४० लाख रुपयांच्या दागिन्यांच्या लुट प्रकरणातील फरार आरोपी अटकेत
नवी मुंबई : तब्बल ४० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने कोपरखैरणे येथून अटक केली आहे. मिनू उर्फ अलाउद्दीन नेसू मोहम्मद शेख (४०) असे या आरोपीचे नाव असून मागील ४ वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
या प्रकरणातील अटक आरोपी मिनू व त्याच्या ८ साथिदारांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये नेरुळ भागात राहणारा अनिल सेमलानी या सोनारावर मुंबईतील झवेरी बाजारातून पाळत ठेवून नेरुळ रेल्वे स्थानकात त्याच्या जवळ असलेले ४० लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन पलायन केले होते. त्यावेळी झालेल्या झटापटीत मोहम्मद रियासत नसीर (२५) हा लुटारु खाली पडल्यानंतर अनिल सेमलानी याने आरडा- ओरड केली होती. त्यानंतर त्या भागात असलेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मोहम्मद रियासत याला पकडले होते. त्यानंतर नेरुळ पोलिसांनी अधिक तपास करुन या गुन्ह्यात खुर्शीद मोहम्मद अस्लम शेख (२९), अल्ताफ उर्फ मेहताब अब्बास शेख (३९), अब्दुल सलीम उर्फ सोनु हकीम खान (३२), शरीफ असलम शेख (३३) व मलिक उस्मान गणी शेख (३६) या सहा आरोपींना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून १३ लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले होते.
दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी मिनू शेख हा त्यावेळी त्याच्या मुळगावी पश्चिम बंगाल येथे पळुन गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी तपास पथक पश्चिम बंगाल येथे गेले होते. त्याचप्रमाणे मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी या भागात देखील पोलिसांनी त्याचा शोध घेतला होता. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. सदर आरोपी हा कोपरखैरणे भागात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-२ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील व त्यांच्या पथकाने शनिवारी दुपारी कोपरखैरणेतील तीन टाकी परिसरात त्याच्यावर पाळत ठेवुन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता, नेरुळ येथील सोनाराच्या लुट प्रकरणात तो सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हे शाखेने आरोपी मिनू याला पुढील कार्यवाहीसाठी नेरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले.