरातील रबाळे एमआयडीसी मधील पीएपीआर ६१८ या भूखंड धारकाने विनापरवाना वृक्षतोड करुन वृक्षतोड अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी तोडलेली काही झाडे बाजूलाच प्रत्यारोपण केली आहेत. मात्र, सदर भूखंड धारकास वृक्षतोड बाबत कुठलीही परवानगी एमआयडीसी प्रशासनाने दिली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे विनापरवाना वृक्षतोड केल्या प्रकरणी संबधित भूखंडधारकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नागरी क्षेत्रातील अवैध वृक्षतोडीला आळा घालण्याचे अधिकार महाराष्ट्र नागरी वृक्ष संवर्धन जतन कायद्याअंतर्गत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि महामंडळाना आहेत. नवी मुंबई शहरात सध्या तीन मोठी प्राधिकरणे कार्यरत आहेत. त्यात सिडको, नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी आदी तिन्ही प्राधिकरणे आपआपल्या जागेत वृक्षतोड बाबत कारवाई आणि परवानगी देते. एमआयडीसी भागात २०१६ पर्यत नवी मुंबई महापालिका वृक्षतोडीला परवानगी देत होती. मात्र, २०१६ नंतर एमआयडीसी प्रशासनाने आपले स्वतंत्र वृक्ष प्राधिकरण स्थापन केले. परंतु, एमआयडीसी भागात स्वतंत्र वृक्ष प्राधिकरण असून देखील या भागात बेसुमार अवैध वृक्षतोडीचे सत्र सुरु आहे.

रबाळे एमआयडीसी मधील पीएपी आर ६१८ या भूखंड धारकाने मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात विना परवाना वृक्षतोड केली आहे. सदर वृक्षतोड अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी तोडलेली काही झाडे बाजूलाच ‘महावितरण'च्या आरक्षित भूखंडावर प्रत्यारोपण केली आहेत. मात्र, सदर भूखंड धारकास वृक्षतोड बाबत एमआयडीसी प्रशासनाने कुठलीही परवानगी दिली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे विनापरवाना वृक्षतोड केल्या प्रकरणी संबधित भूखंडधारकावर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

२०१८ साली रबाळे एमआयडीसी मधील पीएपी आर ६१८ या भूखंडावर भराव टाकताना डेब्रिज वाहतूक करणाऱ्या ठेकेदारामार्फत वृक्षांवर भराव टाकून वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. तर आता याच ठिकाणी पुन्हा एकदा विनापरवाना वृक्षतोड केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने सबंधित भूखंड धारकावर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. - नारायण पाटील, समाजसेवक - गोठिवली गाव, नवी मुंबई.


रबाळे एमआयडीसी मध्ये वृक्षतोड झालेल्या ठिकाणी एमआयडीसी अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. - राजाराम राठोड, वृक्ष अधिकारी तथा कार्यकारी अभियंता - एमआयडीसी, महापे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अनधिकृत इमारतींचे माहेरघर बनण्याच्या मार्गावर ‘नवी मुंबई'