२ आरोपी अटकेत इतर फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

घणसोली टोळी युद्ध : दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हे दाखल 

नवी मुंबई : घणसोली सेक्टर-४ मध्ये शनिवारी सायंकाळी गर्दुल्ल्यांच्या दोन गटांमध्ये लाठ्या-काठ्या व बेस बॉल बॅट, चाकु व इतर हत्यारासह तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एक तरुण ठार झाला असून दोन्ही गटातील ४ जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री दोन्ही गटातील २ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आता इतर फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे. घणसोलीत दोन गटामध्ये झालेल्या या हाणामारीच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घणसोलीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तळोजा व गोवंडी शिवाजी नगर, मुंब्रा शिळफाटा भागातील काही गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. हे गर्दुल्ले परिसरात नशा करण्याबरोबरच चोऱ्या माऱ्या करत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या गर्दुल्यांच्या आपसातील वादामुळे त्यांच्यात दोन गट निर्माण झाले आहेत. आपसातील वादातून काही दिवसांपुर्वी रुहान शेख, मोहम्मद कैफ व सलमान खान यांनी दुसऱ्या गटातील नितिन उर्फ बंटी याला मारहाण केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन त्याचा बदला घेण्यासाठी घणसोली गावात राहणाऱ्या साबिर शहा उर्फ राजु नसिर शहा (३५) याने शिळफाटा येथे राहणारा त्याचा साथीदार नसिर इम्तीयाज शेख (३०) व इतर चार जणांसह मोहम्मद अली रुहान शेख व त्याच्या साथिदारांचा शोध सुरु केला होता. शनिवारी सायंकाळी रुहान शेख व त्याचे साथीदार घणसोली सेक्टर-४ मधील बालाजी दर्शन सोसायटी समोर दिसल्यानंतर राजु शहा व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर त्या दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर लाठ्या काठ्या, बेस बॉल बॅट व चाकुच्या सहाय्याने हल्ले केले. यावेळी मोहम्मद कैफ, सलमान खान व त्याच्या साथीदारांनी राजु शहा याच्यासह त्याचा मित्र सलिम इम्तियाज शेख, हृदयातउल्ला शरीफ शेख, बाबा यांना लाकडी दांडे व बेस बॉलच्या बॅटने मारहाण केली. यावेळी त्यांनी नसिर इम्तियाज शेख उर्फ पुत्ती याच्या छातीमध्ये चाकुने भोसकुन त्याची हत्या केली. त्यानंतर राजु शहा व त्याच्या मित्रांनी विरोधी गटातील तरुणांवर हल्ला चढवला.

या घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मृताना रुग्णालयात पाठवुन दिले आहे. या घटनेतील गंभीर जखमी मोहम्मद अली रुहान शेख याच्यावर सायन हॉस्पीटलमध्ये तर सलमान गुलाब हुसेन खान याच्यावर महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच दुसऱ्या गटातील हदायतउल्ला शेख उर्फ सोनु व सलिम शेख दोघांवर रबाळे येथील सदगुरु हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींवर हत्या, प्राणघातक हल्ला करणे, दंगल माजवणे आदी कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. तसेच रात्रीच या आरोपींची धरपकड करुन मोहम्मद हनिफ कैफ (२१) व साबिर शहा उर्फ राजु नसिर शहा (३५) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आता फरार झालेल्या सलमान गुलाब हुसेन खान व इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे. चौकट

घणसोली परिसरामध्ये मागील काही महिन्यांपासून गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. या गर्दुल्यांचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडुन करण्यात येत होती. मात्र पोलिसांनी या गर्दुल्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची दहशत वाढली होती. या गर्दुल्यांची दहशत रोखण्यात पोलिसांना अपयश आल्यामुळेच सदरची घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडुन करण्यात येत आहे. घणसोलीत वावरणाऱ्या या गर्दुल्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिक रहिवाशांकडुन करण्यात येत आहे.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पोलिस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखूवन केले लैंगीक अत्याचार