सार्वजनिक वापरासाठी मैदाने बळकावणाऱ्या शिक्षण संस्थांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

 ‘फुटबॉल टर्फ' विरोधात मनसे आक्रमक

नवी मुंबई ः सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मैदानावर अवैधरित्या फुलबॉल टर्फ उभारून नवी मुंबईतील मैदाने बळकावल्या प्रकरणी शाळा, महाविद्यालय तसेच खाजगी शिक्षण संस्थावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ‘मनसे'चे
प्रवक्ते, नवी मुंबई शहर अध्यक्ष तथा ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'चे राज्य सरचिटणीस गजानन काळे यांच्या नेतृवाखाली शिष्टमंडळाने ‘सिडको'च्या सामाजिक सेवा विभाग महाव्यवस्थापकांना भेटून निवेदन दिले. यावेळी गजानन काळे यांनी ‘सिडको'च्या अधिकाऱ्यांना जाब विचारत मैदानात अवैधरित्या उभारण्यात आलेल्या ‘फुटबॉल टर्फ'च्या माध्यमातून लाखोंचा मालिदा खाणाऱ्या संस्था चालकांवर येत्या १५ दिवसात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

याप्रसंगी ‘मनसे'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या सोबत नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, ‘महिला सेना'च्या नवी मुंबई शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ, ‘विद्यार्थ्ी सेना'चे
नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, महिला उपशहर अध्यक्षा दिपाली ढऊळ, सचिव यशोदा खेडसकर, सायली कांबळे, मनसे विभाग अध्यक्ष गणेश भवर, योगेश शेटे, उपविभाग अध्यक्ष प्रकाश कोकाटे, मनविसे विभाग अध्यक्ष सिध्देश जगे, विशाल भणगे, महाराष्ट्र सैनिक रोहन यादव, रोहन राऊत, ऋतिक मांजरेकर, मधुर कोळी, आदि उपस्थित होते.

नवी मुंबई मधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने ‘सिडको'ने सर्व खाजगी शाळा आणि महाविद्यालय यांना मैदाने उपलब्ध करुन दिलेली आहेत. शाळा आणि महाविद्यालय यांच्या वेळेव्यतिरिक्त सदर मैदाने स्थानिक मुलांना खेळासाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक शिक्षण संस्था चालकांनी काही अपवाद वगळता मैदाने बंदिस्त करुन स्थानिकांचा अधिकार डावलला असल्याचे ‘विद्यार्थी सेना'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी ‘सिडको'ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे स्थानिकांना सदर मैदानांचा वापर करता येत नसल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले असून त्या संबंधी अनेक तक्रारी देखील मनसे पक्ष कार्यालयात स्थानिकांकडून प्राप्त झाल्या असल्याचे संदेश डोंगरे यांनी सांगितले. अनेक संस्था चालकांनी शिक्षण संस्थांना वापरासाठी दिलेले मैदान परस्पर त्रयस्थ संस्थेच्या घशात घातल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. सदर संस्था चालकांनी मैदानात काँक्रीटीकरण करुन तसेच कृत्रिम गवत लावून अवैधरित्या फुटबॉल टर्फ बनविले आहेत. या ‘फुटबॉल टर्फ'च्या माध्यमातून लाखोंचा मलिदा खाण्याचे काम राजरोसपणे सर्व शिक्षण संस्था चालक करत असल्याचा आरोप संदेश डोंगरे यांनी निवेदनातून केला आहे. सदर 'फुटबॉल टर्फ' वर दिवसातील १० ते १२ तास 'फुटबॉल' खेळ खेळण्याकरिता तासाला १८०० ते २००० रुपये शुल्क आकारले जातात. त्यातून दिवसाला १८ ते २०हजार रुपयांची कमाई तर महिन्याला जवळपास अंदाजे ६ ते ८ लाखांची उलाढाल होत असते. सदर प्रकार सरळ सरळ ‘सिडको'सोबत केलेल्या अटी-शर्तीचे उल्लंघन आहे. ‘सिडको'ने दिलेल्या राखीव मैदानांचा वापर व्यवसायिक गोष्टीसाठी करता येत नसल्याचे माहित असून देखील ‘फुटबॉल टर्फ'च्या माध्यमातून कमाई करण्याचा मुजोरपणा काही संस्था चालक तसेच त्रयस्थ संस्था करत आहेत. त्यामुळे स्थानिकांना तर विनामुल्य खेळण्यासाठी मैदाने मिळतच नाही. पण, सदर शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा विनामूल्य वापर करता येत नाही.

त्यामुळे सदर घटनेची ‘सिडको'ने गांभीर्याने दखल घेऊन सार्वजनिक वापरासाठी असलेली मैदाने बळकावून त्याद्वारे आर्थिक कमाई करणाऱ्या शाळा, महाविद्यालय तसेच खाजगी शिक्षण संस्था चालकांवर ‘सिडको'ची फसवणूक करुन मालमत्ता हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. तसेच मैदानात अवैधरित्या केलेले बांधकाम आणि अवैधरित्या बांधण्यात आलेले फुटबॉल टर्फ येत्या १५ दिवसात उखडून टाकावेत, अशी मागणी संदेश डोंगरे यांनी सदर निवेदनातून केली आहे. दरम्यान, जर येत्या १५ दिवसात कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीॅ सेना'च्या माध्यमातून संबंधित शिक्षण संस्था चालकांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील संदेश डोंगरे यांनी निवेदनातून दिला आहे.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

भाजप-शिंदे सरकारने आपल्या दुटप्पी कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध