जे घडलं तेच वास्तव

फुले चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन जो वाद निर्माण करण्यात आला त्या वादाने महात्मा फुले यांच्या कार्याची आणि विचारांची प्रासंगिकता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. हा वाद केवळ चित्रपटापुरता मय्राादित नसून समाजातील खोलवर रुजलेल्या जाती आणि सत्तेच्या समीकरणांशी निगडीत आहे. फुले यांनी म्हटले होते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात, ज्यांचे निर्धार ठाम असतात. आजही त्यांचे विचार समाजाला दिशा दाखवतात, पण त्याचवेळी काहींच्या अस्वस्थतेचे कारण बनतात. हा वाद संपला तरी फुले यांचे विचार आणि त्यांचा वारसा कायम प्रेरणा देत राहील.

‘फुले' चित्रपटात महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील कथा दर्शाविली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले; तर प्रतीक गांधी यांनी महात्मा फुले आणि पत्रलेखा यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. हे दोघं फक्त व्यक्तिरेखा पाहून प्रभावित झाले नाहीत, तर तो चित्रपट ज्याप्रकारे घडविला गेला आहे त्या प्रक्रियेविषयी जाणून त्यांच्यातली उर्मी वाढली. झी स्टुडिओज, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक सुधारणा आणि शिक्षणाचे महत्व आणि शिक्षणासाठी केलेल्या कार्यावर लक्ष केंद्रित करतो.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले या हिंदी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने सुरुवातीला ‘यु' प्रमाणपत्र दिले होते. मात्र काही संघटनांच्या दबावामुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही संवाद आणि दृश्ये काढण्याचे आदेश दिले, ज्यामुळे वाद अधिकच चिघळला. या वादामागील कारणे त्याचे स्वरूप आणि महात्मा फुले यांच्या विचारांना आजही होणारा विरोध याबाबत चित्रपटातील दृश्यांचा आक्षेप घेतला. यामध्ये महार, मांग, पेशवाई, मनुस्मृती यांसारखे शब्द आणि जाती व्यवस्थेचा उल्लेख करणारे ‘व्हॉइस ओव्हर' हटवण्यात आले. यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाला. हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी अर्थात जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणाने हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आणि नंतरही तो मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला. चित्रपटातील काही दृश्यांना ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासंघासारख्या संघटनांनी आक्षेप घेतला. तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी हा चित्रपट ऐतिहासिक सत्यावर आधारित असल्याचा दावा केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, महात्मा फुले यांचे वाङमय  आणि सत्य चित्रपटात दाखविले आहे. सेन्सॉर बोर्डानें यात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे.

महाराष्ट्रातील सगळ्याच थोर इतिहास पुरुषांनी उभारलेले कार्य, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तळागाळातील समाजाच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांच्या वाट्याला आलेले संघर्ष, त्या त्या काळात त्यांनी परिस्थितीनुसार आणि त्यांच्या वैचारिक क्षमतेनुसार घेतलेले निर्णय या सगळ्याच गोष्टींना आजच्या काळात नवनव्या वादाचं परिमाण तेवढं लाभलं आहे. अशा परिस्थितीत एखाद्या महात्म्याची परिचयाची जीवनकथा पडद्यावर साकारतांनाही दिग्दर्शकाचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. ‘फुले' पाहतांना अनंत महादेवन यांचा या चित्रपटामागे असलेला वेगळा विचार जाणवतो.

‘फुले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्षांनी चित्रपटावर टीका केली. त्यांनी म्हटले ”चित्रपटातील काही दृश्ये ब्राह्मण समाजाला एकतर्फी दोषी ठरवतात. ट्रेलरमध्ये एका ब्राह्मण मुलाला सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकतांना दाखवले आहे. ब्राह्मण समाजाने महात्मा फुले यांना पाठिंबाही दिला होता, पण चित्रपटात फक्त नकारात्मक बाबीच दाखवल्या आहेत. त्यांनी चित्रपटाला सर्वसमावेशक करण्याची मागणी केली, अन्यथा तो जातीय तेढ वाढवेल” असा इशारा दिला. या टीकेला रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, पूर्वी अनेक चित्रपटांमध्ये बहुजन समाजाच्या पात्रांना फक्त शिपाई किंवा हवालदार म्हणून दाखवले गेले, तेव्हा कुणी आक्षेप घेतला नाही. आता जेव्हा सत्य समोर येत आहे, तेव्हा मनुवादी पोट धरून बसले आहेत. त्यांनी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्षांना मनुस्मृतीचे दहन करण्याचे आव्हानही दिले.

चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी वादावर स्पष्टीकरण देतांना सांगितले की, हा चित्रपट अनेक पुस्तकांचा आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करून बनविला आहे. चित्रपटात दर्शवलेले सर्व काही सत्यावर आधारित आहे आणि सत्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही कोणत्याही जातीचा अनादर केलेला नाही. उलट हा चित्रपट दोन समाजातील जातीभेद नष्ट करण्याचं काम करेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान काही जाती संस्थांच्या लोकांमध्ये या चित्रपटावरून विनाकारण वाद सुरू होते. ज्यामध्ये त्यांनी आक्षेप घेणाऱ्यांना चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रतिक्रिया न देण्याची विनंती केली होती. त्यांनी ब्राह्मण संघटनांनी दोन मिनिटांच्या ट्रेलरवरून घाईघाईने निष्कर्ष काढल्याचेही म्हटले.

सर्वधर्म समभाव आणि समान न्यायाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले हे स्वतः आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातले होते. आपल्या ब्राह्मण मित्रांबरोबर एकत्र स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण घेणाऱ्या जोतिबांना शाळेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा समाजात असलेल्या जातिभेदाची जाणीव झाली. ‘शूद्र' म्हणून मित्राच्या घरी असलेल्या लग्न सोहळ्यातून त्यांना बाहेर काढण्यात आलं. आपल्याला मिळणारी ही अन्यायपूर्ण वागणूक, आपल्या समाजातील लोकांच्या आयुष्यात असलेला अंधकार दूर सारायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. या एका विचारातून आणि थॉमस पेन यांचे ‘राइट्‌स ऑफ द मॅन' या पुस्तकाच्या प्रभावातून शिक्षणासाठी आग्रही राहिलेल्या जोतिबा यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या साथीने सुरू केलेले कार्य कसे कसे आकाराला येत गेले, याची साधीसरळ मांडणी दिग्दर्शकांनी ‘फुले' या चित्रपटातून केली आहे.

महात्मा फुले यांनी १९ व्या शतकात जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि स्त्रियांच्या शिक्षणाविरोधातील रूढींना आव्हान दिले. त्यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करून समतेचा विचार पुढे नेला. त्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड आणि ब्राह्मणाचे कसब यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी ब्राह्मणवाद आणि जाती व्यवस्थेवर कठोर टीका केली. ‘फुले' चित्रपटावरील वाद हा केवळ सिनेमाचा नाही, तर महात्मा फुले यांच्या विचारसरणीवर आधारित आहे. फुले यांनी जाती व्यवस्थेवर प्रहार करतांना कोणतीही तडजोड केली नाही. त्यांनी म्हटले होते, कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये. पण त्यांच्या या समतेच्या विचारांना आजही काही गटांकडून विरोध होतो, कारण तो त्यांच्या मक्तेदारीला आव्हान देतो. हा वाद दाखवतो की, महात्मा फुले यांचे विचार आजही समाजातील काही भागांना अस्वस्थ करतात. चित्रपट हा केवळ माध्यम आहे, पण त्यातून उजेडात येणारे सत्य आणि इतिहासातील कटू वास्तव काहींना मान्य नाही. म्हणूनच वास्तव असो व सिनेमा, महात्मा फुले यांचा द्वेष करणारे आजही त्यांच्या विचारांचा विरोध करुन दाबण्याचा प्रयत्न करतात.

‘फुले' चित्रपटावरील वादाने महात्मा फुले यांच्या कार्याची आणि विचारांची प्रासंगिकता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. हा वाद केवळ चित्रपटापुरता मय्राादित नसून समाजातील खोलवर रुजलेल्या जाती आणि सत्तेच्या समीकरणांशी निगडीत आहे. फुले यांनी म्हटले होते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात, ज्यांचे निर्धार ठाम असतात. आजही त्यांचे विचार समाजाला दिशा दाखवतात, पण त्याचवेळी काहींच्या अस्वस्थतेचे कारण बनतात. हा वाद संपला तरी फुले यांचे विचार आणि त्यांचा वारसा कायम प्रेरणा देत राहील. नुकतेच महाराष्ट्र विधानसभेने समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न' देण्याची शिफारस करणारा ठराव मंजूर केला; तसेच केंद्र सरकारने सुध्दा समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न' देवून सन्मानित करावे, अशी शिफारस करणारा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.
-प्रविण बागडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।