वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
अन्न कोणीही तयार केलेले असो, कोणीही वाढलेले असो, आपण जेवायच्या आधी त्या पूर्णब्रह्माकडे पाहून कृतज्ञतेनेभगवंताचे स्मरण केले, त्याचे पवित्र नाम घेतले की अन्नावर त्या नामाचे पावन संस्कार होतात. आधीचे काही बरे-वाईटसंस्कार असतील ते पुसून जातात.
जनी भोजनी नाम वाचे वदावे।
अती आदरे गद्य घोषे म्हणावे।
हरीचिंतने अन्न जेवीत जावे।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे। श्रीराम ८९।
‘राम' ह्या छोट्याशा, सुंदर, बिनखर्चाच्या नामाचे सामर्थ्य सांगून ते नित्य घ्यावे हे समर्थांनी सांगितले. ह्या श्लोकांत ते सांगतात की भोजन सुरू करण्याआधी नामाचा मोठ्याने गजर करावा आणि मग भगवंताचे स्मरण करीत जेवावे. असे केल्याने भगवंत सहज प्राप्त होतो. छांदोग्य उपनिषदात एक मंत्र आहे ज्यात म्हटले आहे की ”आहार शुध्दीने अंतःकरण शुध्दी होते.” अंतःकरण शुद्ध झाले की स्मृती स्थिर होते. स्मृती स्थिर झाली की ह्रदय ग्रंथींचा सर्वथा नाश होतो. आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची विस्मृती झाली आहे. शुध्द अंतःकरणात ती स्मृती पुन्हा जागृत होते आणि स्थिरहोते. तेव्हा नित्य आणि अनित्याची जी गाठ हृदयात पडलेली आहे, सत्य आणि मिथ्याचा जो संभ्रम आहे, शाश्वत आणि अशाश्वत याबाबतच्या ज्या शंका आहेत, दृश्य-अदृश्यासंदर्भात जो गोंधळ आहे त्या सगळ्याचे संपूर्ण निरसन होते.
शुद्ध-स्वच्छ पाण्यात किंवा स्वच्छ आरशात प्रतिबिंब स्पष्ट दिसते त्याचप्रमाणे शुद्ध अंतःकरणात भगवंताचे स्वरूप स्पष्टपणे अनुभवास येते. म्हणूनच पारमार्थिक साधनेत अंतःकरण शुध्दीचे पायाभूत महत्त्व आहे. अन्नाने स्थूल देहाचे पोषण होते. आपल्या आहाराचा आपल्या देहावर कसा परिणाम होतो हे स्पष्ट दिसते. सकस, संतुलित, नियमित आहाराने शरीर प्रमाणबद्ध, निरोगी राहते. आहाराचा असाच परिणाम सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरणावरही होतो.ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ”जैसे भांडियाचेनि तापे। आतुले उदकही तापे। तैसी धातुवशे आटोपे। चित्तवृत्ती” (ज्ञा.१७-११७) अग्निने प्रथम भांडे तापते. नंतर त्या उष्णतेने आतील पाणी तापते. त्याचप्रमाणे आहाराचा देहातील धातुंवर परिणाम होतो व त्या धातुंप्रमाणे चित्ताचा स्वभाव बनतो. रक्त, रस, मांस, अस्थी, मज्जा, स्नायु व शुक्र हे सप्त धातु आहेत. सात्त्विक आहाराने ( स्निग्ध, साधे) सप्त धातुंवर सात्त्विक परिणाम होऊन सत्व गुणाची वाढ होते व दैवीसंपत्तीचा लाभ होतो. (अहिंंसा, सत्य, दया, क्षमा, शांती, तेजस्वीता). राजस आहाराने (तिखट, आंबट, दाहक) रजोगुणाची वाढ होते. (दंभ, दर्प, अभिमान, चंचलता). तामस आहाराने ( नीरस, शिळे, उष्टे) तमोगुण वाढतो. (क्रोध, निष्ठूरपणा, आळस, अज्ञान). रजोगुण व तमोगुणाने आसुरी संपत्ती वाढते. म्हणूच भगवंतांनी गीतेत आहाराचे त्रिविध स्वरूप सांगून युक्ताहाराने दुःखनाश होतो असे म्हटले आहे. स्वयंपाक करणाऱ्यांंच्या विचारांचाही अन्नावर परिणाम होतो.
म्हणूनच साधक, तापस, संन्यासी अन्नग्रहणाच्या बाबतीत अतिशय दक्ष व काटेकोर असतात. सरसकट कोणाच्याही हातचे अन्न स्वीकारीत नाहीत. आपल्या साधनेवर, तपश्चर्येवर विपरीत परिणाम होईल असा आहार ते कटाक्षाने टाळतात. व्यवहारात, काळाची गरज म्हणून अनेकांना आहाराच्या बाबतीत अनेक प्रकारची तडजोड करावी लागते. अशा वेळी अन्नाची शुध्दता करण्याचा ”नामस्मरण” हा सोपा उपाय समर्थांनी या श्लोकांतून सांगितला आहे. बरेचदा खाल्लेले अन्न नीट पचत नाही, अंगी लागत नाही. याचे कारण अंतःकरणातील चिंता, भय, शोक व त्यातून येणारा ताण. मनःक्षोभामुळे शरीरावर अन्नाचा आरोग्यदायक परिणाम होत नाही. नामस्मरणामुळे हा क्षोभ कमी होतो. ताण कमी होतो. जसजसे चित्त शांत होत जाते तसतसे अन्न सुखाने पचते. अंगी लागते. मन तणावरहित असेल तर साधी मीठ-भाकरी, किंवा वरण-भातही रूचकर लागतो. भोजनाची तृप्ती लाभते. तसेच अन्न कोणीही तयार केलेले असो, कोणीही वाढलेले असो, आपण जेवायच्या आधी त्या पूर्णब्रह्माकडे पाहून कृतज्ञतेने भगवंताचे स्मरण केले, त्याचे पवित्र नाम घेतले की अन्नावर नामाचे पावन संस्कार होतात. आधीचे काही बरे-वाईट संस्कार असतील तर ते पुसून जातात. पंगतीत मोठ्याने नामाचा घोष केला की संपूर्ण वातावरणात नामाच्या, भक्तीच्या लहरी घुमतात. सर्वांच्याच मनावर सकारात्मक परिणाम होतो. भोजनाकडे चित्त एकाग्र होते. नामाने शुद्ध झालेले अन्न सेवन केल्यावर अंतःकरणही शुद्ध होते. तिथे नामाचे संस्कार रूजतात आणि जिथे नाम आहे तिथे नामी असतोच. भगवंताचे वचन आहे की जिथे माझे नाम घेतले जाते तिथेच मी उभा असतो. म्हणूनच ज्या अंतःकरणात नामाचे नित्य स्मरण असते तिथे भगवंताची प्राप्ती सहजच होते.
-सौ. आसावरी भोईर