शहर के हो गये, भीडमें खो गये!
शिक्षणासाठी मी मुंबईत आलो. मित्राला विचारले, तुझं गाव कुठलं? आम्हाला गाव नाही. मुंबई हेच आमचं गाव. ते ऐकून मला त्या मित्राची कीव आली. वाटले जगातला सगळ्यात गरीब प्राणी हाच असावा. कारण माझ्यासारखे त्याला मूळ गाव नव्हते (?). मला मूळ गाव आहे त्यामुळे मी किती श्रीमंत! क्षणभर माझी छाती गर्वाने फुलून आली! मुंबई मूलतः मराठी कोळी लोकांची. मुंबई नगरीत महाराष्ट्रातून आणि इतर भारतीय प्रांतांतूनही लोक येऊन वसले.
बसती बसाना खेल नहीं ।
बसते बसते बस जाती है
अशा प्रकारे मुंबई नगरी अस्तित्वात आली. वाढत गेली. म्हणूनच शाहीर प्ीे बापुराव म्हणाले,
मुंबई नगरी बडी बांका
जशी रावणाची लंका
वाजतो गं डंका
किती छान छान छान
ही मुंबई धनवंतांची, ज्ञानवंतांची, व्यापाऱ्यांची, उदीम्यांची, कलाकारखानदारांची, मजूरांची, कामगारांची, कलाकारांची, डाकूंची, मवाल्यांची तशीच चोरट्या-भुरट्यांचीही आहे. इथे आलेला कधी उपाशी मेलेला नाही. म्हणूनच मुंबईला बहुरंगी आणि बहुढंगी नगरीही म्हणतात.
खेड्यापेक्षा शहराची लोकसंख्या जास्त असते. शिवाय तेथे विविध प्रांतांतून येऊन लोक शिक्षण वा पोटापाण्यासाठी शहरात येऊन वसलेले असतात. तेथे विविध धर्माचे, विविध भाषा बोलणारे, निरनिराळे उद्योग-व्यवसाय करणारे लोक असतात. गावच्यासारखा इथे जातिभेद पाळून चालत नाही. खेड्यातही जातपात पाळणे हल्ली कमी होत चालले आहे. हा बदल सकारात्मक असून चांगलाच आहे. म्हणूनच शहराकडे चला असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाला उपदेश करीत असत. तो योग्यच होता.
या उलट खेड्याकडे चला असे महात्मा गांधी सांगत असत. त्यात खेड्यांची स्वयंपूर्णता, आदर्श देशी परंपरांचे जतन, शुध्द हवामान, शुध्द जल, म्हणजेच शुद्ध पर्यावरण या गोष्टी विचारात घेतल्या होत्या. त्याही वावग्या नव्हत्या.
तरीही गाव या कल्पनेशी आपले भावनिक नाते जडलेले असते. भावनिक नाळ जुळलेली असते. त्यामुळे शहरात वसलेल्या लोकांना आपल्या मूळ स्थानाविषयी, मूळ गावाविषयी ममत्व वाटणे साहजिक आहे.
एक प्यारा-सा गांव, उसमें पीपल की छांव
छांव में आशियां था, एक छोटा जहां था
छोड़कर उस गांव को, घनी छांव को
शहर के हो गये हैं
भीड़ में खो गये हैं...
एक गाव होते. तिथे पिंपळाच्या झाडाची सावली होती. त्या सावलीत आमचे घर होते. ते एक छोटेसे जगच होते. ते गाव सोडून, ती घनदाट सावली सोडून आम्ही शहरवासी झालो. तिथल्या गर्दीत हरवून गेलो!...
किती भावनाशील कविता! गाव आणि शहरातील विरोधाभास कवीने किती सुंदर शब्दांतून व्यक्त केला आहे! - नाना ढवळे