सफाई कामगार महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन मोटारसायकलवरुन लुटारुंचे लुटून पलायन

नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार महिलेचे दागिने लुटले 

नवी मुंबई : साफ सफाईच्या कामासाठी सकाळच्या सुमारास सानपाडा भागात आलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी लुटून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. सानपाडा पोलिसांनी या गुह्यातील दोन्ही लुटारुंची शोध सुरु केला आहे.  

या घटनेतील तक्रारदार महिला दिफ्ती गांगण (45) या वडाळा येथे राहण्यास असून त्या नवी मुंबई महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. गत रविवारी सकाळी 6 वाजता त्या वडाळा येथून सानपाडा येथे आपल्या कामावर आल्या होत्या. त्यानंतर त्या पायी सानपाडा सेक्टर-4 मध्ये सफाई करण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या साई सुरक्षारक्षक सोसायटी समोर आल्या असताना, त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने दिफ्ती गांगण यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचली. त्यामुळे दिफ्ती गांगण यांनी आरडा-ओरड केली, मात्र तोपर्यंत सदर लुटारुंनी नेरुळच्या दिशेने भरधाव वेगात पलायन केले. यावेळी दिफ्ती गांगण यांना सदर लुटारुंच्या मोटारसायकलच्या पाठीमागे नंबर नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सानपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी दोन अज्ञात लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशी गावात 12 वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या