प्रारुप विकास आराखडा एक गडद रहस्य

वाशी ः नवी मुंबई महापालिकेने जाहिर केलेल्या ‘प्रारुप विकास आराखडा'मध्ये अनेक त्रुटी असून त्या महापालिकेने लपवल्या आहेत. त्यासाठी सदर ‘विकास आराखडा'ची स्वच्छ भारत अभियान प्रमाणे व्यापक प्रमाणावर जाहिरात करुन जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, महापालिका प्रशासन तसे करत नाही. त्यामुळे सदर आराखडा एक गडद रहस्य असून याबाबत नवी मुंबईकरांना जागृत करण्यासाठी येत्या नवरात्री उत्सवाचे नऊ दिवस संपूर्ण शहरात जागर करणार आहे. तसेच महापालिकेने ‘विकास आराखडा'वर हरकती-सूचना याकरिता आणखी साठ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केली.


नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहराच्या ‘प्रारुप विकास आराखडा'चे वाटोळे केले  आहे. या ‘विकास आराखडा'मध्ये हरकती-सुचनांबाबत चुकीची आणि खोटी माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल केली जात असून ती न करता महापालिकेने प्रथम स्वच्छ भारत अभियान प्रमाणे जनजागृतीपर शिबिरे घ्यावीत, त्यानंतरच हरकती-सूचना मागवाव्यात, अशी मागणी दशरथ भगत यांनी २२ सप्टेंबर रोजी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये केली. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक यांनी विकास आराखडा
तयार करण्यासाठी अक्षम्य दिरंगाई केली आहे. त्यामुळे सिडको, एमआयडीसी, वन विभाग, एमसीझेडआर, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्युडी तसेच इतर संबंधित प्राधिकरण आणि संस्थांनी नवी मुंबई शहर गचाळ आणि विद्रप केले आहे. नवी मुंबईतील पारंपरिक असलेली गांव-गांवठाणे, शहरी भाग यांच्या विविध परंपरा, इतिहास, संस्कृती, पारंपरिक उद्योग, नागरी सुख-सुविधा आणि रोजगारावर आज पर्यंत वाईट परिणाम केला असून तो होतच आहे. तसेच भविष्यातील राहणीमान आणि उद्योगावर अधिक वाईट परिणाम होण्यासह झोपडपट्टी रहिवाशांच्याही विविध सुख-सुविधांना देखील वाईट परिणामकारक असल्याने दशरथ भगत यांनी सांगितले.


आजमितीस नवी मुंबई शहराची १५ लाख लोकसंख्या आहे. परंतु, आगामी ५० वर्षाच्या ५० लाख लोकसंख्येला रहायला घर कदाचित असेल. अगोदरच अपूर्ण विविध सोयी-सुविधा, पाणी, विद्युत तसेच जगण्यासाठी रोजगार याची कमतरता आहे. त्यामुळे भविष्यातील सदर गरजांची कमतरता भासू नये आणि त्या अबाधित रहाव्यात, त्यांची पूर्तता करण्यासाठी ‘प्रारुप विकास आराखडा'च्या अहवालामध्ये उपायोजना कसे आहे? असा सवाल दशरथ भगत यांनी यावेळी उपस्थित केला. प्रथम शहराचे सर्वांगीण विद्रुपीकरण होऊ द्यायचे मग ‘निश्चय केला-नंबर पहिला' या ब्रिदवाक्याची पूर्तता करण्यासाठी करोडो रुपये खर्च करायचे. त्यासाठी सर्व नागरी सुविधा कामे प्रलंबित ठेवून आणि सर्व यंत्रणा वेठीस धरुन ‘स्वच्छ भारत अभियान'ची जनजागृती करायची, असे करुन या शहराचे विद्रुपीकरण झाल्यावर नंतर पहिला क्रमांक कसा येणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असल्याचे भगत यावेळी म्हणाले.


नवी मुंबई महापालिकेचा सदर प्रारुप विकास योजना काय आहे? याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. म्हणून नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या सर्व विविध सोयी-सुविधांबाबत हरकत सूचना घेणे शक्य नाही. नागरिकांना सूचना करण्यासाठी महापालिकेने प्रथम वार्ड निहाय प्रबोधन शिबीर, मार्गदर्शन तसेच प्रेजेन्टेशन करुन जनजागृती करावी. त्यानंतरच हरकती-सूचना मागवाव्यात, अशी मागणीही दशरथ भगत यांनी यावेळी केली. त्यामुळे ‘प्रारुप विकास आराखडा'बाबत नवी मुंबईकरांना अधिक जागृत करण्यासाठी नवरात्री उत्सवात नऊ दिवस संपूर्ण शहरात जागर करणार असल्याची घोषणा दशरथ भगत यांनी पत्रकार परिषद मध्ये केली.

नवी मुंबई महापालिकेच्या ‘प्रारुप विकास आराखडा' बाबत गांव-गांवठाण, नोड तसेच झोपडपट्टी क्षेत्रातील नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नवी मुंबई बचाव अभियान अंतर्गत २६ सप्टेंबर ते ५ ऑवटोबर या कालावधीत शहरातील प्रत्येक नोडमध्ये जनजागृतीचा जागर करणार आहे. -दशरथ भगत, माजी विरोधी पक्षनेते-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माथाडी कामगारांचे प्रलंबित न्याय प्रश्न सोडविण्याचे आश्वासन