शंभूराज देसाईंना पुन्हा विधानसभेत पाठविणार नाही
नवी मुंबई:- निष्ठावंत शिवसैनिक हा एका शेतकऱ्या सारखा आहे. त्यामुळे वादळ, गारपीट, दुष्काळामुळे कितीही पिक वाया गेले तरी त्याच्याजवळ जोपर्यत बियाणे शिल्लक असते त्यातून तो नवीन धान्य पिकवण्याची धमक ठेवतो. त्यामुळे सेनेतून असे कितीही गेले तरी काही फरक पडत नाही शिवसेना नवीन नेते तयार करण्याची धमक ठेवून असते, असे वक्तव्य शिवसेना उपनेते नितीन बाणुगडे पाटील यांनी व्यक्त केले.
पाटण तालुका विधानसभा क्षेत्र नवी मुंबई स्थित शिवसैनिकांचा मेळावा सचिन आचरे यांच्यावतीने कोपरखैरणेत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना पुढील निवडणुकीत चितपट करण्यासाठी नवी मुंबईतून शिवसैनिकांनी रणशिंग फुंकलं आहे. शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुका विधानसभा मतदार संघातील नवी मुंबई स्थित रहिवाश्यांचा मेळावा कोपरखैरणेत संपन्न झाला. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या ४० पैकी ३९ आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बघून घेतील. मात्र शंभूराज देसाई यांना पाटण तालुक्यातील शिवसैनिक पुन्हा विधानसभेत जाऊ देणार नाही असा निर्धार यावेळी पाटण तालुक्यातील शिवसैनिकांनी मेळाव्यात केला. बंडखोरी झाली असली तरी शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबतच आहेत. तर गद्दारांना शिवसैनिकच आता त्यांची जागा दाखवतील.
यावेळी पाटण जिल्हाप्रमुख हर्षल कदम, द्वारकानाथ भोईर, रंजना शिंत्रे, चेतन नाईक, एम के मढवी, विजयानंद माने आदी मान्यवर उपस्थित होते.