एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये चोरटयाला पकडले राजा श्वानाने

नवी मुंबई : एपीएमसीच्या फळ मार्केटमधील खरेदीदाराची रोख रक्कम व मोबाईल फोन चोरुन पळणा-या त्रिकुटापैकी एका चोरटयाला फळ मार्केटमधील राजा नामक भटक्या श्वानाने पकडण्याची कामगीरी केली आहे. राजा हा कुत्रा एपीएमसी मार्केटच्या फळ मार्केटमधील सुरक्षा रक्षकांना मदत करुन एकप्रकारे सुरक्षारक्षकाची भूमिका बजावत असल्याने या श्वानाचे कौतुक होत आहे.  

एपीएमसी मार्केटमध्ये वावरणा-या चोरटयानी गत आठवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास फळ मार्केटमध्ये फळांची खरेदी करण्यासाठी पुण्याहुन आलेल्या व मध्यरात्रीच्या सुमारास जे-विंग जवळ झोपी गेलेल्या खरेदीदाराचा खिसा कापुन त्यांच्या खिशातील 30 हजाराची रोख रक्कम व मोबाईल फोन चोरला होता. हा प्रकार एपीएमसी मार्केटमधील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ या चोरटयाना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघे चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर तिसरा चोरटा भाजी मार्केटच्या दिशेने पळून जात असताना, तेथील सुरक्षारक्षकांसोबत असलेल्या राजा या भटक्या श्वानाने सदर चोरटयाचा पाठलाग करुन त्याला पकडले.  

त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या चोरटयाची झडती घेतली असता, त्याच्याजवळ खरेदीदाराकडुन चोरलेली रोख रक्कम व मोबाईल फोन सापडले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी सदर चोरटयाला एपीएमसी पोलिसांच्या स्वाधीन केले. राजा या भटक्या श्वानामुळे एक चोरटा जेरबंद झाल्याने राजाने केलेल्या कामगीरचे मार्केटमधील व्यापा-यांकडुन कौतुक होत आहे. राजा हा भटका श्वान असला तरी तो सुरक्षारक्षकांप्रमाणे रात्री 10 वाजता सुरक्षारक्षकांसोबत फळ मार्केटमध्ये दाखल होत असल्याचे वसुरक्षारक्षकांसोबत त्यांच्या रिक्षातुन मार्केटमध्ये गस्त घालत असल्याचे सुरक्षा अधिकारी संजय तळेकर यांनी सांगिलते. राजाला आम्ही दररोज खाण्यासाठी देत असल्याने मागील 7 वर्षापासुन आमच्या सोबत राहुन तो आम्हाला मदत करत असल्याचेही तळेकर यांनी सांगिलते.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मनसेच्या पनवेल उपशहर अध्यक्षाला हॉकीस्टीकने मारहाण