दिशाभुल करुन एटीएममधून पैसे काढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या भामट्याला अटक

नवी मुंबई : एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची दिशाभुल करुन त्याच्या एटीएम कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या भामट्याला रबळे पोलिसांनी पकडल्याची घटना ऐरोलीमध्ये घडली. वरींदर बीलबहादुर कौशल (४२) असे या भामट्याचे नाव असून रबाळे पोलिसांनी त्याच्यावर फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार संजयकुमार मिश्रा (४३) हे नेरुळमध्ये राहण्यास असुन ते माळीकाम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. गत गुरुवारी सायंकाळी संजयकुमार हे रबाळे येथे कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांना पैशांची गरज भासल्याने ते ऐरोली सेक्टर-६ मधील एक्सिस बँकेच्या एटीमएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी संजयकुमार हे एटीएममधुन पैसे काढत असताना, भामटा वरींदर कौशल याने त्यांना चुकिचे बटन दाबत असल्याचे सांगितले. तसेच त्यांना मदत करत असल्याचे भासवून संजयकुमार यांच्या एटीएमकार्डचा पिन नंबर दाबण्याचा बहाणा करुन त्यांच्या एटीएम कार्डचा पिन नंबर माहित करुन घेतला.

त्यानंतर त्याने एटीएम मशीन मधुन संजयकुमार यांचे कार्ड हलवुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत सदर एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकल्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने एटीएममध्ये अडकलेले कार्ड काढण्यासाठी संजयकुमार यांना बँकेत जाऊन वॉचमनला बोलावुन आणण्यास सांगितले. त्यामुळे संजयकुमार बाजुलाच असलेल्या बँकेत गेले असताना भामट्या वरींदर कौशल याने संजयकुमारच्या एटीएम कार्डचा वापर करुन त्यांच्या खात्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी असलेल्या साध्या वेशातील पोलिसांना वरींदर कौशल हा एटीएममध्ये संशयास्पद हालचाली करताना निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याला बुलेटवरुन पळून जाताना नागरिकांच्या मदतीने पकडले..

यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड सापडले. यावरुन भामटा वरींदर कौशल हा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींची फसवणुक करुन त्यांच्या बँकेतील पैसे काढुन घेत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या भामट्याने अशाच पद्धतीने अनेक एटीएम कार्ड धारकांची फसवणुक केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडुन या भामट्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बंगाली व्यक्तीच्या डोक्यावर फरशी मारुन त्याची हत्या