खारघर पोलिसांच्या तावडीतून बांग्लादेशी आरोपीचे पलायन 

नवी मुंबई : बांग्लादेशात डिपोर्टेशन कारवाईसाठी खारघर पोलीस ठाण्यात निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या एका बांग्लादेशी आरोपीने उलटी व गुदमरत असल्याचा बहाणा करुन पोलिसांच्या तावडीतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमिरुल उर्फ प्रकाश मन्नन खान (23) असे पळुन गेलेल्या आरोपीचे नाव असू खारघर पोलिसांनी सदर बांग्लादेशी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

खारघर पोलीस ठाण्यातून पळून गेलेला आरोपी अमिरुल उर्फ प्रकाश मन्नन खान व त्याचा साथिदार राजु परहाक शेख या दोघांनी गत जानेवारी महिन्यामध्ये खारघर मधील इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडुन त्यातील रोख रक्कम चोरली होती. त्यानंतर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने 14 फेब्रुवारी रोजी खारघर मधील ओवे गाव कॅम्प परिसरातुन या दोघांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीनंतर ते बांग्लादेशी नागरीक असल्याचे तसेच घुसखोरी करुन ते भारतात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी पनवेल न्यायालयातील प्रथमवर्ग न्याय दंडाधिका-यांनी या दोघांना दोषी ठरवुन त्यांना मंदिरातील चोरी प्रकरणात शिक्षा ठोठावली होती. गत 10 ऑक्टोबर रोजी या दोघांची शिक्षा पुर्ण झाल्यानंतर या दोन्ही आरोपींची बांग्लादेशात रवानगी (डिपोर्टेशन) करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.  

हे दोन्ही आरोपी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्यांची रवानगी बांग्लादेशात करण्यासाठी तसेच पुढील कायदेशीर पुर्तता करण्यासाठी त्यांना खारघर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या निगराणीत ठेवण्यात आले होते. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास या दोन्ही आरोपीपैकी अमिरुल उर्फ प्रकाश मन्नन खान याने त्याला उलटी सारखे व गुदमरल्यासारखे होत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पोलीस शिपाई शिंगाडे यांनी सदर आरोपीला मोकळ्या हवेत फिरवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या बाहेर नेले होते. यावेळी आरोपी अमिरुल उर्फ प्रकाश मन्नन खान याने पोलीस शिपाई शिंगाडे यांची नजर चुकवून पलायन केले. त्यानंतर खारघर पोलिसांनी पळून गेलेल्या या आरोपीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणे सेक्टर-23 मध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या,