देवाचे गंध म्हणजे सर्वत्र सुगंध
सकाळी कपाळावर गंध लावून केलेली पूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही आपल्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा, तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर असे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही. त्याप्रमाणे ‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते.
देवाचे गंध म्हणजे कपाळावर लावलेला टिळा जो हिंदू धर्मात, पूजेच्या वेळी किंवा इतर धार्मिक विधींमध्ये वापरला जातो. हा टिळा चंदन, कुंकू, हळद किंवा भस्म यासारख्या पदार्थांपासून बनवला जातो. देवाला गंध लावण्याचे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. गंध लावल्याने सकारात्मक उर्जा निर्माण होऊन मन शांत होऊन एकाग्रता वाढते. गंधाचा सुगंध देवाला आवडतो म्हणून ते देवाला प्रसन्न करतात. गंध लावल्याने शुभत्व येऊन पावित्र्यता येते. गंधातील घटक आणि सुगंध चांगले असल्याने मानसिक व शारीरिक आरोग्याचा समतोल गंधामुळे राखले जाते.
अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये असे आपले पूर्वज सांगत असत. शास्त्रानुसार गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे. अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, तू कपाळावर ही विभूती का लावतोस? त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला की, माझी आई सांगते म्हणून! तसे बघितले तर त्याच्या जागी आपणही असेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई, आजीने लावलेला असतो. त्यानुसार आपण कपाळावर गंध लावतोसुध्दा!
‘देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणत असतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याचप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत.
या देहात भगवंत नित्य वास करीत असल्यामुळे या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठी वेळ देखील मिळत नसेल त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरुर करावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना स्पर्श होतो ही अंगुली मधले बोट असल्यामुळे त्याचा हृदयाशी थेट संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने ही थेट हृदयाला जाऊन भिडतात. गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली पूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही आपल्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा, तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर असे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही. त्याप्रमाणे ‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते.
गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृती रक्षक या भूमिकेतून पाहतो ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते. म्हणूनच हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे.
पूर्वीपासून स्त्रिया कपाळावर गंध लावत असत त्याची जागा वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्यांनी घेतली आहे. परंतु गंध लावण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. गंध हे सर्वत्र सुगंध आहेच; पण अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इत्यादी पदार्थाने युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत रहावा आणि प्रसन्न वाटावे. तसेच कपाळावरील दोन भुवयांच्यामध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते. तिलकधारी व्यक्तीचा भक्तीभाव मनाची निर्मळता, पवित्रता, सात्विकता, सोज्वळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद- कुंकवाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात.
कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या बोटाने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजय तिलक म्हटले जात असे. त्याला देखील बहुमान होता. बहिण भावाला, पत्नी पतीला, आई-मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करुन त्याला उत्तरोत्तर यश मिळत रहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय, तर नवीन वस्तू आणि नवीन कपडे, नवीन वास्तू त्यांना देखील गंध लावण्याची पद्धत आजपर्यंत चालू आहे. अशा रितीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतःपुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत रहावे. - लीना बल्लाळ