लोकलमधील प्रवाशांचे मोबाईल फोन खेचणारे दोन लुटारु जेरबंद 

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशाच्या हातातील मोबाईल फोन खेचणाऱया झेऊल इसुफ मोमीन हॉक (19) व सुबराती साकिर अली (31) या दोन लुटारुंना वाशी रेल्वे पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच गुफ्त बातमीदाराच्या माध्यमातून शोध घेऊन अटक केली आहे. तसेच त्यांनी लुटलेले दोन्ही मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.  

यातील आरोपी झेऊल इसुफ हा घणसोलीत राहण्यास असून गत 27 नोव्हेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने ठाणे लोकलमध्ये चढुन कळवा येथे राहणाऱया मंगेश शिंदे (50) यांच्या हातातील 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन खेचला होता. त्यानंतर त्याने धावत्या लोकलमधून फलाटावर उडी टाकुन पलायन केले होते. या प्रकरणात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा खास बातमीदारच्या मदतीने शोध घेऊन त्याला गोठीवली गावाजवळ संशयितरित्या फिरताना अटक केली. तसेच त्याने लुटलेला मोबाईल फोन त्याच्याकडुन हस्तगत केला.  

तर पावणे गाव येथे राहणारा आरोपी सुबराती साकिर अली (31) याने गत 9 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास तुर्भे रेल्वे स्थानकात लोकलची वाट पहात मोबाईलवर बोलत उभ्या असलेल्या गोवंडी येथे राहणाऱया नसरीनबानो सय्यद (40) या महिलेच्या हातील मोबाईल फोन खेचुन पलायन केले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी सायबर सेल मार्फत मोबाईल लोकेशनवरुन आरोपीचा शोध सुरु केला होता. यावेळी सदर मोबाईलचे लोकेशन मुंबई असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने पनवेल येथील लोकेशनवर जाऊन मोबाईल फोन वापरणा-याला ताब्यात घेतले.  

त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे असलेला मोबाईल फोन जफ्त करुन त्याची अधिक चौकशी केली असता, मोबाईल फोन खेचणारा आरोपी हा त्याचा चुलत भाऊ असल्याचे तसेच तो तुर्भे येथे राहत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तुर्भे भागात सुबराती साकिर अली याचा शोध घेऊन त्याला अटक केली. वाशी रेल्वे पोलिसांनी दोन्ही गुह्यांचा तांत्रिक तपास व गुफ्त बातमीदाराच्या मार्फत शोध घेऊन दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच दोन्ही गुह्यात आरोपींना अटक करुन त्यांनी लुटलेले मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अनधिकृत वीजवापर करणाऱ्या २२ जणांविरुद्ध धडक कारवाई