निरीक्षक दर्जाच्या ठराविक कर्मचा-यांना नियमबाह्य पध्दतीने पदोन्नती

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवरील निरीक्षक दर्जाच्या ठराविक कर्मचाऱयांना नियमबाह्य पध्दतीने पदोन्नती दिली गेल्यामुळे मागासवर्गीय कर्मचा-यांवर अन्याय होत असल्याचा आरोप रिपब्लिकन कामगार सेनेने केला आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने दिली गेलेली पदोन्नती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी रिपब्लिकन कामगार सेनेचे विभागीय सचिव भूषण कासारे यांनी एपीएमसी प्रशासनाकडे केली आहे.  

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवरील निरीक्षक दर्जाच्या ठराविक कर्मचाऱयांना नियमबाह्य पध्दतीने दिल्या गेलेल्या पदोन्नतीविषयी एपीएमसी आस्थापनेवरील लघुलेखक यशवंत देशपांडे यांनी डिसेंबर 2021 रोजी पणन संचालनालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पणन विभागाच्या उपसंचालकांनी जुलै 2022 रोजी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना बाजार समिती प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र बाजार समिती प्रशासनाने या पत्राला केराची टोपली दाखवुन ठराविक कर्मचाऱयांना नियमबाह्य पद्धतीने बाजार समितीच्या आस्थापनेवर तदर्थ पदोन्नत्या दिल्याचा आरोप रिपब्लिकन कामगार सेनेचे विभागीय सचिव भूषण कासारे यांनी केला आहे.  

 नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या पदोन्नत्या रद्द करणे व त्या अनुषंगाने दिलेल्या लाभांची वसुली करणे याबाबतचे आदेश असतानाही बाजार समिती प्रशासनाकडुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप देखील कासारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. नियमबाह्य पध्दतीने दिल्या गेलेल्या पदोन्नतीमुळे मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहणार असल्यामुळे मागासवर्गीय संघटनांमध्ये काम करणा-या कर्मचारी व अधिका-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष शांत करायचा असेल तर वैध मार्गाने पदोन्नत्या कराव्यात अशी मागणी देखील भूषण कासारे यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली आहे.  

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 जुईनगरमधील प्राणी रुग्णालय लवकरच कार्यान्वित करा