बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणाची दोघा भामट्यांनी केली फसवणूक

नवी मुंबई  : बँकेत पैसे डिपॉजिट करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्या जवळची 80 हजाराची रक्कम ए टी एम मध्ये डिपॉजिट केल्याचे भासवून सदर रक्कमेपैकी 79 हजार रुपये हातचलखी करून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सानपाडा पोलिसांनी या प्रकरणातील दोघा भामट्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेला आसिफ दिलशाद खान (30) हा जुईनगर सेक्टर -23 मध्ये राहण्यास असून त्याचे आई-वडील, बहिण-भाऊ मुळ गावी उत्तर प्रदेश येथे राहण्यास आहेत. आसिफच्या बहिणीचे येत्या 22 डिसेंबर रोजी लग्न असल्याने बहिणीच्या लग्नासाठी त्याने 80 हजार रुपये जमा केले होते. सदरची रक्कम गावी पाठवण्यासाठी आसिफ गत मंगळवारी सकाळी 10 वाजता सानपाडा सेक्टर -16 मधील बँक ऑफ इंडिया मध्ये गेला होता. आसिफ बँकेमध्ये पैसे डिपॉजिट करण्यासाठी स्लिप भरत असताना त्याच्या जवळ आलेल्या दोघा भामट्यांनी ए टी एम मध्ये पैसे लवकर डिपॉजिट होतात, असे त्याला सांगितले.

मात्र, ए टी एम मध्ये पैसे डिपॉजिट करता येत नसल्याचे आसिफने सांगितल्यानंतर दोघा भामट्यांनी त्याला पैसे डिपॉजिट करण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे आसिफ त्यांच्यासोबत बँक ऑफ इंडियाच्या ए टी एम मध्ये गेला. त्यानंतर आसिफने 80 हजाराची रक्कम आणि गावाकडील भावाचा बँक खाते नंबर दोघा भामट्यांना दिल्यानंतर त्यांनी आसिफच्या भावाच्या बँक खात्यात 80 हजाराची रक्कम ए टी एम द्वारे डिपॉजिट केल्याचे भासवून सदर रक्कमेपैकी 79 हजार रुपये हातचलाखीने चोरले. तसेच त्यातील 500 च्या दोन नोटा परत आल्याचे दाखवून त्या नोटा आसिफला दिल्या.

त्यावेळी आसिफने पैसे डिपॉजिट झाल्याची स्लीप त्यांच्याकडे मागितली असता त्यांनी मशीन मधून कधी-कधी स्लीप येत नाही, असे सांगून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे समाधान न झाल्याने तो बँकेतील अधिका-याना त्याबाबत विचारण्यासाठी गेला. याच दरम्यान दोघा भामट्यांनी त्या ठिकाणावरून पलायन केले. बँकेच्या अधिकात्याने आसिफसोबत ए टी एम मध्ये जाऊन तपासणी केली असता, त्याच्या भावाच्या खात्यात पैसे डिपॉजिट झाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोघा भामट्यांनी फसवणूक करून त्याची 79 हजार रुपयांची रक्कम हातचलाकी करून नेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

रबाळे एमआयडीसीतील भूखंड धारकाने विनापरवाना वृक्षतोड करुन वृक्षतोड अधिकृत असल्याचे भासवले