पोलिसांच्या बोनस प्रकरणी राजन राजे यांचा शिंदे-भाजप सरकारवर जोरदार घणाघात

ठाणे ः विद्यमान महाराष्ट्र सरकारने नुकताच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला असला तरी दिवस-रात्र, उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांना मात्र दिवाळी बोनस देण्याबाबत सरकारने हात आखडता घेतला आहे. याच शासकीय उदासीनतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी १८ ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर, एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्ष'चे अध्यक्ष राजन राजे यांनी आवर्जून उपस्थित राहून पोलिसांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे, या मागणीला ठामपणे पाठिंबा दिला. या सरकारात एक मंत्री आहेत, जे फार मोठे बिल्डर आहेत, ज्यांची चाळीस हजार कोटींची ज्ञात संपत्ती आहे, तेच मंगलप्रभात लोढा आता पर्यटन मंत्री आहेत. हेच ना. लोढा जेव्हा विरोधी पक्षाच्या बाकावर बसत होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून पोलिसांना २५ ते ५० हजारांपर्यंत बोनस देण्याची मागणी केली होती. या गोष्टीला आता दोन वर्षे उलटून गेलीत, असे यावेळी राजन राजे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांना देखील त्यांच्या हक्काचा बोनस देण्यात यावा, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्ष'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.

परिणामी, आम्ही पोलिसांच्या बोनस प्रकरणी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला असल्याचे राजन राजे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. याप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्ष'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित या पदाधिकाऱ्यांसह नरेंद्र शिंदे, अजय जेया आणि समाजसेविका अश्विनी केंद्रे यांच्यासोबत पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील मोठ्या
संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मुख्यमंत्र्यांची सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार!