आनंदी प्रसंगांचा साक्षीदार केक नको, टरबूज (कलिंगड) असावा
लग्न समारंभात अलिकडे केक कापले जातात. घरातील वाढदिवस, लग्नाचा वर्धापन (वाढदिवस) दिन साजरा करतानाही केक जणू आवश्यकच! मात्र ह्या सेलिब्रेशनमध्ये असेही आढळून येत आहे की, केक कोणी जास्त खात नसल्यामुळे त्याची नासाडी होते व नाहक आर्थिक नुकसान होत असते. आता गरज आहे ह्या केकला पर्याय शोधण्याची. भूतकाळात बघितले तर भारतीय संस्कृतीत कुठेही सेलिब्रेशनसाठी केक वापरल्याचे आढळत नाही. मग ह्याला पर्याय काय? तर आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे टरबूज (कलिंगड).
सध्याचे युग हे सिलेब्रेशनचे युग आहे. कुठलीही आनंदी घटना घडली की लगेच सर्वांचा एकाच सूर निघतो तो म्हणजे सेलिब्रेट करूया. पार्टी पाहिजे. मग तो वाढदिवस असो, परीक्षा पास झालेला असो, नौकरी लागलेली असो, साखरपुडा असो, पदोन्नती असो, लग्नाचा वाढदिवस असो की एखादे टार्गेट पूर्ण केल्याचा क्षण असो आणि हे सर्व क्षण हल्ली एकाच गोष्टी सोबत साजरे केले जातात तो म्हणजे ‘केक'.
केकची एव्हढी क्रेझ आहे की विचारू नका. काही झाले की केक कापा. बरं, केक कापा, केक खा इथपर्यंत ठीक आहे. त्यापुढे प्रकार असतो तो म्हणजे केक तोंडाला फासणे. त्याचे फोटो काढणे. हे सर्व भूषणावह वाटणे आणि समाज माध्यमांवर टाकणे. एकदा का हे फोटो समाज माध्यमांवर गेले की झाले सर्वचजण धन्य! हे आपण का करतो कशासाठी करतो? हे आपल्याला काही माहित नाही. सर्व करतात म्हणून आपण करतो. ह्याला कुठलाही आधार नाही. बरं हे सर्व लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच करतात. बरं हल्ली बऱ्याच जणांना साखर असते म्हणून ते केक खाऊ शकत नाही. जस्ट नावाला तुकडा तोंडाला लावतात. खाल्लं की नाही खाल्यासारखं करतात. कोणी तर कॅन्सरच्या भीतीनेसुद्धा केक खात नाही. केक खाण्याचा सुद्धा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. ह्यात दुसरा प्रकार केकमध्ये क्रीम खूप आहे आम्ही खाणार नाही. तिसरा प्रकार केकमूळे वजन वाढत म्हणून खाणार नाही आणि चौथा टप्पा हा की केकमध्ये अंडे आहे म्हणून खाणार नाही. म्हणजे ह्या केकच्या सेलिब्रेशनला ह्या चार दिव्य परीक्षांतून जावं लागत. तरी एव्हढं फॅड आहे की सेलिब्रेशनसाठी केकच पाहिजे. कशासाठी केकचा एवढा आग्रह ? असं काय एव्हढं आपलं घोड अडतंय ते ? सर्व करतात म्हणून आपण करतो. लॉजिक मात्र काहीच नाही. तर्क मात्र काहीच नाही. फक्त परंपरा पडली म्हणून आपण करतो आहे.
एक साधारणतः चार दशकापूर्वीचा काळ होता, त्या वेळेस मे महिन्यात लग्न समारंभ आयोजित केले जात असत. कारण हे असे की, १ मे नंतर सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असे व ह्या शाळा, लग्न समारंभासाठी उपलब्ध असतात. त्यावेळेस सध्या सारखे हॉल उपलब्ध नव्हते व सध्यासारख्या सुखसोयीसुद्धा नसत व कुटुंबाची ऐपतसुद्धा नसे. सर्वजण सर्वसामान्यच असायचे. आता ह्या सर्व चार दशकापूर्वी झालेल्या लग्न समारोहाचे मोठ्या प्रमाणात लग्नाचा वर्धापन (वाढदिवस) दिन साजरा केला जात आहे आणि हे सर्व लग्न वर्धापन दिन केक कापून साजरा केला जात आहे.
ह्या सेलिब्रेशनमध्ये असे आढळून येत आहे की, केक हा पदार्थ कोणी जास्त खात नसल्यामुळे त्याची नासाडी होत आहे व नाहक आर्थिक नुकसान होऊन समारोह साजरा केल्याचे समाधानही मिळत नाही. आता गरज आहे ह्या केकला पर्याय शोधण्याचा भूतकाळात बघितले तर भारतीय संस्कृतीत कुठेही सेलिब्रेशनसाठी केक वापरल्याचे आढळत नाही. मग ह्याला पर्याय काय? तर आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे टरबूज (कलिंगड). हे चवीसाठी गोड, सर्वांना स्वाद घेता येईल असे, दिसायला मोठे आणि खिशाला परवडेल असे आहे. ह्या फळाला बऱ्यापैकी पसंदीसुद्धा आहे आणि हल्ली हे बारमाहीसुद्धा उपलब्ध आहे. तसेच हे सर्वत्र उपलब्ध सुद्धा आहे. आकाराने मोठे असल्यामुळे फोटोसुद्धा छान, ठळक दिसतात व संपूर्ण कुटुंबाची गरज भागेल एव्हढेसुद्धा असते.
एक नजर टरबूज वर टाकूया की ‘सेलेब्रेशन'साठी हे कसे योग्य राहील! टरबूज उर्फ कलिंगड हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल, पाणीदार गोड गर असणारे फळ आहे. ह्याचे शास्त्रीय नाव ‘सिटरुलस लेनेटस' असे आहे. साधारणतः हे फळ उन्हाळ्यात अधिक मिळतं आणि पसंद केलं जातं. कलिंगड गुणाने अत्यंत शीत असून ते एक उत्तम टॉनिकसुद्धा आहे. हे खूप रुची देणारे आणि शरीरातील लघवीचे प्रमाण वाढविणारे फळ आहे. जर आपण ह्या फळाला पसंदी दिली तर फळाचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मदत होऊन आपल्या देशाच्या उत्पादनाच्या वाढीला मदत होईल व देशाचे उत्पन्नपण वाढेल.
सुमारे ५००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत पहिल्यांदा टरबूज पिकवण्यात आले यानंतर ते हळूहळू इजिप्त आणि ग्रीस मार्गे भारतात पोहोचले. इजिप्शियन पिरॅमिडमध्येही टरबुजाचे अवशेष सापडले आहेत. टरबूजमध्ये ९० % पेक्षा जास्त पाणी असते, जे शरीराला हायड्रेट करते म्हणूनच टरबुजाला ‘उन्हाळी सुपरफूड' असेही म्हणतात. टरबूजमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि पचनसंस्थादेखील मजबूत होते. १०० ग्राम टरबूजमध्ये अंदाजे ३० कॅलरीज असतात. टरबूज हे जीवनसत्वे आणि खनिजांचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. टरबूज खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. उन्हाळ्यात ते शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्यदेखील सुधारते. टरबूजमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे शरीराला संसर्ग आणि रोगांशी लढण्यास मदत करते आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका देखील कमी करू शकते. व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. म्हणून टरबूज खाल्याने डोळे निरोगी राहतात आणि दृष्टी कमकुवत होण्याचा धोका कमी होतो. टरबूजमध्ये जीवनसत्वे अ, ब ६ आणि क असतात. हे सर्व जीवनसत्वे त्वचा मऊ आणि चमकदार ठेवतात. टरबूज पचण्यास सोपे असते जे अन्न पचवण्यास मदत करतात म्हणून टरबूज खाल्याने पचनसंस्था मजबूत होते.
हे एव्हढे समृद्ध आणि गुणसंपन्न व आरोग्यवर्धक फळ असल्यावर त्याचा उपयोग आपल्या सेलिब्रेशन व स्वास्थासाठी करायला काही दुमत असायला नको. अगदी आपण त्याचा आनंदाने स्वीकार करायला पाहिजे व प्रत्येक सेलिब्रेशन टरबूज (कलिंगड) सोबतच करायला पाहिजे. टरबूज हे सर्वानाच आवडतं. अगदी सामान्यांपासून तर सेलिेब्रिटीज पर्यंत! म्हणून तर काही चित्रपटामध्ये ह्याचे हिेरो हिरोईन सोबतचे सिन्स आढळतात. मग तो ‘गजनी' असो की ‘दिल है की मानता नहीं' असो; ह्यात मोठ्या मनोरंजकपणे नट आणि नटीचे प्रेम व्यक्त करण्याचे सिन्स आढळतात.
टरबूज हे फळ सर्वांना हवे, हवे असणारे आहे. म्हणून त्याला केकचा सर्वोत्तम पर्याय निवडून सेलिब्रेशनसाठी निवड करायला काय हरकत आहे ? हा बदल नक्कीच ‘दिल है की मानता नहीं'असे होईल; पण आपल्या दिलाच्या स्वास्थासाठी आपल्याला आपल्या दिलाला राजी करावे लागेल आणि तो नक्कीच टरबुजासाठी राजी होईल. तरच (टरच) आपले शरीर बुजासारखे १०० वर्षे उभे राहील. - अरविंद सं. मोरे