देवमाणूस
महानगरांतील व महागड्या वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या संख्येने पैशाच्या मागे धावणाऱ्या शहरात आल्यावर गोंधळल्यासारखे होते खरे. कुठे किती पैसे खर्च करावे लागतील याचा अंदाज येत नाही. पण यालाही सुखद अपवाद असतात. आजही खरी देवमाणसे अवतीभवती आहेत. त्यांच्यामुळे या व्यवहारी जगात आजही माणूसकी शिल्लक आहे.
देवमाणूस हे नाव तोंडातून काढले रे काढले की, आपल्या डोळ्यासमोर झी मराठी वाहीनीवरून प्रसारित झालेली देवमाणूस ही मालिका उभी राहते. या मालिकेत देव माणसाच्या वेशात एक सैतान डॉक्टर जो पैसे कमवण्यासाठी वाटेल त्या स्तरावर जावून समाजातील लोकांना लुटण्याचा व त्यांना कायम स्वरूपात संपवून त्यांची संपत्ती हडप करायचे कट कारस्थाने रचत असे, अशी काहीसी कथा होती. या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात डॉक्टर व एकुणच वैद्यकीय व्यवसायाला मनोरंजनासाठी बदनाम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न दाखवून टी. आर. पी. वाढवण्यासाठी उपयोग केला असावा.
सदर मालिकेतून दाखवलेली कथा ही प्रत्यक्ष घडलेली खरी घटना होती हे खरे जरी मानले तरी, एवढ्या खालच्या स्तरावर ह्या घटना घडल्या असतीलच असे म्हणता येणार नाही. कारण छोट्याशा गावात या अशा घटना फार काळ लपून राहत नाहीत. त्या लगेच उघड्या पाडल्या जातात. पण हेही खरं की, कोणताही डॉक्टर फुकटात उपचारही करीत नाहीत. आज आपण सरकारी दवाखान्यात जर गेलो तरी तेथे मोफत उपचार केले जात नाहीत. ग्रामीण भागात जिथे एम. बी. बी. एस. डॉक्टर्स उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी, ई. पदवीधर डॉक्टर त्यांना वाटेल ती तपासणी फी आकारतात. मग त्यांच्या औषधांची मात्रा लागू पडो अथवा न पडो हा पुढचा प्रश्न. पण मला अलिकडेच आलेला अनुभव फार सुखद व माझ्या कल्पनेपलीकडचा आहे.
आमची कन्या चैत्रालीच्या चेहऱ्यावर येत असलेल्या पिंपल्सच्या उपचारासाठी वाशी, नवी मुंबई येथे डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टरची अपॉइंटमेंट अगोदरच घेतली होती. आम्ही दिलेल्या वेळेच्या आधी त्यांच्या क्लिनिकमध्ये पोहचलो. रिसेप्शन काऊंटरवर चौकशी करून आम्ही आमची नोंदणी अपडेट केली. डॉक्टर येण्यासाठी थोडा वेळ होणार होता. तेवढ्या त्या वेळात एसीच्या गार हवेने घामाजलेल्या शरिराला कोरडेपणा आला होता. त्यामुळे शरिराला थंडावा आला. मुंबईमध्ये अशा उन्हाळ्यात एसीची हवा हाच एकमेव पर्याय आहे. असा काहीसा विचार करून मन स्थिर होत असतांना चैत्राली तुपारे नाव कानावर पडले. याचा अर्थ डॉक्टर ओपीडीत आले होते. मिनाक्षी व चैत्राली डॉक्टरच्या कक्षात गेल्या. मी तेवढ्या वेळात बसल्याबसल्या हलकेच तेथिल सोकेस मध्ये लावलेल्या डॉक्टरांच्या पदवी व इतर कामगिरीबद्दल ठेवलेल्या चित्रांवरून नजर मारली. या त्यांच्या कामगिरीवरून डॉक्टरसाहेबांचे सामाजिक दायित्व लक्षात आले होते. पंधरा मिनिटात दोघी मायलेकी डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन हातात घेऊन माझ्या पुढ्यात उभ्या राहिल्या. लगेच तपासणी झाल्याने तिचा प्रॉब्लेम जास्त काळजी करण्यासारखा नसल्याचे लक्षात आले. रिसेप्शनिस्टने ते प्रिस्क्रिप्शन त्यांच्या पेशंटच्या फाईलमध्ये टाकले व माझ्याकडे देत तपासणी फी ची मागणी केली. मी नगदी फी त्याच्या हातात दिली. तेव्हा त्यांनी आपण कुठून आले आहेत? हा प्रश्न मला विचारला, तेव्हा आम्ही नागोठणे, रायगड येथून आलो आहोत असे मी त्यांना सांगितले. त्यांनी माझ्या बोलण्याला प्रतिसाद देत म्हटले की, डॉक्टर ऑनलाईन मार्गदर्शन करतात. पुढच्या वेळेस तुम्हाला ईकडे न येता डॉक्टरांचा सल्ला घेता येईल हा पर्याय आमच्या हितासाठी सांगितला होता. तेव्हा मी त्यांना माझी मुलगी तेरणा दंतमहाविद्यालय, नेरूळ इथेच राहाते. असे म्हटल्याबरोबर, त्यांनी क्षणार्धात मी दिलेली तपासणी फी माझ्या हातात देत म्हटले की, डॉक्टर विद्यार्थी, आर्मी, पोलीस, तसेच वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या कडून तपासणी फी घेत नाहीत.
या त्यांच्या बोलण्याचे मला फार आश्चर्य वाटले. क्षणभर या धावत्या जगाचा मला विसर पडला. मला आपण महाकाय अशा मुंबई शहरातील व महागड्या वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या संख्येने पैशाच्या मागे धावणाऱ्या शहरात आहोत याचा वेध घेता येत नव्हता. पण हे खरे होते. नकळत देवमाणूस मालिकेतील पात्र माझ्या पुढे येऊन मलाच वेड्यात काढतात की काय याचा भास झाला. पण मी भानावर येत थेट डॉक्टर साहेबांचे या त्यांच्या समाजोपयोगी कामाबद्दल धन्यवाद मानण्यास त्यांच्या दालनात गेलो. प्रत्यक्ष त्यांचे आभार मानले व त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून आम्ही सर्व तेथून बाहेर पडलो. आजही खरे देवमाणूस जिवंत आहेत. यामुळे कळले की आजही माणूसकी शिल्लक आहे, ही माझ्या मनाची धारणा करीत आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. - डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे