‘मनसे'ची चिलखत योजना!

१००० गोविंदांचा १०० कोटींचा विमा मनसे उतरवणार

नवी मुंबई ः येत्या १९ ऑगस्ट रोजी असणाऱ्या दहीहंडी उत्सवाची तयारी सगळीकडेच सुरु झाली आहे. मानवी मनोरे रचण्याच्या सरावासाठी गोविंदा रात्री जागवत आहेत. प्रत्यक्ष दहीकाल्याच्या दिवशी नवी मुंबईतील अपघातग्रस्त होणाऱ्या गोविदांना ‘मनसे'ने ‘सुरक्षा कवच' देऊ केले आहे.


या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या १ हजार गोविंदांचा १०० कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा मृत्युमुखीही पडतात. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी ‘मनसे'ने गोविंदांसाठी ‘विमा सुरक्षा कवच' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील विम्याची मुदत १९ ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असेल. सुरक्षा कवच योजनेचा लाभ  घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवुडस्‌ येथे जमा करावीत, असे आवाहन ‘मनसे'चे नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना किंवा पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही, असेही गजानन काळे यांनी स्पष्ट केले.


योजनेनुसार गोविंदास अपघाती मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, कायम स्वरुपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, अपघातामुळे रुग्णालयातील खर्च १ लाख रुपये असे विमा सुरक्षा कवच ‘मनसे'च्या वतीने मिळणार आहे. या योजनेचा नवी मुंबईतील गोविंदांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 आ. प्रशांत ठाकूर यांच्यावर वाढदिवस निमित्त शुभेच्छांचा वर्षाव