सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेजच्या भूखंडाची रक्कम त्वरित भरण्याची मागणी

नवी मुंबई ः कोव्हीड काळात डॉक्टर्स, नर्स उपलब्ध नसल्याने तसेच आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याने नवी मुंबई शहरासाठी अद्ययावत शासकीय रुग्णालयाची उणीव प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेजसाठी अथक पाठपुराव्यानंतर ‘सिडको'कडून भूखंड मिळवून दिला आहे. त्यामुळे महापालिकेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारण्यासाठी देण्यात आलेल्या भूखंडाची रक्कम त्वरित भरण्यात यावी, अशी विनंती ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांना केली आहे.

नवी मुंबई महापालिका मुख्यालय वास्तू उभारण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या पैशामध्ये महापलिका रुग्णालय अद्ययावत केले असते तर हिरानंदानी-फोर्टीसला रुग्णालय विकण्याची गरज पडली असती का? तसेच १५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ ३०० खाटांचे एकच महापालिका रुग्णालय आहे. शिवाय महापालिका हद्दीमध्ये येणाऱ्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये केवळ प्रसुतीचे रुग्ण दाखल केले जात असून बाकी सर्व रुग्ण वाशी मधील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवले जातात. परिणामी, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडतो, अशी बाब आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुवतांना निदर्शनास आणून दिली आहे.

गोरगरीबांना मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी नेहमीच खाजगी रुग्णालयाची मदत घ्यावी लागते. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या २५ वर्षात साधी एम.आर.आय. सुविधा देखील उपलब्ध होऊ शकली नाही. गेल्या 2५ वर्षामध्ये महापालिका रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या हृदय, मेंदू, किडनी अशा आजारांवर शस्त्रक्रिया आणि उपचार करण्याची यंत्रणा उभारण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आल्यामुळे गरीबांसाठी अशा सर्व उपचारांसाठी एका अद्ययावत हॉस्पिटलची गरज आहे. यापूर्वी बेलापूर येथील रुग्णालय २ वर्षे बंद होते. तेथील रुग्णालयात माझ्या स्थानिक विकास आमदार निधीतून १.५० कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे दिल्यानंतर तेथील आरोग्य सेवा सुरु करण्यात आली, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

कोव्हीड काळात डॉक्टर्स, नर्स उपलब्ध नसल्याने तसेच आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याने नवी मुंबई शहरासाठी अद्ययावत शासकीय रुग्णालयाची उणीव प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज सुरु होण्याच्या अनुषंगाने सिडकोकडून भूखंड मिळवून दिला आहे. त्यासाठीन सिडको, शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ‘सिडको'कडून महापालिकेला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारण्यासाठी देण्यात आलेल्या भूखंडाची रक्कम त्वरित भरण्यात यावी, अशी विनंती महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांना केली आहे. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्र वन विभागाला सीआरझेड अधिकार देण्यास केंद्राचा नकार