मित्राच्या मृत्यूस कारणीभुत ठरला मित्र

नवी मुंबई : एनएमएमटी बसला समोरुन भरधाव स्कुटी धडकल्यामुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या स्कुटीवरील दोघा तरुणांपैकी उमेश चिंदरकर (31) या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताला मृत उमेशचा मित्र स्कुटी चालक सागर ओटावकर हा जबाबदार असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.  

या अपघातात मृत झालेला उमेश चिंदरकर हा मुंबईत परेल येथे कुटुंबासह राहण्यास होता. गत 10 ऑक्टोबर रोजी उमेश हा दिवा ठाणे येथे राहणारा त्याचा मित्र सागर ओटवकर याच्या घरी जात असल्याचे तसेच दुस-या दिवशी घरी परतणार असल्याचे  सांगुन गेला होता. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी सागर आणि उमेश हे दोघे मित्र दिवा येथून स्कुटीवरुन नवी मुंबईमार्गे मुंबईत जात होते. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कुटी वाशीतून भरधाव वेगात जात असताना, समोरुन येणा-या एनएमएमटी बसवर त्यांची स्कुटी जोरदार धडकली.  

या अपघातात सागर आणि उमेश दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यातील उमेश गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात हलविण्यात आले होते. मागील सात दिवस उमेशवर उपचार सुरु होते. मात्र 17 ऑक्टोबर रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मृत उमेशचे वडील पांडुरंग चिंदरकर यांनी या अपघाताला जबाबदार असलेला उमेशचा मित्र सागर याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणे हत्या प्रकरणातील मृत तरुणाची मित्रांनीच हत्या केल्याचे उघड