‘इंटक'च्या पाठपुराव्याने घनकचरा विभागातील सुपरवायझर्सना कोव्हीड भत्ता

नवी मुंबई ः कोरोना महामारी आटोक्यात आल्यावर महापालिका प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोव्हीड भत्ता न मिळाल्याने ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी प्रशासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे घनकचरा विभागातील सुपरवायझर यांना कोव्हीड भत्ता मिळाला आहे. दरम्यान, ऐन दिवाळीपूर्वी कोव्हीड भत्ता मिळाल्याने दिवाळी सणाच्या खरेदीसाठी आर्थिक अडचण येणार नसल्याचे सांगत नेरुळ येथील इंटक कार्यालयात कामगार नेते रविंद्र सावंत यांचे कोव्हीड भत्ता मिळालेल्या सुपरवायझर्सनी आभार मानले आहेत.

घनकचरा विभागात एजी एन्वर्मेन्ट या ठेकेदाराच्या माध्यमातून ३२ सुपरवायझर महापालिका प्रशासनात काम करत आहेत. कोव्हीड काळात काम करणाऱ्या सर्वच आस्थापनेतील तसेच सर्वच संवर्गातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी कोव्हीड भत्ता जाहिर करण्यात आला होता. महापालिका प्रशासनाने कोव्हीड भत्ता जाहिर केला असला तरी कोरोना महामारी आटोक्यात आल्यावरही तो भत्ता देण्यास प्रशासनाकडून विलंब होत होता. या पार्श्वभूमीवर कामगार नेते रविंद्र सावंत यांनी ‘नवी मुंबई इंटक'च्या माध्यमातून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला. महापालिका मुख्यालयात शिष्टमंडळासमवेत जावून आयुक्तांची भेट घेत त्यांच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य आणून दिले. या पार्श्वभूमीवर घनकचरा विभागातील सुपरवायझर यांना महापालिका प्रशासनाकडून कोव्हीड भत्ता वितरीत करण्यात आल्यामुळे संबंधितांकडून कामगार नेते रविंद्र सावंत यांचे आभार मानण्यात आले आहेत. याप्रसंगी युनिट अध्यक्ष राजन सुतार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत