प्रारुप विकास आराखडा

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसी प्रधिकरण यांचा समन्वय नसल्याने महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आला शहर विकास आराखडा वादात सापडला आहे. या प्रारुप विकास आराखड्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना यासाठी महापालिकेने ३१ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. मात्र, सदर मुदतवाढ खोटी आणि दिशाभूल करणारी आहे. महापालिकेकडून मुदतवाढीचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ‘नवी मुंबई बचाव अभियान'द्वारे जनजागृती करणारे दशरथ भगत यांनी केला आहे.

दरम्यान, नवनियुवत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची आ.गणेश नाईक यांच्या समवेत दशरथ भगत यांनी भेट घेऊन मुदतवाढ कशी दिशाभूल करणारी आहे, याचा पाढा वाचला. तर महापालिकेला शहराचा विकास करायचा आहे की बिल्डरांचा? असा सवालही दशरथ भगत यांनी उपस्थित केला.

२९ वर्षानंतर नवी मुंबईकरांच्या नागरी सोयी सुविधांची पुर्तता करणारा प्रारुप विकास आराखडा महापालिकेने प्रसिध्द केला आहे. सदर प्रारुप विकास आराखडा लोकसहभागातून निर्माण व्हावा या विषयी जनतेला योग्य माहिती देऊन सूचना-हरकती यानंतरच त्याला अंतिम स्वरुप द्यावे या मागणीसाठी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या माध्यमातून नवी मुंबई बचाव जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी १२ हजार नागरिकांनी आपल्या सूचना-हरकती, मागण्या अभियानात लिखित स्वरुपात मांडल्या आहेत.
दुसरीकडे महापालिकेने हरकती-सूचना सादर करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर पर्यतची मुदत देत असल्याचे जाहिर केले. मात्र, हरकती-सूचना यासाठी देण्यात आलेला एकुण ६० दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्यातील चार शनिवार आणि रविवारच्या सुट्टया तसेच चार सार्वजनिक सुट्ट्या, सप्टेंबर महिन्यात आलेले चार शनिवार-रविवार सुट्टीचे दिवस त्याच प्रमाणे ऑक्टोबर महिन्यातील दोन रविवार-शनिवार सुट्टीचे दिवस, एक सार्वजनिक सुट्टी असे २५ दिवस वगळल्यास ३५ दिवस वास्तवात कामकाजाकरिता आले असल्याचे दशरथ भगत यांनी महापालिका आयुक्त नार्वेकर यांच्या निदर्शनास यावेळी आणून दिले.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा अशा सणाच्या धांदलीचा अंदाज घेत महापालिकेने कपटी वृत्तीने मुदतवाढीचा गवगवा केल्याचे दशरथ भगत यांचे म्हणणे आहे. नवी मुंबई बचाओ अभियान मध्ये वारंवार मागणी करुनही नागरिकांमध्ये प्रारुप शहर विकास आराखडा बाबत जनजागृती न केल्याने जनतेला अंधारात ठेऊन सदर आराखडा निर्माण केला जात आहे. याबाबत महापालिकेने आतापर्यत काय काय केले? कुठे कुठे जनजागृती केली? याची माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे. -दशरथ भगत, माजी विरोधी पक्षनेते, नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर संपन्न