2 लाखाची लाच स्विकारणा-या अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी खाजगी व्यक्तीसह एसीबीच्या जाळ्यात

नवी मुंबई अँन्टी करप्शनची धडक कारवाई  

नवी मुंबई : वडिलोपार्जित आईकडून बक्षीसपत्र स्वरुपात मिळालेल्या जमीनीच्या सातबा-यावर मुलाच्या नावाची नोंद करण्यासाठी तसेच याबाबत असलेल्या अपीलावर तक्रारदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी खाजगी व्यक्तीच्या माध्यमातुन 2 लाख रुपयांची लाच स्विकारणा-या अलिबाग येथील तहसीलदार मीनल दळवी यांना तसेच खाजगी व्यक्ती राकेश चव्हाण या दोघांना नवी मुंबई अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर तहसीलदार मीनल दळवी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवु लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

या प्रकरणातील तक्रारदारांच्या सास-यांना त्यांच्या आईने वडीलोपर्जींत असलेली जागा बक्षीसपात्राने दिली होती. त्यामुळे त्यांच्या नावाची नोंद सातबा-यावर करण्यासाठी तक्रारदाराच्या सास-यांनी अलिबाग येथील तहसील कार्यालयात अर्ज केला होता. मात्र याला सास-याच्या भावाने विरोध करुन अपील दाखल केले होते. या अपीलावर तक्रारदाराच्या सासऱ्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी तसेच सातबा-यावर सास-यांची नोंद करण्यासाठी अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांनी खाजगी व्यक्ती राकेश चव्हाण याच्या मार्फत 3 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने नवी मुंबई ऍन्टी करफ्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.  

सदर तक्रारीच्या अनुषंगाने अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने याबाबत खातरजमा केली असता, तहसीलदार मीनल दवळी यांनी स्वत: तक्रारदाराकडे तडजोडीअंती 2 लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच लाचेची रक्कम खाजगी व्यक्ती राकेश चव्हाण याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार नवी मुंबई ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या पोलीस उपअधिक्षक ज्योती देशमुख व पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी अलिबाग एसटी स्टँड जवळ सापळा लावला होता. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास राकेश चव्हाण याने तहसीलदार मीनल दळवी यांच्यावतीने तक्रारदाराकडून 2 लाख रुपयांची लाच स्विकारल्यानंतर अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.  

त्यानंतर ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या पथकाने अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांना या प्रकरणात ताब्यात घेतले असता, त्यांनी उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्याने त्यांना अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत ऍन्टी करफ्शन ब्युरोच्यावतीने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

२ आरोपी अटकेत इतर फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु