मनसेच्या पनवेल उपशहर अध्यक्षाला हॉकीस्टीकने मारहाण

मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्ष मनोज कोठारी यांना व त्याच्या तीघा सहका-यांना मारहाण केल्याची घटना उघडकीस

नवी मुंबई : मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्ष मनोज कोठारी यांना  मिलींद खाडे व त्याच्या तीघा सहकाऱयांनी हॉकीस्टीक व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत मनोज कोठारी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कामोठे पोलिसांनी या प्रकरणात मिलींद खाडे व त्याच्या तीन सहकाऱयांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

या मारहाणीत जखमी झालेले मनोज कोठारी हे कामोठे परिसरात राहण्यास असून त्यांचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. कोठारी यांना तीन महिन्यापुर्वी महाराष्ट्र नवर्निमाण सेना पनवेल उपशहर अध्यक्ष हे पद मिळाले आहे. त्यानंतर कोठारी यांनी पक्ष वाढीसाठी कामाला सुरुवात केली होती. दिवाळी निमित्त कामोठेत मनसेच्या वतीने किल्ल्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या असून या कामात असलेल्या कार्यकर्त्यांना जेवण आणण्यासाठी मनोज कोठारी हे  गुरुवारी पहाटे 3 च्या सुमारास आपल्या मित्रांसह बी.के.धाबा येथे गाडीने गेले होते. त्याठिकाणी मिलींद खाडे हा त्याच्या तीन मित्रांसह गफ्पा मारत उभा होता.  

यावेळी मिलींद खाडे सोबत असलेल्या एकाने कोठारी यांच्याकडे विचारपुस केली. त्यानंतर मिलींद खाडे हा त्यांच्या अंगावर धावुन गेला. यावेळी कोठारीचा मित्र प्रशांत धनावडे याने मिलींद खाडे व त्याच्या मित्रांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, मिलिंद खाडे व त्याच्या तीन मित्रांनी गाडीमध्ये असलेले हॉकीस्टीक काढुन त्यांनी मनोज कोठारी व प्रशांत धनावडे या दोघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर चौघांनी त्याठिकाणावरुन पलायन केले. या मारहाणीत जखमी झालेल्या मनोज कोठारी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. आपल्याला मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्षपद मिळाल्याने मिलींद खाडे याला राग आल्याने त्याने मारहाण केल्याचे मनोज कोठारी यांनी सांगितले. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

संवादाच्या अभावामुळे सेक्सटॉर्शन सारख्या गुन्ह्यात वाढ