आयोडीनयुक्त मीठाची सक्ती : नक्की कशासाठी?

समुद्री मासे, नैसर्गिक मीठ, कॉड माशाच्या यकृताचे तेल, दही, चीज इत्यादींपासून आयोडीन मिळते. दूध, मांस, फळे, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही ते थोडे असते.  भारताला मोठा समुद्रकिनारा लाभला असून देशाची मोठी लोकसंख्या तेथे राहते, त्या लोकसंख्येच्या आहारातील सागरी अन्नाचे प्रमाणही चांगलेच आहे. आयोडीनचा पुरवठा योग्य रितीने होण्याची शक्यता असताना, सरसकट सर्वांनाच ‘आयोडीनयुक्त मीठा'ची सक्ती कशासाठी?

”डबल फोर्टीफाईड- आयोडीनयुक्त, सबसे शुद्ध नमक!” अशी जाहीरात आपण मोठ्या आवाजात आणि वारंवार टी.व्ही.वर पहात-ऐकत आलो आहोत. आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्याचे होणारे विविध फायदे कंटाळवाण्या सरकारी जाहिरातींपासून ते मीठ उत्पादक कंपन्यांच्या झकपक जाहिरांतीत आपल्या मनावर ठसवले जातात. आपल्या घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर ‘आयोडीनयुक्त मीठ' असे लिहिलेले दिसेल. आयोडीन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉइड ग्रंथीमध्ये या आयोडीनपासून थायरॉक्सीन नावाचा अंतःस्त्राव तयार केला जातो. या स्त्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे विविध आजार होतात, हे माहित असल्यानेे आयोडीनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा जादा पुरवठा केला जातो.

    या सर्व बाबी सत्य असल्या तरी ‘आयोडीनयुक्त मीठा'ची दुसरी खारट बाजू पाहूया. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ वा खाद्य तेल यांचा वापर करता येतो. त्यामुळे १ किलो मिठात सुमारे १५ ते ३० मि. ग्रॅ. या प्रमाणात  आयोडीन मिसळले जाते. मिठात आयोडीन टाकण्यासाठी चार असेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो. यात पोटॅशिअम आयोडेट, पोटॅशिअम आयोडाइट, सोडिअम आयोडेट व सोडिअम आयोडाइड यांचा समावेश होतो. आयोडीन खूप अल्प प्रमाणात शरीरास आवश्यक असते. लहान मुलांपासून ते मोठ्यांचा विचार केल्यास आपल्या शरीराला सरासरी १०० ते २०० मायक्रोग्रॅम  आयोडीनची गरज असते. गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्या बाबतीत ही गरज २५० मायक्रोग्रॅमच्या वर असते. आयोडीनयुक्त मीठामुळे ही गरज भरून निघते. परंतु आपल्या अन्नपदार्थांचा विचार केल्यास सामान्य भारतीय व्यक्ती प्रतिदिन १० ग्रॅम मीठाचे सेवन करते. कधीकधी हे सेवन ३० ग्रॅमपर्यंत असू शकते. हे सर्व मीठ आयोडीनयुक्त असल्यास सुमारे ३०० ते ९०० मायक्रोग्रॅम आयोडीन आपल्या शरीराला मिळते.
आता आयोडीनच्या इतर स्त्रोतांकडे पाहूया. मुख्यत्वे सागरी अन्नपदार्थांतून मुबलक प्रमाणात आयोडीन मिळते. समुद्री मासे, नैसर्गिक मीठ, कॉड माशाच्या यकृताचे तेल, दही, चीज इत्यादींपासून आयोडीन मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, फळे, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोड्या प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडीनचे प्रमाण जेथे कमी असेल तो भौगोलिक प्रदेश सोडून उर्वरीत प्रदेशात आयोडीन मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. भारताला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. देशाची मोठी लोकसंख्या या प्रदेशात नांदत आहे, या लोकसंख्येच्या आहारातील सागरी अन्नाचे प्रमाणही चांगलेच आहे. आयोडीनचा पुरवठा योग्य रितीने होण्याची शक्यता असताना, सरसकट सर्वांनाच ‘आयोडीनयुक्त मीठा'ची सक्ती कशासाठी?

       प्रत्येक व्यक्तीची वयोमानानुसार आयोडीन सेवनाची कमाल मर्यादा ठरलेली असते. लहान मुलांमध्ये ती २०० ते ५०० मायक्रोग्रॅम्स तर प्रौढांमध्ये ती १००० मायक्रोग्रॅम्सच्या आसपास असते.आपल्या गरजेपेक्षा आणि कमाल मर्यादेपेक्षा अधिक मात्रेतील आयोडीन आपल्या शरीरात नियमितपणे जात असेल तर काय? जसे आयोडीनच्या अभावामुळे रोग होतात तसे अधिक्यामुळेही होतात. आयोडीनच्या अधिक मात्रेतील सेवनामुळे तोंडाची-घशाची जळजळ होणे, ताप, पोटदुखी, मळमळ, उलटी असे परिणाम होऊ शकतात. इतकेच नव्हे तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा गलगंड नावाचा विकार आयोडीनच्या अधिक्यामुळेही होऊ शकतो

‘अति सर्वत्र वर्जयेत' असे एक संस्कृतमधील विधान आहे. हे विधान आयोडीनच्या वापराबाबतही पाळणे गरजेचे आहे. आयोडीनयुक्त मीठाच्या बाबतीत ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी' अशी काहिशी अवस्था झाली आहे. ज्यांना आयोडीनची खरी गरज आहे, त्यांच्यासह सर्वांनाच जाणते अजाणतेपणी आयोडीनचा ‘बूस्टर डोस' मिळत आहे.

 याबाबतीत ज्यांना गरज आहे अशांनाच मीठाद्वारे आयोडीन पुरवले गेले पाहिजे. नफा कमवण्याच्या नादात मीठ उत्पादक कंपन्यांनी चालवलेल्या भिती दाखवणाऱ्या जाहिरातीथांबवून योग्य व शास्त्रीय माहितीयुक्त जाहिराती समोर आल्या पाहिजेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारे ‘आयोडीनयुक्त मीठ' हे नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांच्या खेळाचा केवळ एक नमुना उदाहरण आहे. अशा कित्येक बाबी आरोग्याच्या नावाने आपल्या माथी मारल्या जातात. आपण मात्र या भावनिकतेच्या आहारी न जाता शास्त्राच्या कसोटीवर टिकणाऱ्या बाबींवरच विश्वास दाखवायला हवा. आता यापुढे ‘आयोडीनयुक्त मीठा'च्या बाबतीत ‘नमक-हराम' राहीलेलंच बरं! -  तुषार म्हात्रे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शहर के हो गये, भीडमें खो गये!