घणसोलीत महिलेने केली स्वत:च्या दोन्ही मुलांची हत्या 

नवी मुंबई : घणसोलीतील चिंचआळीमध्ये राहणा-या पुष्पा वेणाराम गुर्जर (32) या महिलेने आपल्या दोन लहान मुलांची चाकु व ब्लेडने गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. पुष्पावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असून रबाळे पोलिसांनी तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मागील वर्षभरापासुन गावी न गेल्याने पुष्पाने पतीच्या पाठीमागे गावी जाण्यासाठी तगादा लावला होता. मात्र व्यवसायासाठी तिचा पती गावी जाण्यासाठी टाळत होता. यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली आलेल्या पुष्पाने आपल्या दोन लहान मुलांची हत्या करुन नंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

पुष्पा गुर्जर ही पती वेणाराम गुर्जर (42) व मुलगी दिपु गुर्जर (4 वर्षे), मुलगा राहुल गुर्जर (1 वर्षे) यांच्यासह घणसोली गावात चिचंआळीमध्ये दशरथ छाया बिल्डींगमध्ये राहण्यास होती. पुष्पाचा पती वेणाराम याचा आईसक्रीम विक्रीचा व्यवसाय आहे. वेणाराम गुर्जरचे कुटुंब मुळचे राजस्थान मधील असुन व्यवसायानिमित्त हे कुटुंबासह नवी मुंबईत आले आहे. पुष्पा गुर्जर ही मागील वर्षभर आपाल्या गावी गेली नसल्याने गावच्या ओढीने ती गेल्या काही दिवसांपासुन व्याकुळ झाली होती. त्यामुळे गावी जाण्यासाठी तिने पतीच्या पाठीमागे तगादा लावला होता. मात्र पती कर्जबाजारी झाला असल्याने व सध्या दिवाळीमध्ये त्याचा व्यवसाय चांगला सुरु असल्याने त्याने सध्या गावी जाण्यास नकार दिला होता. तसेच काही दिवसानंतर गावी जाण्याबाबत त्याने पत्नी पुष्पाला सांगितले होते.  

त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या पुष्पामध्ये गेल्या काही दिवसापासून चिडचिड वाढली होती. याबाबत तिने पतीला बोलुन सुद्धा दाखवले होते. रविवारी सकाळी देखील तिने पतीला याबाबत बोलुन दाखविले होते. त्यामुळे पती वेणाराम याने तिला सकाळी मंदिरात नेले होते. त्यानंतर 11.30 वाजता तीला घरी सोडुन तो पुन्हा आपल्या कामावर गेला होता. त्यानंतर दुपारी पुष्पाने पतीला फोन करुन जेवण्यासाठी घरी येण्यास सांगितले होते. मात्र वेणाराम याने आईक्रीमच्या धंद्यामुळे त्याला घरी येता येणार नसल्याचे  पुष्पाला सांगितल्यानंतर पुष्पा त्याच्यावर चिडली होती. पुष्पाच्या विचित्र वागण्यामुळे वेणारामला संशय आला होता.  

त्याने काही वेळानंतर पुष्पाला पुन्हा फोन केला असता, तिचा फोन बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर वेणाराम याने संशयावरुन आपल्या घरी धाव घेतली. मात्र त्यापुर्वीच पुष्पाने मुलगी दिपु व मुलगा राहुल या दोघांची चाकु व ब्लेडने गळा चिरुन त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेत असतनाच वेणाराम घरी पोहोचला. मात्र दरवाजा आतुन बंद असल्याने व आतुन पुष्पा प्रतिसाद देत नसल्याने वेणाराम याने शेजाऱयांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे वेणाराम याच्या नातेवाईकाने सांगितले. या घटनेत पुष्पा बचावली असून तिच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रबाळे पोलिसांनी तिच्या विरोधात मुलांची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दोघा बांधकाम व्यवसायीकांच्या छळवणुकीमुळे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या