इंटक'च्या पाठपुराव्याची दखल

नवी मुंबई ः महापालिका प्रशासनात काम करताना मृत झालेल्या कामगारांच्या परिवारातील सदस्यांना अनुकंपा तत्वावर महापालिका प्रशासनाने सेवेत घ्यावे यासाठी ‘नवी मुंबई इंटक'ने केलेल्या सातत्यपूर्ण पत्रव्यवहार, पाठपुरावा याची दखल घेत नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच २०१८ पासून नियुवतीच्या प्रतिक्षेत असलेल्या महापालिकेतील १३ मयत अधिकारी-कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्याचे आदेश महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.


दरम्यान, आयुक्त अभिजीत बांगर यांनी अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या मागणीला न्याय्य दिल्याने कामगार नेते रविंद्र सावंत यांनी नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांसमवेत शिष्टमंडळाने आयुक्त बांगर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यावर लवकरच तोडगा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली.


महापालिका प्रशासनात सेवा करताना मृत झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांना महापालिका प्रशासनाने अनुकंपा तत्वावर तात्काळ सेवेत सामावून घेण्यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी ‘नवी मुंबई इंटक'च्या माध्यमातून प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला आहे. शिष्टमंडळ घेवून महापालिका आयुक्त बांगर यांची भेट घेवून रविंद्र सावंत यांनी मृत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्त अभिजीत बांगर यांचे सेवा पुरविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवाविषयक विविध बाबीकडे प्राधान्याने लक्ष आहे. त्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचारीवृंदाचे मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न आयुक्त बांगर यांनी विशेष लक्ष देऊन मार्गी लागले आहेत. त्यानुसारच सन २०१८ पासून अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज दाखल केलेल्या महापालिकेतील १३ मयत अधिकारी-कर्मचारी यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर थेट नियुक्ती देण्यात आली आहे.


मागील ५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील १३ महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या नियुक्तीमुळे त्यांच्या कुटुंबाला मदत होणार आहे. नवनियुक्त कर्मचारी आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून आपल्या पदाच्या कामाला न्याय देतील. महापालिका प्रशासन उर्वरित सर्वच मृत कर्मचारी आणि अधिकारी यांच्या परिवारालाही लवकरच न्याय देईल, असा विश्वास आहे.-रवींद्र सावंत, अध्यक्ष - नवी मुंबई इंटक.

 

 

 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘आम आदमी पार्टी'च्या युवा आघाडीची घोषणा