समाजमित्र पक्षी...कावळा

उकिरड्यावर टाकलेले अन्न, विष्ठा ,लहान पक्षी, त्यांची अंडी, मेलेल्या प्राण्यांचे मांस इ.इ.गोष्टी खरे तर कावळ्यांचे अन्न आहे.  इतरत्र पडलेले अन्न खाऊन आजूबाजूचा परिसर शुद्ध ठेऊन हवा शुद्ध ठेवण्यास कावळे मदत करीत असतात व उत्तम आरोग्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.

नेहमी कावकाव करून आपल्या सभोवती फिरत असलेला कावळा आपण नेहमी पाहत असतो. त्या प्राणी शास्त्रानुसार पक्षी ह्या प्रकारात मोडणाऱ्या कावळ्याच्या अनेक जाती व प्रकारदेखील आहेत.  फक्त दक्षिण अमेरिका सोडून ०१़.  गावचा कावळा, ०२़.  डोम कावळा,  ०३़. भारद्वाज, देव कावळा कुक्कुडकुंभा,  ०४. जंगली कावळा,  ०५. हिमालयातील कावळा,  ०६़.  तपकिरी मानेचा डोमकावळा,  ०७.  पिवळ्या व लाल चोचींचा कावळा इ. इ.अनेक प्रकार आहेत. हा पक्षी काव्य कुलातील एक परिचित चतुरपक्षी आहे. हा पृष्ठवंशीय, मोठ्या चोचीचा व मनुष्यवस्तीत राहणारा असूनही कावळा घरात कधी येत नाही.

कावळा हा शाकाहारी व मांसाहारी देखील असतो. त्याची मादी चार ते पाच अंडी देते. मादीचा प्रसव काळ सुमारे एप्रिल ते जूनमधील असतो. तसा कावळा सर्वांच्याच ह्या न त्या प्रकारांनी सुपरिचित असतो. लहान बाळाला देखील अन्नाचा घास भरविताना ‘एक घास कावूचा' म्हणून आई त्याचेस्मरण करीतच असते. त्याचप्रमाणे मुलांना कावू-चिवूच्या गोष्टी आवर्जून सांगितल्या जातात. सकाळी १० चे दरम्यानी दारात कावळा आला की कुणी घरात पाहुणा येण्याचे संकेत देवून जातो. त्याचप्रमाणे दुपारी १२ चे दरम्यान आपल्या पितरांची आठवण म्हणून आपल्याकडून घराबाहेर आवर्जून अन्न ठेवले जाते. तसेच व्यक्ती मेल्यानंतर १० व्या दिवशी कावळ्यास भाताचा पिंंड ठेवला जातो. दीर्घ दृष्टी निसर्गतः प्राप्त झालेल्या देणगीने तो मृताच्या भावना/विचार समजू शकत असल्याने त्यास अति महत्व प्राप्त झालेले असते. पितर कार्यात जणू कावळा महत्वाची भूमिका बजावीत असतो. भूकंप, हल्ले, संकटे, इ.चे संकेत कावळे आरडा ओरडा करून देत असतात. फक्त आपल्याला समजत नाही; पण त्याचे तो काम करीत असतो.

समाजोपकारक  गुणकारी कावळा
संत तुकाराम कावळ्याबद्दल सांगतात ....."कावळा हौसेने पाळीला, परी तो जातीवर गेला अशी ही कावळ्याची जात, चोच घालिती नरकात” असे असले तरी, ०१़.  उकिरड्यावर टाकलेले अन्न, विष्ठा ,लहान पक्षी, त्यांची अंडी, मेलेल्या प्राण्यांचे मांस इ.इ.गोष्टी खरे तर कावळ्यांचे अन्न आहे.  इतरत्र पडलेले अन्न खाऊन आजू बाजूचा परिसर शुद्ध ठेऊन हवा शुद्ध ठेवण्यास कावळे मदत करीत असतात. व उत्तम आरोग्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. ०२़.  प्राण्यांमध्ये जसे हत्ती, माशांमध्ये डॉल्फिन, तसा पक्षांमध्ये कावळा हा अत्यंत हुशार पक्षी आहे. ०३़.  तो नेहमी टोळक्यात राहतो. संध्याकाळी सर्व कावळे एकत्र जमतात. कावळा समाजप्रिय प्राणी आहे. शिकार करताना ते नेहमी एकत्र जमून शिकार करतात. त्यात ते हुशार व वाकबगार असतात. गरुड व घार सारखे पक्षी त्यांचे खाद्य पायात पकडतात; पण कावळ्याला तसे पकडून उडता येत नसल्याने कावळा नेहमी शिकार तोंडात पकडूनच करतो . कावळ्याची चोच फार कडक असते. ...कोंंबडीचे पिल्लू पळवायचे असेल तर दोन कावळे पुढून तिची खोडी काढतात. मागे असलेले कावळे तिची पिल्ले पळवितात. ही कावळ्यांची चतुरता वेगळीच म्हणायला हवी.

कावळ्याची चतुराई

०१़.  अशा या हुशार कावळ्यांना फसवणारा फक्त एकच पक्षी आहे, तो पक्षी म्हणजे कोकिळा. कावळ्याच्या विणीच्या काळात एप्रिल ते जून दरम्यान कावळी घरट्यात दोन अंडी घालते. त्यावेळी कोकिळा एक अंड खाली सोडून आपले तेथे ठेवते. कावळीण कोकिळेचे अंडे आपलेच समजून उबविते.  ०२़.  अरुंद भांड्यातील पाणी खडे टाकून वर आणून पिणे. ०३. टणक कवचाची फळे चोचीने फुटत नाहीत, ती फळे कावळे आणतात व चालत्या गाडी पुढे टाकतात व ती फुटल्याने फुटलेल्या फळातील गर खातात. कावळे हे निसर्गाचे सफाई कामगार आहेत, हेच खरे. कुठे घाण व मेलेला प्राणी दिसला तेथे कावळा नेहमी हजर असतो. पूर्वी हे काम गिधाडे करायची; पण आता ती दिसेनाशी झालेली आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्यास प्रतिबंध होतो. पाऊस चांगला पडेल की नाही हे कावळ्यावरून कळते. कावळीण नेहमी एप्रिल महिन्यात घरटे बांधायला सुरुवात करते. ती नेहमी झाडाच्या बेचकीत घरटे बांधते. घर बांधण्याच्या वेळेनुसार येणा-या पावसाचा अंदाज बांधला जातो.

पौराणिक संदर्भ : काक, साग व नाग यांना शंभर वर्षे आयुष्य असते. याचे कारण समुद्रमंथनाच्या वेळी जे अमृत निघाले होते त्याच्याशी लावला जातो. समुद्रमंथनातून निघालेले अमृत काक, साग, नाग यांना मिळाल्याने त दीर्घायुषी झाले. शनि देवाचे वाहन कावळा असल्याने चोरीसारखे अरिष्ट येत नाही असा समाज आहे. तिबेटमध्ये दलाई लामाच्या जन्माचे संकेत कावळ्यापासुन मिळतात म्हणून त्याला धर्मपाल, महाकाळ किंवा निसर्गनियमाचे रक्षण करणारा असेही संबोधतात. कावळा आक्रमक पक्षी आहे तो घारीशीही पंगा घेतो. कावळ्याला माणसाचा स्पर्श चालत नाही. ज्या कावळ्याला माणसाचा स्पर्श होतो त्यास इतर कावळे जिवंत ठेवत नाहीत. असा हा परोपकारी कावळा आपला मित्रच आहे, त्याचे अनेक गुण आपल्याला आदर्शवत ठरतात. - रामकृष्ण विनायक अभ्यंकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार