विवाह सोहळे बदलताहेत?

ज्या मराठी माणसांनी अनेकांना चव शिकवली, चव दाखवली, चवीचे खायला घातले त्या मराठी माणसांच्या हळदी-लग्नांना आता अनेक ठिकाणी जेवणावळीत काय पाहायला मिळते? तर पनीर टिका, हराभरा कवाब, स्प्रिंग रोल्स, मिनी समोसे, पाणीपुरी, दही पापडी चाट, जिरा राईस, चायनिज राईस, काश्मिरी राईस, नान, रोटी, मटार-पनीर, कुर्मा, छोले, मालपुवा वगैरे वगैरे. मराठी माणसांच्या नोकऱ्यांवर, जमिनींवर, शहरांवर, रस्त्यांवर, फुटपाथवर, बाजारांवर जसे अतिक्रमण झाले आहे तसेच ते आता मराठी माणसांच्या रुढी, परंपरा, हळदी-विवाह सोहळे यातील जेवणावळीवरही झालेय की काय?

   मागील आठवड्यात एका लग्न समारंभात गेलो होतो. भटजीने मंगल अष्टके सुरु करताना ‘स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम्‌' हे पहिले व ‘कावेरी शरयू महेंद्रतनया' हे दुसरे मंगल अष्टक म्हटले आणि त्यानंतर पुढची सहा सरळ लाऊड स्पिकरवरुन वाजवली गेली. मी चाट पडलो. हा असला अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. बरं ते लग्न कुणा ‘प्रगतीशील विचारवाल्यांच्या' किंवा सगळ्याच जुन्या चालीरीती, परंपरा, आस्था, श्रध्दा झुगारणाऱ्यांच्या घरातीलही नव्हतं. मेट्रोसिटीत नव्हे, तर पार एका दूरस्थ खेडेगावात पार पडत होतं. लग्नाला आलेले अनेक वऱ्हाडी पारंपारिक वेषात आले होते. त्यात वेगवेगळ्या भवती संप्रदायातील, भस्म, टिळे, कुंकु कपाळाला लावलेलेही होते. प्रगत, विज्ञानवादी, अंधश्रध्दा निर्मुलनवाले वगैरेंच्या अनेक घरांतील, समाजाच्या विविध स्तरांतील मुला-मुलींच्या विवाहांना मी आवर्जून जात असतो. तेथेही अशी ‘कॅसेट वाजवून आरतीफेम' मंगल अष्टके लाऊड स्पीकरवर वाजवून विवाह आटोपल्याचे मी पाहिले नव्हते. उलटपक्षी मी लहानपणापासून पाहात आलो आहे की लग्नप्रसंगीची मंगल अष्टके म्हणताना केवळ भटजीच नव्हे, तर वधूृवराच्या नात्यातील काका, मामा, आजोबा अशी ज्येष्ठ नातलग मंडळीही एखाददुसरे मंगल अष्टक म्हणतात. यातून काय होते ते मला माहित नाही. पण याचे मूळ हे ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दाम्पत्यजीवनासाठी देण्याच्या आशीर्वादात आहे. ही पद्यरचना असुन मराठी तसेच संस्कृतमध्ये असते. आठपैकी प्रत्येक रचना संपल्यावर ‘शुभमंगल सावधान' म्हटले की वधूवरांवर फुले तसेच अक्षतांचा वर्षाव करुन आशीर्वाद दिले जातात व या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून बऱ्याचदा एकमेकांना आधी अजिबातच परिचित नसलेले वधु आणि वर तसेच दोन अनोळखी कुटुंबे आयुुष्यभरासाठी एकमेकांसाठीची होऊन जातात. अनेक ठिकाणी पारंपारिक मंगल अष्टकांसोबतच वधु-वर, दोन्ही सोयरी कुटुंबे यांची नावे गुंफुन दोन्ही घराण्यांची वर्णने करणारी स्व-रचित मंगल अष्टकेही म्हटली गेल्याचेही मी स्वतः हजर राहुन ऐकले आहे.

   यातील ‘शुभमंगल सावधान' हे शब्द मला नेहमीच व्याकुळ करतात. मला मुलगी नाही. त्यामुळे लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या लेकीची पाठवणी दुसऱ्याच्या घरी करताना त्या जन्मदात्या पित्याला काय वेदना होतात ते मला ठाऊक नाही. मात्र त्या वेदना-संवेदना मी समजू शकतो. मुलगी नसली तरी भाच्या, पुतण्या यांच्या पाठवणीच्या प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. माझ्या पूर्वजांचे गाव असलेल्या उरणमधील दिवंगत गीतकार अनंत पाटील यांनी लिहिलेले, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेले व महाराष्ट्राचे विख्यात लोकगायक दिवंगत प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेले ‘शुभमंगल सावधान..सावधान' हे गाणे माझ्या सदैव स्मरणात राहणारे आहे. या गाण्यात गीतकाराने आपल्या मुलीला सासरी धाडतानाची पित्याची मनस्थिती, त्याची कन्येला समजावणी, लहान कुटुंबाचे महत्व, देशातील महागाई, सावध व चतुर राहण्याची गरज, देशाभिमान, भक्ती या साऱ्यातून त्या मुलीला आशिर्वाद देत आयुष्यभर ‘सावधान' राहण्याचा सल्ला दिला आहे. हे गीत मी गेली पन्नास वर्षांहुन अधिक काळ ऐकत आलो आहे. आजही महाराष्ट्राच्या विविध खेड्यापाड्यांत हे गाणे विवाहप्रसंगी हमखास वाजवले जाते. मी माझ्या बालपणीचा मोठा काळ कल्याणमध्ये व्यतीत केला असल्याने कल्याणमध्येच राहणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांनाही मी विविध प्रसंगी पाहिले आहे. अलिकडे मी पाहतो की अनेक मराठी कुटुंबांच्या विवाह सोहळ्यात पंजाबी गाण्यांनी घुसखोरी तर केली आहेच; त्या आणि विवाहाचा कसलाच संदर्भ नसलेल्या तुझी घागर नळाला लाव, पोरी जरा जपून दांडा धर टाईप तद्दन बाजारु, भंपक, आचरट गाण्यांवर मराठी मुले-मुली नाचकाम करीत असतात.

   मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर या महामुंबईच्या प्रमुख जिल्ह्यांच्या मुळ जमिनमालक, भूधारक, भूमिपुत्र आगरी-कोळी समाजाने त्यांच्या घरचे हळदी व विवाहसमारंभ व त्यानिमित्ताने त्यांनी केलेली आमंत्रित पाहुणेमंडळीची चविष्ट जेवणाची सरबराई आणि आदरातिथ्याच्या माध्यमातून सर्वदूर आपली वेगळी ओळख पोहचवली आहे. स्वाभीमानी, तिखट जेवणाला प्राधान्य देणारा, समोरच्याच्या जीवाला जीव देणारा आणि कुणी दगाफटका केला तर मात्र त्याची दैना करताना मागेपुढे न पाहणारा, कष्टाळू, मेहनती  म्हणून आगरी-कोळी समाज परिचित आहे. संघर्ष, मेहनत, कष्ट, परिश्रम हेच एकेकाळी या समाजातील अनेकांच्या नशिबी असे. मग अशावेळी घरातील लग्नसोहळे म्हणजे विविध नातेसंबंधी, मित्रपरिवार, शेजारीपाजारी यांना मंगल कार्यानिमित्त भेटणे, त्यांचे आदरातिथ्य करणे ही  एक पर्वणी मानली जाई. या सर्वांचा यथोचित पाहुणचार करणे हे आगरी-कोळ्यांच्या लग्नांमधील एक व्यवच्छेदक लक्षण बनले. कालांतराने परिस्थिती बदलली. वाडवडिलांनी जिवापाड जपून ठेवलेल्या जमिनींना चांगला भाव आला. विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन केले गेल्यावर पैसे मिळू लागले. मुले-बाळे शिकली. मिळालेल्या, कमावलेल्या पैशांचे चांगले नियोजन केल्याने पैशाने पैसा जोडला गेला व अनेकांची आर्थिक स्थिती बळकट झाली. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब आगरी-कोळी समाजातील विवाहसमारंभांंतून पडले नसते तरच नवल! यात एक गोष्ट मात्र गैर झाली ती ही की या साऱ्यात लग्नाआधीच्या रात्रीच्या हळदीच्या चविष्ट जेवणावळीला दारुपानाची साथ लाभली व केवळ त्यासाठीच अनेक लोक हळदींना आवर्जुन हजेरी लावू लागले. घणसोलीच्या नंदकुमार म्हात्रे यांनी या साऱ्यावर ‘मांडवाचे मघारी चाललंय काय?' या नाटकाची निर्मीती करुन प्रबोधनाचा चांगला प्रयत्न केला होता. आजही ‘याल तर हसाल' या कार्यक्रमातून संजीवन म्हात्रे यावर प्रबोधनाचे काम करीत आहेत. पण लोक प्रयोगाला येतात, भरपेट हसतात, त्यातील शिकवणुकीचा, तात्पर्याचा भाग पध्दतशीरपणे विसरुन जातात आणि त्यांना करायचे तेच करतात. जेवणाला, भोजनाला, पाहुण्यांच्या आदरातिथ्याला कुणाची हरकत असण्याचे काही कारण नाही. कारण अन्नदानासारखे पवित्र काम दुसरे नाही. पण हळदी-लग्नासारख्या कौटुंबिक आनंदाच्या चांगल्या सोहळ्यात भांडण, शिवीगाळ, कुरापतखोरी याला कारण ठरु शकणारी दारुबाजी नसावी. अनेक हळदीप्रसंगी दारु पिणाऱ्या वऱ्हाड्यांसाठी वेगळी मासळी, सुकामेवा, आम्लेट, मटण, कलेजी असा विशेष जामानिमा; तर हळदीला आलेल्या शाकाहारी वऱ्हाड्यांसाठी मात्र जेमतेम व्यवस्था..जणू काही ते दारु पित नाहीत, मांसाहार करीत नाहीत म्हणजे त्यांनी मोठा गुन्हाच केला आहे, असे वातावरण जे दिसून येते.. ते मात्र योग्य नव्हे!  

   लग्न आगरी-कोळ्यांमधील असो की अन्य कोणत्याही समाजांतील..खेड्यांतील-गावठाणांतील हळदी-लग्नांचा अपवाद वगळता हल्ली अनेक परिवारांतून एकत्र येऊन जेवण रांधणे कमी होत चालले आहे. खेड्यामधील मुबलक जागा, भावकीचे एकत्र येणे, जेवण बनवण्यात, वाढण्यात तरुणाईचा उत्साही सहभाग वगैरे शहरात, महानगरात पाहायला मिळणे कठीण! जागेची मोठीच अडचण त्यामुळे काही लग्नाळूंच्या घराच्या दारात साधा मांडवही पाहायला मिळत नाही. जे काही असेल ते सारे मंगल कार्यालयात...अर्थात हॉलमध्ये. तशात आता एकत्र कुटुंब पध्दती कमी होऊन जिकडे तिकडे विभक्त परिवार पाहायला मिळताहेत. त्यातही अनेक परिवारांतून एकमेकांत इर्षा, ॲटिट्यूड, छुपा संघर्ष, चढाओढ, दाखवेगिरी याही गोष्टींचा शिरकाव होऊन अनेक वर्षे झाली आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जेवण मिळणार ते हॉलमधील कॅटरिंगवाल्याच्या सोयीचे. गेल्या दहा-पंधरा वर्षात तर ते ठळकपणे जाणवते. ज्या मराठी माणसांनी अनेकांना चव शिकवली, चव दाखवली, चवीचे खायला घातले.. त्यातील अनेक  मराठी माणसांच्या हळदी-लग्नांना आता काय पाहायला मिळते? तर पनीर टिका, हराभरा कवाब, स्प्रिंग रोल्स, मिनी समोसे, पाणीपुरी, दही पापडी चाट, जिरा राईस, चायनिज राईस, काश्मिरी राईस, हैद्राबादी बिर्याणी, नान, रोटी, मटार-पनीर, कुर्मा, छोले, मालपुवा वगैरे वगैरे. मराठी माणसांच्या नोकऱ्यांवर, जमिनींवर, शहरांवर, रस्त्यांवर, फुटपाथवर, बाजारांवर जसे अ-मराठीयांनी अतिक्रमण केले आहे तसेच अतिक्रमण आता मराठी माणसांच्या  रुढी, परंपरा, हळदी-विवाह सोहळे यातील जेवणावळीवरही झाले आहे हा त्याचा अर्थ. लग्नप्रसंगी मंगल अष्टके संपल्यावर वधू-वरांनी एकमेकांना हार परिधान करताना त्यांच्या मित्र-नातेवाईकांनी त्यांना उचलून धरत हार घालण्यास अटकाव करणे ही आणखी एक कुप्रथा अलिकडे रुढ झाली आहे. वधूवरांना एकमेकांना आयुष्यभराचे जोडीदार, सोबती लाभावे म्हणून लग्न... की छानछोकीचे फोटो काढले जावेत, शेकडो निमंत्रितांना मंगल कार्यालयात तासन्‌तास ताटकळत ठेवून किमान पाऊण ते कमाल दीड-दोन तास कपडे बदलण्याच्या नावाखाली वधू वरांना गायब होता व्हावे यासाठी लग्न...असा प्रश्न पडावा अशी अवस्था आता जिकडे तिकडे पाहायला मिळते आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणांच्या दोन-तीन विवाहांना जायचे असेल तर वऱ्हाड्यांना अडचणीत टाकणारी ही बाब आहे.

   हे असल्या प्रकारचे बदलते विवाह सोहळे तुम्हाला चालतील...की चालवून घेण्याशिवाय गत्यंतरच नाही?

-- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मी आणि माझं घर