पारसिक टेकडीच्या अविवेकी खोदकामाबद्दल चिंता व्यक्त
‘पारसिक हिल'वरील खोदकाम विनापरवानगी
नवी मुंबई ः १०० हुन जास्त इमारती असलेल्या पारसिक हिलच्या खोदकामासाठी कोणत्याही प्रकारची पर्यावरण परवानगी दिली नसल्याची बाब माहिती अधिकार कायदा अंतर्गत ‘नॅटकनेवट फाऊंडेशन' या पर्यावरण संस्थेने मिळवली आहे. दरम्यान, पर्यावरणवाद्यांनी नवी मुंबईतील पारसिक हिल भागात दरडी कोसळण्याचा मुद्दा उचलून धरला होता. फेब्रुवारी पासून पूर्ण वाढलेल्या झाडांना नष्ट करुन आणि जाळून डोंगराच्या मध्यभागामध्ये होणाऱ्या पारसिक टेकडीच्या अविवेकी खोदकामाबद्दल चिंता व्यक्त करत पर्यावरण परवानगी संदर्भात ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने सदरची धवकादायक माहिती मिळवली आहे. सदर भागात खोदकाम केल्यानंतर उतारावर फुलझाडांच्या कुंड्या ठेवल्या जाणे अतिशय धक्कादायक बाब असल्याचे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने म्हटले आहे. पर्यावरण विभागाने यावर प्रतिक्रिया देताना या विषयी एसइआयएएकडे (राज्य शासनाची प्रभाव परिक्षण संस्था) कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे सांगितले आहे. पारसिक हिलवरील खोदकामासाठी कोणतीही परवानगी दिली गेली नसण्याच्या स्थितीत, शासकीय विभागाने प्रतिक्रिया देण्याची सर्वसामान्य पध्दत असल्याचे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने दुःख व्यक्त केले आहे. या संस्थेने माहिती अधिकार कायदा अंतर्गत यापूर्वी अनेक निवेदने दाखल केली आहेत.
नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (राष्ट्रीय हरित लवादच्या) (एनजीटी) आदेशानुसार, डोंगरांचे किंवा टेकड्यांचे खोदकाम करण्याआधी पर्यावरण विभागाची परवानगी घ्ोणे आवश्यक आहे, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले. एसइआयएए या परवानग्या देणारी पात्र संस्था आहे. त्यामुळेच आपल्याला एसइआयएए पुढे परवानगीसाठी आलेली अनेक निवेदने पहायला मिळतात, असे कुमार म्हणाले. डोंगराच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या अशा पर्यावरण विरोधी प्रवृत्तींविरुध्द शासनाने कडक कारवाई केली पाहिजे, असे देखील बी. एन. कुमार यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. डोंगराच्या मध्यावर अवजड यंत्रांनी अमानुष खोदकाम सुरु असल्यामुळे दरडी कोसळू शकतात. खरेतर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामध्ये पारसिक हिलच्या पायथ्याशी असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या वॉटर कंट्रोल रुमवर दरड कोसळली होती, अशी माहिती ‘पारसिक हिल रेसिडेंटस् असोसिएशन'चे जनरल सेक्रेटरी राजेंद्र लोखंडे यांनी दिली. यावेळी सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही, असे ते म्हणाले. ‘सिडको'ने पारसिक हिलवर अंदाजे २०० भूखंडांचे वाटप केले असून अंदाजे १०० इमारती आधीच उभारण्यात आलेल्या आहेत. इमारतींच्या व्यतिरिक्त, इथे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने मोठी पाण्याची टाकी आहे. सदर सर्व आता जोखमीमध्ये आहे. डोंगर आता खचत चालला आहे, असे ‘पारसिक'चे पर्यावरण प्रेमी विष्णू जोशी यांनी सांगितले.
‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने अगदी सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नवी मुंबई महापालिकेला पारसिक हिलच्या पूर्वेकडील उतारावर होणाऱ्या खोदकामाविषयी तक्रार केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी पर्यावरण आणि वन मंत्रालयासह ‘ठाणे' जिल्हाधिकाऱ्यांना सदर प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, टेकडीच्या खोदकामाआधी योग्यप्रकारे भौगोलिक अभ्यास आणि पर्यावरण परिक्षण होणे अतिशय आवश्यक असल्याचे ‘श्री एकवीरा आई प्रतिष्ठान'चे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले. पारसिक हिलवर झालेले खोदकाम सायन-पनवेल महामार्गावरुन स्पष्टपणे दिसत असून देखील कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याने याची साधी चौकशी सुध्दा केली नसल्याची खंत देखील नंदकुमार पवार यांनी व्यक्त केली आहे. कोकण विभाग आयुक्त, नवी मुंबई महापालिका आणि सिडको मुख्यालयासारखी महत्वाची शासकीय कार्यालये या परिसराच्या आसपास असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.