उत्तरप्रदेश प्रमाणे नवी मुंबईत सुध्दा गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर  

नवी मुंबई : खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी धमकावणे, अपहरण, बलात्कार या सारख्या गंभीर गुह्यातील आरोपी कुख्यात गुंड विकी देशमुख व त्याच्या टोळीने पनवेल, उरण व उलवे परिसरात दहशत निर्माण करुन आपले साम्राज उभे केले होते. विकी देशमुख व त्याच्या टोळीचे हेच साम्राज्य खालसा करण्यासाठी तसेच परिसरातील त्याची दहशत कायमची कमी करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी सकाळी गव्हाणगावात विकी देशमुख याने आपल्या घराभोवतालच्या हडप केलेल्या जागेवरील अतिक्रमणावर सिडकोच्या मदतीने बुलडोझर चालवुन जमीनदोस्त केले. दरम्यान उत्तरप्रदेश प्रमाणेच नवी मुंबई पोलिसांनी देखील गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी त्यांच्या घरावर बुलडोझर चालविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल व उरण भागात ग्न्हेगारी कारवाया करणा-या गुन्हेगारांचे  धाबे दणाणले आहेत.  

कुख्यात गुंड विकी देशमुख व त्याच्या टोळीच्या कारवायात वाढ झाल्याने नवी मुंबई  पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवुन अखेर गोवा येथून त्याला अटक केली आहे. विकी देशमुखच्या अटकेनंतर नवी मुंबई पोलिसांनी विकी देशमुख व त्याच्या टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. विकी देशमुख व त्याच्या टोळीतील सदस्यांच्या दहशतीमुळे त्याच्या विरोधात कुणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे विकी देशमुख याने गव्हाण गावामध्ये मोठया प्रमाणात साम्राज्य निर्माण केले होते. या साम्राज्यावर नवी मुंबई पोलिसांची नजर पडली होती. विकी देशमुख याने धमकावून आपल्या घराभोवती मोठया प्रमाणात जागा बळकावली होती. हिच जागा मोकळी करण्यासाठी तेथील अतिक्रमण पाडण्यात यावे असे पत्र गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी आपल्या बदलीपूर्वी सिडकोला दिले होते.  

त्यानुसार विकी देशमुख याने गव्हाण गावात आपल्या घराभोवताली कंपाऊंड वॉल टाकुन बळकावलेली जागा मोकळी करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी सकाळी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकासह सदर अतिक्रमणावर बुलडोझर चालवुन विकी देशमुख याच्या साम्राज्याला सुरुंग लावला आहे. विकी देशमुख याने आपल्या घराभोवतालची मोठी जागा बळकावून भिंत घातली होती. तसेच घराभोवती कोणाची हालचाल झाल्यास याची तत्काळ माहिती मिळावी यासाठी त्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. विकी देशमुख व त्याच्या टोळीच्या दहशतीमुळे आजवर या अतिक्रमणाची तक्रार करण्यात आली नव्हती.  

अखेर गुरुवारी सकाळी परिमंडळ-2चे नवनियुक्त पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचे सहाय्यक नियंत्रक अतिक्रमण अधिकारी प्रताप नलावडे, पोर्ट विभागाचे सहाय्यक आयुक्त क्षीरसागर, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भटे, गुन्हे शाखा मध्यवर्ती युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले, ग्न्हे शाखा युनिट-2चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील. सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्यासह 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 43 पोलीस कर्मचारी, सिडकेचे 25 कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

प्रेमसंबधात अडथळा ठरणा-या पतीचा पत्नीनेच काढला प्रियकराच्या मदतीने काटा