कोपरखैरणे हत्या प्रकरणातील मृत तरुणाची मित्रांनीच हत्या केल्याचे उघड
नवी मुंबई : कोपरखैरणेतील साहिल शांताराम गोळे या 17 वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आले आहे. साहिलची हत्या त्याच्याच चौघा मित्रांनी केल्याचे उघडकीस आले असून यात तीन अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याचे आढळुन आले आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आपसातील वादातुन चौघांनी ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
कोपरखैरणे सेक्टर-15 मध्ये मृत राहणारा साहिल गोळे हा कोपरखैरणेतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 12 चे शिक्षण घेत होता. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी साहिल हा काही दिवसांपूर्वीच महापेतील चॉकलेट कंपनीत कामाला लागला होता. त्यासाठी तो दिवसा कॉलेज आणि रात्रपाळीवर कामाला जात होता. मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास साहिल कामावर जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र तो कामावर न जाता आपल्या मित्रांसोबत कोपरखैरणे सेक्टर-23 मधील भुमीपुत्र गार्डनमध्ये फिरत होता. रात्री 11.30 वाजता साहिलच्या आईने त्याला फोन केला असता, साहिलने कामावर असल्याचे आईला सांगितले होते. मात्र मध्यरात्री साहिल आणि त्याच्या मित्रांमध्ये आपापसातील जुन्या वादातून भांडण झाले.
या भांडणात त्याच्या चौघा मित्रांनी साहिलच्या डोक्यावर दगडाने हल्ला करुन तसेच त्याच्या ओंठावर व पोटावर तीक्ष्ण हत्याराने भोसकुन त्याची हत्या केली. त्यानंतर चौघांनी पलायन केले. बुधवारी सकाळी कोपरखैरणे सेक्टर-23 मधील भुमीपुत्र गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना सहिलचा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर साहीलची हत्या झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱयाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली असता, साहिल हा मंगळवारी रात्री उशीरा संकेत उर्फ सनी पवार (20) व इतर तीन अल्पवयीन साथीदारांसह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साहिलच्या मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांनीच साहिलची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली.