नवी मुंबईतील विविध प्रयोजनासाठी भूखंड मिळण्याची मागणी

नवी मुंबई ः बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विविध प्रयोजनासाठी भूखंड मिळण्यासाठी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची १८ ऑवटोबर रोजी ‘सिडको'चे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ‘भाजपो'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेवक अशोक गुरखे, दीपक पवार, जनार्दन म्हात्रे, प्रदीप पाटील, नरेश गौरी, विकास मोकल, रुपेश चव्हाण तसेच ‘सिडको'चे मुख्य नियोजनकार व्ही.वेणुगोपाल, व्यवस्थापक (शहर सेवा) दीपक जोगी, महाव्यवस्थापक (प्रशासन) जगदीश राठोड, सामाजिक सेवा अधिकारी प्रशांत भांगरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये बेलापूर ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान, सीबीडी येथे बालभवन उभारणे, सीवुडस्‌ येथे महिला भवन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उद्यान, आरोग्य केंद्र, टाटा पॉवरखालील नर्सरी, बेलापूर गांव येथील कुस्तीचे मैदान, शुटींग रेंज तसेच शिरवणे गणेश मंदीर शेजारी मंदीर ट्रस्टला भूखंड देणे अशा विविध प्रयोजनाकरिता भूखंड उपलब्ध करुन देण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांनीही सदरबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध प्रयोजनाकरिता भूखंड उपलब्ध करुन देणार असल्याचे सूचित केले.

दरम्यान, नवी मुंबईमध्ये विविध प्रयोजनाकरिता सामाजिक सेवेचे भूखंड उपलब्ध करुन देणेबाबत मी ‘सिडको'कडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. दोन दिवसांपूर्वी  ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांची भेट घेतली होती. याच अनुषंगाने सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित केली होती, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

बैठकीमध्ये बेलापूर मतदारसंघात विविध बाबींसाठी भूखंड उपलब्ध करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वेक्षण करुन भूखंड उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. - आमदार सौ.मंदाताई म्हात्रे.


 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पोलिसांच्या बोनस प्रकरणी राजन राजे यांचा शिंदे-भाजप सरकारवर जोरदार घणाघात