कंत्राटी, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कोव्हीड भत्ता द्या; अन्यथा आंदोलन

नवी मुंबई ः कोव्हीड काळात काम करणाऱ्या कंत्राटी, ठोक मानधनावरील आणिअन्य परिवहन कर्मचाऱ्यांना १५ दिवसाच्या आत कोव्हीड भत्ता न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ‘नवी मुंबई इंटक'तर्फे महापालिका आयुवतांना देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांना दिले आहे.

दरम्यान, सदरचे निवेदन रविंद्र सावंत यांनी परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांना देखील दिले आहे. कोरोना महामारीच्या दोन सव्वा दोन वर्षाच्या कालावधीत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी, ठोक मानधनावरील आणि अन्य परिवहन कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. कोरोना काळात परिवहनच्या बसेसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करुन कोरोना झालेले आणि कोरोनामुक्त झालेल्या सर्वांचीच ने-आण परिवहनच्या बसेसमधून झालेली आहे. या बसेसची दररोज सफाई आणि स्वच्छता होत असे. दुसरीकडे महापालिका प्रशासनात अन्य आस्थापनेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून कोव्हीड भत्ता देण्यात आलेला आहे. परंतु, महापालिका प्रशासनाकडून अद्यापि परिवहन उपक्रमातील कंत्राटी, ठोक मानधनावरील आणि अन्य परिवहन कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता देण्यात आलेला नाही. यासाठी
‘नवी मुंबई इंटक'कडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे, असे रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

आजवर प्रशासनाकडून आश्वासनाशिवाय काहीही पदरात पडलेले नाही. परिवहन उपक्रमातील कंत्राटी, ठोक मानधनावरील आणि अन्य परिवहन कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात प्रामाणिकपणे परिश्रम करुनही त्यांच्या कार्याची दखल घेतली जात नाही. कोव्हीड भत्ता देण्यास विलंब केला जात आहे. सदर बाब संतापजनक आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांच्या आत महापालिका प्रशासनाने परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना कोव्हीड भत्ता न दिल्यास ‘नवी मुंबई इंटक'च्या वतीने निदर्शने, काम बंद आंदोलन, उपोषण अशा संविधानात्मक मार्गाचा वापर केला जाईल, असा इशारा आयुवत राजेश नार्वेकर आणि परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांना सदर निवेदनातून देण्यात आला आहे.

 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेजच्या भूखंडाची रक्कम त्वरित भरण्याची मागणी