दोघा बांधकाम व्यवसायीकांच्या छळवणुकीमुळे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

नवी मुंबई : बांधकाम साहित्याचा पुरवठा करणा-या दीपक मारुती काटबु (40) याने मुंब्रा येथील दोघा बांधकाम व्यवसायीकांच्या छळवणुकीमुळे पनवेल मधील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मृत दीपक काटबू याने आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या मोबाईलवरुन काढलेल्या व्हिडीओवरुन हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी अब्दुल मुकीम अब्दुल रहमान अन्सारी (बबलू) व वसीम या दोन बांधकाम व्यावसायीकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

या घटनेतील मृत दीपक काटबु हा दहीसर मोरी परिसरात कुटुंबियासोबत राहत होता. तसेच तो बिल्डींग मटेरीयल सफ्लायचा व्यवसाय करत होता. शिळफाटा येथील मुनीर कंपाऊंपमध्ये अब्दुल मुकीम अब्दुल रहमान अन्सारी (बबलू) आणि वसीम या दोघांनी गेल्या काही महिन्यापासून बेकायदा इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली होती. याच बांधकाम साईटवर दीपक काटबु हा गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम साहित्याचा पुरवठा करत होता. बांधकाम व्यावसायीकाकडुन दीपकला 17 लाखांपेक्षा जास्त रक्कम येणे बाकी होते. मात्र बांधकाम व्यावसायीकाकडुन त्याला पुरवठा केलेल्या मालाचे पैसे देण्यात येत नव्हते. त्यामुळे दीपक त्यांना वारंवार संपर्क करत होता. मात्र बांधकाम व्यावसायीक बबलु आणि वसीम या दोघांनी त्याचे फोन घेणे बंद केले होते.  

देणेकरी दीपककडे पैसे मागत असल्याने मागील काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली आला होता. त्यामुळे अस्वस्थ झालेला दीपक गत 10 ऑक्टोबर रोजी घरातून निघून गेला होता. यादरम्यान पनवेल मधील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या दीपकने हॉटेलमधील रुमवर गळफास घेऊन आत्महत्या केली. पनवेल शहर पोलिसांनी त्यावेळी आकस्मात मृत्यूची नोंद करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला असतानाच मृत दीपक काटबु याने मृत्यूपुर्वी आपल्या मोबाईल फोनवर व्हिडीओ काढल्याचे त्याच्या कुटुंबियाच्या  निदर्शनास आले. सदर व्हिडीओमध्ये दीपकने बांधकाम व्यावसायीक अब्दुल मुकीम अब्दुल रहमान अन्सारी (बबलू) आणि वसीम या दोघांनी त्याला बांधकाम साहित्य पुरवठा केलेल्या मालाचे 17 लाख रुपये न दिल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.  

त्यानंतर दीपक काटबु याच्या कुटुंबियांनी गत आठवडÎात पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दीपकने आत्महत्येपुर्वी काढलेला व्हिडीओ सादर करुन बांधकाम व्यावसायीक अब्दुल मुकीम अब्दुल रहमान अन्सारी (बबलू) आणि वसीम या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, बबलु आणि वसीम या दोघांना अटक करुन त्यांनी बेकायदेशीरपणे उभारलेली इमारत तातडीने पाडण्यात यावी तसेच मृत दीपकची थकबाकी त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी मृत दीपकच्या कुटुंबीयांनी केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये चोरटयाला पकडले राजा श्वानाने