माथाडी कामगारांचे प्रलंबित न्याय प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

नवी मुंबई ः माथाडी कामगारांच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या एक महिन्याच्या आत सोडवणूक करण्याचे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले.
‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील निवेदन कामगार मंत्री सुरेश खाडे यांना सादर केले होते. त्यासंदर्भात ना. खाडे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी चर्चेअंती सदर आश्वासन दिले.

सदर बैठकीप्रसंगी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, उपसचिव दादासाहेब खताळ, अवर सचिव दिपक पोकळे, दिलीप वणिरे, सह-कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, पोलीस  हासंचालक कार्यालयातील एम. रामकुमार, पोलीस उपायुवत (विशेष शाखा) मोहन चिमटे, गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर, पणनचे सहसचिव सुग्रीव धपाटे, पणन सह-संचालक विनायक कोकरे, ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'चे सचिव संदिप देशमुख, उपसचिव विजय शिंगाडे, अधिकारी फयाज मुलाणी, पणन विभागाचे मनोज वांगड, कामगार उपायुक्त तथा ग्रोसरी बोर्डाचे चेअरमन बाळासाहेब वाघ, ‘माथाडी युनियन'चे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, ‘युनियन'चे अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णा पाटील, नाशिक, पुणे विभागाचे सेक्रेटरी आणि कार्यकर्ते आदि उपस्थित होते.

माथाडी सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची नियुक्ती करावी, सल्लागार समितीच्या वेळावेळी संयुक्त बैठका घ्याव्या, माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनुभवी कामगार नेत्यांच्या नेमणुका कराव्यात, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांची भरती करावी, माथाडी मंडळात चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे, कामगार विभागाने काढलेला ५ मार्च २०१९ रोजीचा पतपेढ्यांबाबत शासन निर्णय रद्द करणे, फॅक्टरीमध्ये माथाडी कायदा आणि मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी होणे, मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करणे, मापाडी कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे आदि मागण्यांचे निवेदन
नरेंद्र पाटील यांनी कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांना सादर केले होते. यासंदर्भात सर्व संबंधितांशी तब्बत तीन तास सविस्तर चर्चा करुन ना. सुरेश खाडे यांनी माथाडी कामगारांचे प्रलंबित न्याय प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांंना सूचनाही केल्या.

माथाडी कामगारांच्या प्रलंबित न्याय प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन पहिल्याच बैठकीत चांगले निर्णय घ्ोतले, त्याबद्दल नरेंद्र
पाटील आणि आ. शशिकांत शिंदे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सीबीडी येथे अन्नदान