लोकल प्रवासादरम्यान हरविलेला गतीमंद परदेशी मुलाचा रेल्वे पोलिसांनी घेतला शोध

नवी मुंबई : केनिया देशातून उपचारासाठी नवी मुंबईत आलेल्या व लोकल प्रवासादरम्यान, हरविलेल्या 10 वर्षीय गतीमंद मुलाचा वाशी रेल्वे पोलिसांनी अवघ्या काही तासात शोध घेऊन त्याला सुखरुप त्याच्या पालकांच्या ताब्यात दिल्याची घटना गत गुरुवारी घडली. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे गतीमंद मुलगा काही तासात सुखरुप परत मिळाल्याने सदर मुलाच्या आईने रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.  

केनिया नायरोबी देशातील मर्सी हेरी कायरेची यांचा 10 वर्षीय मुलगा लेणी हा गतीमंद असल्याने त्या काही दिवसापुर्वी आपल्या मुलाच्या उपचारासाठी नवी मुंबईत आल्या होत्या. गत 20 ऑक्टोबर रोजी मर्सी हेरी यांचा मुलगा लेणी व त्याचा मोठा भाऊ हे दोघेही गॉडफ्री डेरेना या केअर टेकरसोबत सकाळी 11 च्या सुमारास नेरुळ येथून लोकलने वाशी येथे रुग्णालयात उपचारासाठी जात होते. सदरची लोकल वाशी रेल्वे स्थानकात आल्यानंतर गर्दीत लोकलमधून उतरत असताना केअर टेकर व लेणीचा भाऊ वाशी रेल्वे स्थानकावर उतरले. मात्र, याचवेळी लोकल चालू झाल्याने लेणी याला उतरता आले नाही, त्यामुळे तो लोकलमध्ये तसाच पुढे निघून गेला.  

त्यामुळे केअरटेकरने याबाबतची माहिती मर्सी हेरी यांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ वाशी रेल्वे पोलीस ठाणे गाठून रेल्वे पोलिसांना आपला मुलगा लोकलमध्ये हरविल्याची माहिती दिली. त्यानंतर महिला पोलीस हवालदार खोत यांनी मर्सी हेरीकडून यांच्याकडुन त्यांच्या मुलाचा फोटो घेऊन त्याची माहिती व फोटो पोलीस ठाणे व्हाट्सऍप ग्रुपवर पाठवुन सदर मुलाचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. यादरम्यान मानखुर्द रेल्वे स्थानकावर नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार मारकड हे मानखुर्द रेल्वे स्थानकावर गस्त करीत असताना त्यांना फ्लॅटफॉर्म क्र. 2 वरील बाकड्यावर लेणी एकटाच बसल्याचे निदर्शनास आला.  

यावेळी मारकड यांनी लेणीकडे त्याच्याकडे विचारपुस केली, मात्र त्याला काही एक सांगता येत नसल्याचे तसेच तो गतीमंद असल्याचे पोलीस अंमलदार मारकड यांच्या लक्षात आले. तसेच पोलीस ठाणे व्हाट्सअप ग्रुप वरील फोटो मधील हरविलेला मुलगा हा लेणीच असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी सदर मुलाला वाशी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस उप निरीक्षक गायकवाड यांनी सदरचा मुलगा हा मर्सी हेरी यांचाच असल्याची खात्री करुन लेणीला त्यांच्या ताब्यात दिले. अशी माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऐन दिवाळीत ऐरोली आणि रबाळेमध्ये दोन व्यक्तींनी केली आत्महत्या