माणसं कशी ओळखावी?     

आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं भेटत असतात. काही हसऱ्या चेहऱ्याने भेटतात, काही मूकपणे, काही उत्साहाने, काही नकळत स्पर्शून जातात. पण या साऱ्या भेटींमध्ये "आपली माणसं” कोणती? हे ओळखणं खरंच सोपं आहे का?

माणसाचा माणसाशी संवाद होतो तो दोन प्रकारचा. औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिक संवाद ठरवलेला असतो, नियमात बसवलेला. पण अनौपचारिक संवाद हा मनाचा असतो. खरं बोलणं, मोकळेपणाचं बोलणं. पण याच संवादांमध्ये माणसाच्या मनाचा खरा ठाव आपल्याला लागत नाही.

कधी कधी कोणी आपुलकीने, प्रेमाने बोलतं आणि आपण त्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. आपलेपणाची भावना निर्माण होते. पण हळूहळू, नकळत, तेच आपलेपण कधी आपल्या आत खोल घाव करतं, कळतही नाही.

काही माणसं खूप बोलकी असतात, तर काही जपून बोलतात. मनात एक, आणि तोंडावर दुसरं. अशा डबल ढोलकी व्यक्ती ओळखणं खूप कठीण असतं. आपण सगळ्यांना आपुलकीने जवळ करतो, कुठलाही वाद, गैरव्यवहार न करता. पण कधी कधी हीच माणसं आपल्या पाठीमागे घाव करतात. जे आपण उशीराच जाणतो आणि तेव्हा वेळ निसटलेली असते.

काही लोक खूप गोड बोलून आपल्याकडून सर्व माहिती घेतात, आणि ती पुढे सजवून दुसऱ्यापर्यंत पोहोचवतात. त्यात त्यांना काहीच अडचण वाटत नाही. तर काही लोक खरोखरच साधे असतात, स्वच्छ मनाचे. ते मन उघडं करत बोलतात, कारण त्यांना समोरच्याचा द्वेष, हेवा, कपट दिसतच नाही. कारण ते स्वतः तसं कधीच वागत नाहीत.
अशा स्वच्छ मनाच्या व्यक्तीवरही पाठीमागून वार होतो. त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातो. हे करणारी व्यक्ती खोटं बोलून, चुकीच्या मार्गांचा अवलंब करून स्वतः श्रेष्ठ ठरवू पाहते. यासाठी माणसांशी बोलताना, वागताना, थोडं जपूनच वागायला हवं. नाहीतर झालेलं नुकसान काहीच भरून येणार नाही.

"सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत, खोटं गावभर फिरून येतं.”

यामुळेच माणसं ओळखायला शिकणं अत्यावश्यक आहे. समोर गोड बोलणारी प्रत्येक व्यक्ती आपली असतो असं समजणं चुकीचं आहे. अशा लोकांपासून काही अंतर ठेवणं हेच शहाणपण. आपण सर्वांना बदलू शकत नाही, पण स्वतःमध्ये नक्कीच बदल करू शकतो. माणसं ओळखण्याचा यक्षप्रश्न आहे, पण प्रयत्न करणं आवश्यक आहे.

स्वाभिमान असलेली, स्वबळावर उभी राहणारी, प्रामाणिक व्यक्तीच आयुष्यात खऱ्या अर्थाने संघर्ष करते. अशा व्यक्तीने कधीही खचून जाऊ नये. प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मान टिकवणं हेच खरं यश आहे. कधी कधी संवादात मन दुखावलं जातं. पण जर आपण कुणाचं मन दुखावलं, तर त्याचा खरा पश्चाताप होतो. कारण आपला आत्मसन्मान तिथे धक्का खातो. शांत झोपायचं असेल, तर वागण्यात आणि बोलण्यात प्रामाणिकपणा हवा.

जगाचा निरोप घेताना मन नितळ असायला हवं. आपल्यामुळे कुणाला दुःख झालं नाही, अशी जाणीव मनात असायला हवी. एखाद्याच्या यशावर मनापासून आनंद होणं - अस्सल आणि निर्मळ हृदयाची खूण. स्वतःच्या त्रासाबद्दल बोलत न बसता दुसऱ्याचा विचार करणं हे खूप दुर्मिळ असतं. शेवटी काय करावं?

प्रत्येकाशी नम्रपणे, पण सावधगिरीने वागावं. नुसत्या शब्दांवर नाही, तर कृतींवर विश्वास ठेवावा. आपलं स्वतःचं मनसुद्धा वेळोवेळी तपासून पाहावं आपल्यातून कुठे डबल ढोलकीपणा तर होत नाही ना? मग शेवटी प्रश्न राहतोच. माणसं ओळखायला कधी जमेल का? कदाचित जमेल, कदाचित नाही. पण जेव्हा माणूस डबल ढोलकी वागतो, तेव्हा तो स्वतःला हरवतो. आपण तरी खरं माणूस म्हणून जगावं, हेच खूप आहे.

माणसं जोडणं सोडून, आता माणसं ओळखणं गरजेचं वाटतं...
-सौ. नेहा विलास मनुचारी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्रत्युत्तर देणारी मनगटे!