अनधिकृत वीजवापर करणाऱ्या २२ जणांविरुद्ध धडक कारवाई

नवी मुंबई : महावितरणच्या वाशी उपविभागातील कर्मचाऱ्यांच्या नियमित घेणात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत तब्बल २ हजार १३१ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करून वीज चोरांविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात आली. या कारवाईत

वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार वीजचोरी करणाऱ्या ३४ तर कलम १२६ अन्वये अनधिकृत वीजवापर करणाऱ्या २२ जणांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली.

वीजचोरीला प्रतिबंध व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार अचूक वीजबिल या उद्देशाने तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आखलेल्या या मोहिमेत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता.

वाशी विभागाचे  कार्यकारी  अभियंता शामकांत बोरसे  यांच्या व  वाशी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी  अभियंता रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  वीजहानी कमी करण्याकरिता कारवाई  करण्यात आली. 

वीजचोरी आढळलेल्या ठिकाणी वीजचोरीचे अनुमानित देयक व तडजोडीची रक्कम भरण्याची नोटिस बजावण्यात येत आहे. या रकमेचा मुदतीत भरणा न करणाऱ्यांविरुद्ध कलम १३५ नुसार गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. तर अनधिकृत वीजवापर प्रकरणी कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणतीही युक्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये; अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

वाशी उपविभागात कार्यरत अधिकारी सचिन फुलझेले, जयेश गायकर, लक्ष्मण खामकर, पवन राऊत, संजय मुंडे व श्रद्धा भोजकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक मोहिमेमुळे वीजचोरी करणाऱ्या वीज ग्राहकांमध्ये दहशत निर्माण झाली असून महावितरण कंपनीमार्फत वीजचोरी करणाऱ्या वीज ग्राहकांकडून ११६६५४ युनिटची  वसुली करण्यात आली आहे.

वीजचोरी मोहीम यापुढे ही जोमाने घेण्यात येईल व वीजचोरी कमी करण्याच्या दृष्टीने कार्यरत राहू, असा निश्चय महावितरण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणाची दोघा भामट्यांनी केली फसवणूक