स्वप्ननगरी आणि मी

सिनेमाचे वेड अनेकांना शून्यातून स्टार करुन गेले आहे आणि अनेकांना शून्यवर यावे लागले आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. नाटकात काम करण्यासाठी म्हणून मी YAG  या नाट्य ग्रुप मध्ये सभासद झालो. मात्र आमचा दिग्दर्शक शफी इनामदार याने माझी ॲविंटंग बघून स्पष्ट सांगितले "तू या माध्यमातून अलिप्त हो, तुला नाही जमायचे...!” आणि मी त्यांतून खरंच दूर झालो. आणि आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रीत केले.

भाऊचा धक्का शांत होता. रोहिणी नक्षत्र सुरु झाले. म्हणजे मॉन्सून जवळ आला. समुद्रात लाटांची उसळी वाढली. म्हणूनच पॅसेंजर बोटी दाभोळ, रत्नागिरी या रूटवरून जाणेयेणे बंद झाल्याने शाळा सुरु व्हायच्या आत मुंबईस खुष्कीच्या मार्गे जाणे आवश्यक होते. होता तो पर्यायी मार्ग बंद झाला. नवी मुंबई येथील क्रिक ब्रीज अजून झाला नव्हता. थेट मुंबईपर्यंत जाणे म्हणजे ठाणे मार्गे लालपरीत बसून चौदा तासांच्या प्रवासाशिवाय पर्याय नव्हता. एष्टी आम्हांस बाँबे सेंट्रल येथे स्वप्न नगरीत घेऊन आली. प्रवासात विंडो सीटवर बसल्याने शहरातील कडेच्या भिंतीवरील सिनेमा जाहिराती पोस्टर्स चिकटवलेले स्पष्ट दिसत होते. नकळतपणे त्याकडे लक्ष गेले. असला हा चकचकितपणा ग्रामीण भागातील लोकांना नवीन होता.

फोर्ट भागातील एका खोलीत मी स्थिरावलो. मराठी माध्यमातून शिकवणारी शाळा धोबीतलाव येथे असल्याने तेथे पायी जावे लागत असे. वाटेत सिनेमा थिएटर्स बरेच दिसायचे. ज्याचा कळत नकळत परिणाम माझ्या मनांवर निश्चितच होऊ लागला. हिंदी सिनेमा, गाणी, हिरो-हिरॉईन असला स्वप्नील गॉसिपी प्रकार मनाला आवडू लागला. नवीन मित्र, बोलण्यातून फक्त सिनेमाची गोष्ट या व्यतिरिक्त काहीच नसायचे. हिंदी सिनेमा पाहण्यासाठी म्हणून मन उतावीळ झाले. ग्रामीण भागातून शहराकडे आलेल्यांची अवस्था जशी होते त्यांस मी पर्याय नव्हतो.

एके दिवशी फोर्ट भागातील सेंट्रल लायब्ररीच्या आवारात सिनेमाची शूटींग होत असल्याचे कुणितरी सांगितले. हाफ पॅन्ट, शर्ट इन करून लगेच मी जाऊन पोहोचलो सेंट्रल लायब्ररीच्या फेन्सिंग पर्यँत! खरंतर माझ्या आधीच कित्येक सिनेमा वेडे तिकडे जाऊन भर उन्हात उभे असलेले दिसले. एका उंच अश्या शिडीवर एक कॅमेरामन आपला तिसरा डोळा सोबत घेऊन बसला होता. सिनेमाचे नाव होते जुआरी! त्यांत काम करणारे नायक नायिका होते नंदा आणि शशी कपूर! शेजारी उभा असलेला सिनेमाचा एक महाज्ञानी सिनेमाच्या विविध गोष्टी न विचारताच आम्हांस सांगत होता. त्याला विचारलं कुणी? असे बोलघेवडे त्याकाळी ज्यास्त असायचे. गप्पा अशाच रंगत गेल्या. जानेवारी असूनही उन्हाचे चटके जाणवू लागले, यावरुन सिनेमाचे वेड पार उंचीवर गेलेले होते. एका फियाट कारमधून स्वतः शशी कपूर शूटींग जेथे होणार तेथे येऊन पोहोचला. नियोजित ठिकाणी कार येऊन थांबली.  गाडीतून मागे दोन विदेशी कुत्रे बसलेले दिसले. नशिबवान कुत्रे! सिनेमाची नायिका अजून येणार असे कळल्यावर थोड्याच वेळात शशी कपूरची कार निघून गेली. आम्ही बघे लोक निराश झालो. ज्या जागी उभे राहिलो ती जागा तत्काळ सोडून जाणे शक्य नव्हते. तहान, भूक कसलेच भान नव्हते. शूटींग कशी होते, त्यांतील कलाकार प्रत्यक्षांत कसे दिसतात? हे कुतुहल पूर्वी खूपच असायचे. त्यामुळेच कदाचित इंग्लिश, हिंदी, उर्दू, मराठी आणि इतर भाषेत मासिक साप्ताहिक फिल्मी मॅगझीन अनेक प्रकाशित व्हायचे. SCREEN नामक विकली न्यूजपेपर शहरातील सलूनमध्ये उपलब्ध असायचा. इंग्रजी ताकात मुरलेली असल्याने स्क्रीन पेपरातील छापून आलेले रंगीत फ़ोटो बघून तृप्त व्हायचे, एवढेच! जुआरी नामक सिनेमाची शूटींग एका दिवसात आटोपली. नंदा, शशी कपूर आणि आगा त्या दिवशी शुटींगमध्ये दिसले. पुढे तो सिनेमा केव्हा पूर्ण झाला आणि केव्हा रिलीज झाला ते कळलेच नाही. मात्र मी पाहिलेली हिंदी सिनेमाची शूटींग जुआरी पासून सुरु झाली.

त्यानंतर कळलं की मुंबई येथील डोंगरी भागातील खोजा जमातखाना येथील भव्यदिव्य अशा इमारतीच्या टेरेसवरुन उड्या मारत जाणारा लीडर सिनेमातील नायक दिलीप कुमार याची शूटींग पाहण्यासाठी म्हणून आम्ही काही मित्र ४७ बसने फोर्ट ते डोंगरी प्रवास केला. निळ्या रंगातील पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. कसेबसे नजर चुकवून जमातखाना इमारतीपयर्ंत पोहोचलो खरे; पण नंतर कळले की एका इमारतीच्या टेरेसवरून दुसरीकडे उड्या घेणारा तो खराखुरा नायक नसून त्याचा डमी उड्या मारत होता. ज्यावेळी लीडर सिनेमा रिलीज झाला तेव्हाचे ते चित्रकरण प्रत्यक्ष दाखवण्यात आले, अर्थातच बघ्यांची संख्या हजारात असेल. दिलीप कुमार यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मात्र हुकली. ती पुढे केव्हाच पूर्ण होऊ शकली नाही.

आमच्या काळातले प्रख्यात नायक म्हणजे दिलीप-राज-देव या त्रिदेवांना आम्ही केव्हांच प्रत्यक्षात नाही पाहू शकलो. आणि म्हणूनच हळूहळू ते क्रेझ कमी कमी होत गेले. पुढे शूटींग पाहण्याचा तो नाद सोडून दिला. कॉलेजमध्ये आल्यावर तर नकोसे झाले. शाळेत असतांनाचा तो सिने नायक-नायिकांना प्रत्यक्ष पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. प्रत्यक्षात शूटींग पहायची असेल तर आऊटडोर ऐवजी इन्डोरमध्ये जायची संधी मिळायला हवी होती. शहरांत मेहबूब स्टुडीओ, आरके, फिल्मिस्तान इत्यादी त्याकाळी मशहुर होते पण त्या स्टुडिओज मध्ये आत प्रवेश मिळेल का? बाहेर उभा दरबान पाहताच बोबडी वळायची! हिंदी, मराठी फिल्म्सची शूटींग कशी होते ते मला आजपर्यंत केव्हांच पहायला मिळाले नाही. स्वप्न ते स्वप्नच राहिले.

पडद्यावर दिसणारे लोक हे आपल्या सारखेच हाडामांसाचे माणूस असतात. फक्त ते कथानकात गुंतून पडद्यावर दिसतात म्हणून तेवढे अलिप्त वाटतात. हळूहळू कॉलेजात पृथ्वीराज कपूर, राजकुमार, साधना, रवी अशा नामवंतांचे विशेष कार्यक्रमात येणे होऊ लागले, मग ते आकर्षण कमी होऊ लागले. एकदां तर चक्क शूटींग सुरु होती आणि आम्हां मित्रांना त्यात सामील व्हावे असे सांगण्यात आले. शूट एका हॉटेलमध्ये सुरु होते, राखी आणि नवीन निश्चल या कलाकारांचा सहभाग होता.  हॉटेलच्या गॅलरीतून नायक रस्त्यावर उडी घेतो. खाली लोकांचा जमाव होताच. त्यांत आम्ही कॉलेज मित्रही सामील झालो. सिनेमाचे नाव आठवत नाही पण टॉकीजमध्ये गेल्यावर कळले तो सीनच एडिटिंगमध्ये कट झाला होता. नाजीमा, धुमाळ, मेहमूद असे सिने कलाकार अगदी जवळून पाहिल्याचे आठवते. आकाशवाणी येथे जानिसार अखतर यांची गजल रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून त्या काळातील लोकप्रिय गायक मुकेश यांना जवळुन पाहिले, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून साहिर लुधियानवी आणि नर्गिस दत्त हे कलाकार तेथे आले होते. ते पाहून चकित होण्यासारखे वाटले. रेकॉर्डिंग कुणाचे त्यांना शुभेच्छा देतो कोण? आत्ता हे सारे कथानक वाटत असावे, कारण सध्याचा काळ हा पाय खेचण्याचा काळ आहे. "हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डूबेंगे!" कुणी कुणाचे भले होत असेल तर ते काहीना नाही बघवत! साहित्य, कला या क्षेत्रात तर चक्क राजकीय पक्षांना लाजवेल अशी परिस्थिती आहे. कमालीचा दुटप्पीपणा पसरतोय. कोरोनापेक्षाही घातक रोग आहे हा!

सिनेमाचे वेड अनेकांना शून्यातून स्टार करुन गेले आहे आणि अनेकांना शून्यवर यावे लागले आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. नाटकात काम करण्यासाठी म्हणून मी YAG  या नाट्य ग्रुप मध्ये सभासद झालो. मात्र आमचा दिग्दर्शक शफी इनामदार याने माझी एकटिंग बघून स्पष्ट सांगितले "तू या माध्यमातून अलिप्त हो, तुला नाही जमायचे...!” आणि मी त्यांतून खरंच दूर झालो. आणि आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रीत केले. नाटक - सिनेमा हे विश्व फार कठीण असते. स्ट्रगल या शब्दाचा अर्थ आणि त्याची व्याप्ती फार वेगळी आहे. आजच्या AI माध्यमातून विचार केला तर जग फार वेगळ्या वळणावर उभे असल्याचा भास होतो, खरे काय? काहिच कळत नाही. सॉपटवेअर, हार्डवेअर यात अशिक्षित राहिल्याने कदाचित तसे वाटत असावे. मनाची तडफ, ओढ, अंतर्मुख होणे म्हणजे काय?AI यांत खरंच मदत करू शकेल का? का निव्वळ व्यवहारीपणा असेल?

सिनेमाच्या पडद्यावर दिसणारा चकचकीतपणा वाटतो त्याहीपेक्षा वेगळा आहे. ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे असेल त्यांनी मनाची तयारी आणि विद्वान मंडळींचा सल्ला घ्यावा. आपल्याला वाटते तेवढे जगणे सोपे या विश्वात नाही. मुळात अशा अधांतरी विश्वात स्थिरावणे...हे एक स्वप्नच म्हणावे लागेल. स्टार आणि कलाकार यांतील अंतर दिवसेंदिवस वाढत आहे. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स तसेच ओटीटी अशा विविध मध्यमातून नवीन सिनेमा स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या मेहनतीचे फळ शुक्रवारी फर्स्ट शो नंतर निश्चित केले जाणार असेल तर सिनेमा हे माध्यम खरंच वाळवंटातील मृगजळ होऊ नये म्हणजे मिळवले. स्वप्न नगरीतील अनेकांनी प्रयत्न केले, यश म्हणजे काय? हा प्रश्न अजूनतरी  अनुत्तरित राहिला आहे. - इक्बाल शर्फ मुकादम 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

माणसं कशी ओळखावी?