शून्यापासून सुरुवात

 आज मोठमोठे उद्योग समूह किंवा उद्योजक हे एका दिवसात किंवा एका रात्रीत मोठे होत नाहीत, त्यांची सुरुवात अगदी लहान उद्योगापासून झालेली दिसून येते. कधी कधी ती शून्यापासून झालेली असते.

महापुरे झाडे जाती,
तेथे लव्हाळे वाचती

 या तुकाराम महाराजांच्या ओळीचा अर्थ समजला म्हणजे जीवनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेमकं काय करावं ते कळते. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यापासून म्हणजेच सूक्ष्मापासूनच होते. जसे फक्त परीक्षेच्या दिवशी वर्षभराचा अभ्यास करायचा म्हटला तर चांगले यश मिळणे शक्य नाही. चांगले यश मिळवायचे असेल तर रोज थोडा-थोडा अभ्यास करत राहिला पाहिजे त्यामुळे परीक्षेच्या दिवशी जास्त अभ्यास करायची गरज राहत नाही आणि परीक्षेचा ताणही येत नाही. यशही चांगले मिळते. माझ्या लक्षातच राहत नाही, आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्हाला नाही शिकता आले अशी लंगडी कारण सांगणाऱ्यांना मुळातच काही करण्याची इच्छा नसते. या सर्वांना मला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले हे सांगावेसे वाटते.

 या संदर्भात अजून एक वाक्य सांगावेसे वाटते ‘शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला' तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते म्हणजेच आपल्या जीवनाची उद्दिष्टे साध्य करायची असतील तर आज हातात असलेला कोणताही वेळ वाया घालवू नये. मित्रांनो, छत्रपती शिवबांनीसुद्धा आपल्या बाल सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला तेव्हाचे त्याचे क्षेत्र फार लहान होते. पण पुढील शंभर वर्षात त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले. शिवचरित्राचा अभ्यास केला तर आपल्या सहज लक्षात येतं की महाराजांवर केवढी मोठी संकटे आली, ती सर्व पार करत त्यांनी प्रचंड मोठे यश मिळवले त्या तुलनेने खरंतर आपल्यासमोर काहीच समस्या नसतात. तरी आपण अनेक लंगडी कारणे सांगण्यात आनंद मानतो. थोडक्यात काय तर ‘नाचता येईना अंगण वाकडे' ही म्हण अशी माणसे सार्थ करून जातात.

आज मोठमोठे उद्योग समूह किंवा उद्योजक हे एका दिवसात किंवा एका रात्रीत मोठे होत नाहीत, त्यांची सुरुवात अगदी लहान उद्योगापासून झालेली दिसून येते. कधी कधी ती शून्यापासून झालेली असते. अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात की ज्यांनी सुरुवात लघुतेपासून केली आणि आपल्याच आयुष्यात विश्वभरात आपला उद्योग पोहोचवण्यात ते यशस्वी झाले. जसे धीरूभाई अंबानी. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने आपण कोणतेही काम केले तर निश्चित चांगले यश मिळते हे सदैव लक्षात ठेवावे. काही व्यक्ती निवृत्तीनंतर किंवा वयाच्या साठीनंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करतात आणि पुढील पाच-दहा वर्षातच जगभर जाऊन पोचतात अशी अनेक उदाहरणे समाजात दिसतात. त्यामुळे आता वय झाले हो, आता नाही शक्य, कर्तबगारीचेही एक वय असते अशी कारण देणाऱ्यांनी वरील उदाहरण लक्षात घ्यावे. एक दुसरे उदाहरण म्हणून सांगतो कधी कधी पायवाट म्हणून सुरू झालेला रस्ता भविष्यात महामार्ग होऊन जातो.

यश किंवा अपयश मिळत असताना इतरांशी स्वतःची तुलना अजिबात करता कामा नये. तुलना करायचीच असेल तर ती केवळ स्वतःशी करायची म्हणजे मागच्या वेळी आपण केलेली कामगिरी आणि आताची कामगिरी यात किती प्रगती किंवा अधोगती झाली याचाच विचार करावा. दुसऱ्याशी तुलना केल्यास नैराश्य येण्याची दाट शक्यता असते. स्वतःशीच तुलना केल्यास उभारी येते. आधीच्या चुका पुन्हा होत नाहीत. योग्य दिशेने केलेला अभ्यास आणि त्याचा व्यासंग हा माणसाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातो.
-प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

समाजमित्र पक्षी...कावळा