२१ व्या शतकातही अंधश्रध्दा आजार बळावलेलाच!
एखादे कर्मकांड तर्काला पटत नाही म्हणून ते करु नये असे बुध्दिला वाटते. पण परंपरेने चालत आल्यामुळे ते केलेच पाहिजे असा भावनेचा हट्ट असतो. अशी तर्काविहीत मानसिकता म्हणजे श्रध्दा! श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात तत्वतः भेद नाही. पण ज्या श्रध्देपायी माणसाची लक्षणीय प्रमाणात आर्थिक हानी होते त्या श्रध्देला अंधश्रध्दा म्हणता येईल.
श्रध्दा माणसाला मानसिक सामर्थ्य देते, तर अंधश्रध्दा माणसाला हतबल करते. श्रध्दा आत्मविश्वास वाढवते, तर अंधश्रध्दा असहाय करते. श्रध्दा आणि अंधश्रध्दा यांच्यात एक धूसर सीमा रेषा असते. ही रेषा कधी ओलांडली जाईल आणि श्रध्दा अंधश्रध्देत कधी रुपांतर होईल सांगता येत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते, अज्ञान, अशिक्षितपणा, गरीबी यामुळे अंधश्रध्दा वाढते. पण हल्लीच्या काळात सुशिक्षित, सधन कुटूंबातील व्यक्ती सुध्दा बाबा-बुवांच्या, माताजीच्या मागे जाताना दिसतात. इथे तोच मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे कोणत्या व्यक्तीवर श्रध्दा असावी किंवा नसावी हा ज्याचा त्याचा वैयक्त्तिीक प्रश्न आहे. मात्र त्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास टाकून आंधळेपणाने विसंबून राहणे ही मात्र अंधश्रध्दा आहे.
आदिवासी समाज, ग्रामीण भाग, शहरी भाग, उच्चशिक्षित, उच्च मध्यम वर्गीय, अति श्रीमंत अशा कुठल्याही वर्गातील माणूस असून त्याच्या काही श्रध्दा, समजूती असतात. अंधश्रध्दा ही सर्वात जास्त आदिवासी समाजात आणि इतरत्र पाहायला मिळते. तसा विचार केला तर या आदिवासी समाजात प्रचंड गरीबी, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, मुख्य म्हणजे गरीबीपेक्षाही दैनंदिन गरजाच ज्यांच्या पुर्ण होत नाही, त्यांना तुम्ही शिक्षण काय देणार? सतत आर्थिक गर्तेत असणारा हा समाज अंधश्रध्देत पार गुरुफुटून गेलेला आपल्याला आढळून येईल. आदिवासींच्या वसाहतीत गेल्यावर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की, या समाजात एक समज आहे तो म्हणजे "बाळ जन्माला आल्यावर त्याला लगेच आईचं दूध द्यायचं नाही”. खरं तर हेच त्यांच्या मुलांच्या कुपोषणाच कारण नाही काय? अशा वेळी इथे भक्ताचं प्राबल्य अधिक पाहायला मिळते.
वर्धा रोडवरील आदिवासी कॉलनी मध्ये एक घटना पाहायला मिळाली. एका घरात एका बाईने बाळाला जन्म दिले तेंव्हा तिला खुप रक्त प्रवाह झाला. तिची सासू यावर उपाय म्हणून भगताने दिलेली विभूती लावत होती. तेंव्हा मित्रांनी डॉक्टर आणले. डॉक्टरांनी तपासल्यावर ग्लूकोज द्यायला सांगितले. सासूने विरोध सुरु केला. "पोटात काही द्यायचं नाही असे भगताने सांगितले, फक्त विभूती लावायची.” मग मात्र मी त्या सासूला व बाळाच्या वडीलांना समजवण्याचा प्रयत्न केला. उद्या आईला काही झालं, तर तू दुसरं लग्न करशील, पण बाळाचा विचार कर. त्याला आई नको कां? खूप विणवण्या केल्यानंतर कुठे ते तयार झाले. शेवटी तिला दवाखान्यात दाखल करुन सलाईन लावले. दोन-तीन दिवसांनी ती खणखणीत घरी येवून चूलीजवळ भाकरी थापतांना दिसली. तेव्हा दोन जीव वाचवण्याचं समाधान मिळाले. यांच्यामध्ये आपणांस मद्य प्राशन करणे, जनावरांचा बळी देणे, मुलींची लहान वयात लग्न करणे या प्रथा आजही प्रामुख्याने पाहायला मिळतात. पण त्यांच्यात आपल्यापेक्षा माणूसकी जास्त आहे आणि बलात्काराच प्रमाणही जवळ-जवळ शून्यच आहे. म्हणजे आदिवासी पुरुषाने आदिवासी महिलेवर बलात्कार केला अशी घटना ऐकीवात नाही. कारण ते बहुतांशी निसर्गाच्या सानिध्यात खुलेपणाने वाढत असतात. त्यामूळे शारिरिक आकर्षणाचा भाग कमी असतो.
आदिवासी समाजाला बघायचं झाल्यास (त्यात त्यांचे संस्कार) ग्रामीण भाग, खेडी, गाव, अशा भागात आपण नजर टाकली तर एखादा भोंदू बाबा त्यांचे चमत्कार, अंगारे, ताईत, गंडे-दोरे या ठिकाणी त्यांचीच चलती असते. लिंबू मिर्ची आणि उलट्या टांगलेल्या काळ्या बाहुल्यांचा तर बड प्रस्थ अनेक गावांमध्ये महिलांवर बरीच बंधन असतात. छोटया-छोट्या समजूती अंधश्रध्दा आहेतच. स्त्रियांनी मासिक धर्म पाळायचा, तीन दिवस वेगळे राहायचं. स्वयंपाक घरात पाऊल टाकायच नाही, कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, आपल्या भांड्यामध्येच जेवायचं, कुणावरही सावली पडू देता कामा नये याची काळजी घ्यावी. अशा कितीतरी समजूती आजच्या काळातही असल्याचा आपल्याला दिसून येते. ही मानसिकता बदलली गेली पाहिजे. विज्ञानयुगात आपण वाटचाल करीत आहोत यांचे भान ठेवावं अन् जुन्या रुढीला मुठमाती द्यावी.
शहरी भागाकडे आपण वळलो आणि मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये आपण डोकावलो तर लक्षात येईल की, अंधश्रध्देने इथेही आपले हात-पाय पसरलेले आहेत. एक गोष्ट खरी की, माणूस कशावरही श्रध्दा ठेवून आपलं चांगलं व्हावं ही प्रार्थना करीत असतो. एखादी अज्ञात शक्ती असते जिला तुम्ही देव म्हणा नाहीतर काहीही म्हणा, फक्त त्याच्या आहारी जाऊ नका. माणुस अशा गोष्टींकडे केव्हा वळतो याचं अगदी बरोबर वर्णन कवि मंगेश पाडगांवकरांनी केलं आहे. ते म्हणतात ‘माणसे खपाट खंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली'. अशा माणसांना आधार हवा असतो. सर्व उपाय करुन थकल्यावर माणुस कुठेतरी विश्वास ठेवतो. त्यावेळी कुणीतरी एखाद्या बाबाचं नांव सुचवितो. त्याच्यामुळे कसा फायदा झाला तो ते सांगतो. त्या बाबाकडे गेल्यावर ते काहीतरी उपासना करायला सांगतात. त्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. मन घट्ट झालं की, आपोआपच पुढचं सगळं व्यवस्थित होतं. पण पुढे जाऊन आपलं काम सोडून त्याच्याच आहारी जाणं, दुसऱ्यांनाही त्याच मार्गावर चालण्याचा हट्ट करणे चुकीचं आहे. काहीजणांना आपण कुणाचेतरी भक्त आहोत, एखाद्या मोठ्या बाबा-बुवा कडे जातो, हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटतं. अर्थात अशी अनेक उदाहरणे देता येतील. पुण्यासारख्या सुसंस्कृत विद्येच्या माहेरघरात राहणाऱ्या उच्च पदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना एका दुर्धर रोगानं पछाडलं. त्याचे औषधोपचार सुरु असतांना त्यांना एका तरुणीने काही मंत्र-तंत्र सांगीतले. ते अधिकारी इतके आधीन झाले की, औषधोपचार सोडुन त्याच गोष्टीच्या मागे लागले. त्या तरुणीने मात्र त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला. शेवटी त्या अधिकाऱ्याचा आजार बळावला त्यात त्यांचं निधन झालं, हे कसलं जीव घेणं मंत्र तंत्र? अशा मंत्र, तंत्र, परंपरेच्या दडपणामुळे आणि भयावह श्रध्देमुळे अनेकांना त्या विधीचा त्याग करता येत नाही. पण जे लोक निर्भयपणे या रुढी परंपरा तोडतात, ते उपरोक्त जोखडातून कायमचे मुक्त होतात; त्यांना कोणतीही इजा होत नाही, वाईटही घडत नाही. ही मानसिकता बदलून स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे, कारण परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे. त्यामुळे विज्ञानवादी, तर्कर्निष्ट बनण्याची गरज आहे.
हल्ली केवळ बाबांचा आर्शीवाद उपदेश नसतो. तर त्यांचं पेन, लॉकेट यांची ही आधार त्यांना वाटतो. पुन्हा-पुन्हा सांगावसं वाटते. अंनिस श्रध्देला विरोध करत नाही; पण अध्यात्मात ही प्रॉडक्ट कुठुन येतात? कुणीतरी बाबाची वही, पेन, मोबाईल, मागे गाडी त्यांच्यात त्यांचे फोटो हे सगळं कशाला हवं? त्यांच्या नावाने तयार झालेले औषध, साबण, दंत मंजन, तेल, क्रिम, चुर्ण या सारख्या पदार्थांची गरजच काय? अध्यात्मात हे मार्केटिंग कुठुन आलं? तसंच देवाचं नांव लिहुन वहया पूर्ण करणे, हा उद्योग कशाकरीता? म्हणजे जेवढया वहया जास्त, तेवढया नंबर वनचा भक्त, हे कुठलं मोजमाप? या देशात ३३ कोटी देव असतांना, हे देवाचे अवतार कशाला हवे? हे सर्व थोतांड वाटत नाही काय? अंधश्रध्दा रुजविण्याचे असले प्रकार थांबले पाहिजेत. कारण जिथे अध्यात्म संपतं तिथे विज्ञान सुरु होतं.
-प्रभाकर सोमकुवर