ऑफिस बॅाय
शेखर एका मल्टिनॅशनल कंपनीतील जनरल मॅनेजर. वर्ष संपायला अवघे दोन आठवडे बाकी आणि अजूनही पाच कोटींची आवश्यकता टार्गेट पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट.
‘देशभक्त लेका, व्हिडिओ कॉल काय करतोस? ही ऑफिसची वेळ आहे आणि तू चक्क स्विमिंग पूलपाशी दिसतोस! कुठे आहेस तू?'
‘सर, मी हॉटेल ताजमध्ये आहे,' देशभक्त म्हणाला.
‘हॉटेलिंग काय करतोस लेका, काम कर. अजून टार्गेट कंप्लीट करायचे आहे आपल्याला,' शेखर चिडून म्हणाला.
तेवढ्यात शेखरच्या केबिनचा दरवाजा धाडकन ढकलून ज्युली शेखरच्या केबिनमध्ये शिरली. तीला धाप लागली होती. ‘सर .... सर .....'
‘देशभक्त, मी थोडावेळ फोन म्युटवर टाकताे' म्हणत शेखरने ज्युलीला विचारले, ‘ज्युली काय झालं?' ‘सर....सर....सहा कोटींचा नवीन बिझीनेस आणला, १० % ॲडव्हान्ससह.'
‘ज्युली कोणी आणला हा बिझीनेस?' शेखरने आश्चर्याने विचारले.
‘सर, तुमच्या त्या देशभक्तने', ज्युली उत्तरली.
‘ग्रेट न्यूज ज्युली!' म्हणताना शेखर मनोमनी आनंदला होता.
‘सर, पुढच्या आठवड्यात चेअरमन साहेब येणार आहेत त्यावेळी आपण देशभक्तचा सत्कार करायचा का?'
‘गुड आयडिया ज्युली, म्हणत शेखरने त्याची संमती दर्शाविली.'
‘अभिनंदन देशभक्त! तू आणलेल्या बिझीनेसबद्दल मला ज्युलीने आत्ताच सांगितलंय. खरोखर खूप मोठे काम केले आहेस तू. मला तुला अजून काहीतरी सांगायचे आहे.' शेखर म्हणाला. काय सांगायचे? शेखर आठवत होता.
‘सर हेच ना की पुढच्या आठवड्यात चेअरमन साहेब येणार आहेत आणि त्यावेळी तुम्हाला माझा सत्कार करायचा आहे.'
‘अगदी बरोबर. पण हे तुला कसे समजले? अच्छा बहुतेक मीच फोन म्युटवर टाकायला विसरलो असावो,' शेखरने स्वतःची समजूत करून घेतली.
मागच्या महिन्यातील तिसऱ्या शनिवारी सकाळी ११ वाजता कंपनीच्या नरिमन पॉईंट येथील ॲाफिसमध्ये सेल्स मॅनेजरचे इंटरव्यू ॲरेंज केले होते. सकाळी साडेदहा वाजताच एक रंगीबेरंगी कपडे घातलेला तरुण कंपनीच्या ऑफिसमध्ये दाखल झाला.
‘कोण आपण? काय काम आहे?' सुंदर आणि आधुनिक रिसेप्शनीस्ट ज्युलीने विचारले.
‘मी गोपाळ. मला इंटरव्ह्यूसाठी अपॉइंटमेंट घेता आली नाही म्हणून मी आज लवकरच आलो.'
ज्युलीने रंगीबेरंगी कपडे घातलेल्या गोपाळकडे निरखून बघितले आणि ती म्हणाली, ‘गोपाळ..अरे ऑफिस बॉयचे इंटरव्यू उद्या आहेत. तू उद्या सकाळी याच वेळेस ये.'
‘मॅम मला साहेबांना फक्त दहा मिनिटे भेटू द्या.'
‘गोपाळ ते शक्य नाही, साहेब आज खूप बिझी आहेत,' ज्युली म्हणाली.
तेवढ्यात ज्युलीला ऑफिस बॉय सुभाषचा फोन आला आणि त्यांने सांगितले, ‘मॅम माझी तब्येत ठीक नसल्याने आज मला ऑफिसला येता येणार नाही.' फोन ठेवत ज्युली गोपाळला म्हणाली, ‘गोपाळ..आज आमचा ऑफिस बॉय येणार नाहीये. तू आज मला मदत कर आणि सर्व इंटरव्ह्यू आटोपल्यानंतर मी तुझी साहेबांशी भेट करून देईन.'
तेवढ्यात इंटरव्यूसाठी निळे ब्लेजर, पांढरा स्वच्छ शर्ट, टाय आणि चकाकणारे काळे शूज घातलेला कँडिडेट आला. गोपाळ, या सरांना चहा आणि पाणी दे, ज्युलीने सांगितले. चहा आणि पाणी देण्याची सर्विस गोपाळने इंटरव्यूसाठी आलेल्या पुढील सात कँडिडेट्सला देखील दिली. सांडलेला चहा आणि पाणी पुसण्याचे काम देखील गोपाळने केले. गोपाळमुळे ऑफिस बॉय सुभाषची अनुपस्थिती अजिबात जाणवली नाही.
शेवटच्या इंटरव्यू आधी ज्युली साहेबांच्या केबिनमध्ये गेली आणि तिने गोपाळने केलेल्या मदतीबद्दल सांगत त्याला पाचशे रुपये द्यावेत असे साहेबांना सुचविले. साहेबांना तिने हेही सांगितले की ‘गोपाळला तुम्हाला भेटायचे आहे.'
शेवटचा कँडिडेट समीर साने इंटरव्ह्यूसाठी साहेबांच्या केबिनमध्ये गेला. इंटरव्यू बराच वेळ चालला आणि समीर गेल्यानंतर साहेबांनी ज्युलीला फोन करून सांगितले की आपल्याला समीरला ऑफर द्यायची आहे, वीस लाख रुपये सॅलरीची. खात्री करून घेण्यासाठी तीने साहेबांना विचारले, ‘साहेब ऑफर कितीची द्यायची? वीस लाख रुपयांची ना?'
‘ज्युली आता गोपाळला पाठवायला हरकत नाही. त्याच्याबरोबर माझ्यासाठी चहा देखील पाठव,' साहेबांनी सांगितले.
साहेबांसाठी चहाचा कप घेऊन गोपाळ साहेबांच्या केबिनमध्ये शिरला. प्रसन्न आणि हसरी मुद्रा असलेला गोपाळ, साहेबांना ऑफिस बॉय म्हणून बघता क्षणी आवडला.
‘साहेब, मला इंटरव्यू द्यायचा आहे,' गोपाळ म्हणाला. ‘गोपाळ, अरे ऑफिस बॉयचे इंटरव्यू उद्या आहेत; पण तुला इंटरव्यू देण्याची अजिबात गरज नाही. कारण तुझ्या कामावर खुश होऊन ज्युलीने तुझे नांव आधीच सुचविले आहे. आजच्या कामाचे हे पाचशे रुपये घे' म्हणत साहेबांनी गोपाळला पाचशे रुपये देऊ केले.
‘साहेब मला पाचशे रुपये नको मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे तो ऑफिस बॉयचा नव्हे तर सेल्स मॅनेजरचा.'
गोपाळच्या बोलण्याने चकित होत साहेबांनी गोपाळच्या कपड्यांकडे एकटक बघितल्याचे त्याच्या लक्षात आले. ‘साहेब मी एका ॲडव्हर्टायजिंग कॅम्पेनसाठी गेलो होतो आणि तिकडूनच मी इकडे आलो इंटरव्ह्यूची अपॉइंटमेंट घेण्यासाठी. तुमच्या त्या ज्युलीने माझी कोणतीही माहिती न घेता मला ऑफिस बॉयच्या कामाला लावले.'
गोपाळला बसायला सांगत साहेबांनी विचारले, ‘गोपाळ तुझे पूर्ण नांव काय?'
‘साहेब माझ्या नांवात तीन थोर देशभक्तांच्या नांवांचा संगम आहे. गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर या तीन थोर देशभक्तांच्या नांवातून माझे नांव गोपाळ गंगाधर सावरकर तयार झाले आहे.'
‘गोपाळ तुझे शिक्षण कुठपर्यंत झाले?' साहेबांनी विचारले.
गोपाळ बोलत असतानाच नेहा म्हणजे साहेबांच्या मुलीचा फोन आला. ‘नेहा बेटी, तुला डान्स क्लासला ॲडमिशन घ्यायला माझी काहीच हरकत नाही. तू आजच ॲडमिशन घे.' म्हणत साहेबांनी फोन ठेवला.
‘गोपाळ अरे प्रश्नांची उत्तरं तू मराठीत देतोस आम्हाला इंग्रजी बोलणारा माणूस हवा आहे,' साहेब म्हणालेत. त्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी, प्रॅाडक्ट मिक्स आणि ॲडव्हरटायजिंग वरील अनेक प्रश्नांची उत्तरे गोपाळने अस्खलित इंग्लिशमध्ये दिली.
‘पण अरे या पोझिशनसाठी आम्हाला एम बी ए झालेला कँडीडेट हवा आहे आणि तू तर बी ए आहेस,' शेखर म्हणाला.
‘साहेब, मीपण एम बी ए आहे. थोड्या वेळापूर्वी मी बोलत असताना नेहा ताईंचा फोन आला आणि त्या तुमच्याशी डान्स क्लासबद्दल बोलत असताना एम बी ए म्हणालो; पण कदाचित तुम्ही मी बी ए असं ऐकलं असेल.'
‘गोपाळ, अरे मी नेहाशी डान्स क्लासविषयी बोलत होतो हे तुला कसं समजलं?'
गोपाळचे नॉलेज, इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व आणि कनव्हिन्स करण्याची सुरेख पद्धत यामुळे शेखर खुश झाला, त्याला असाच कँडिडेट हवा होता.
‘गोपाळ तुझी पगाराची अपेक्षा काय आहे?' शेखरने विचारले.
‘साहेब माझ्या आधीच्या कँडिडेटला तुम्ही २० लाख देणार आहात, मला त्यापेक्षा थोडे जास्त द्या.'
‘गोपाळ, अरे तुला कसं समजलं त्याला आम्ही २० लाख देणार म्हणून?' ही ज्युली पण ना! शेखर मनातल्या मनात म्हणाला. ‘अरे त्या कँडिडेटने एम बी ए जमनालाल बजाज मधून केलं आहे. आम्ही इन्स्टिट्यूटच्या रँकिंग प्रमाणे सॅलरी देतो.'
‘साहेब, प्लीज बघा ना माझ्या इन्स्टिट्यूटचे नांव आहे का तुमच्या लिस्टमध्ये?'
‘सांग तुझ्या इन्स्टिट्यूटचे नांव,' शेखर म्हणाला.
गोपाळने त्याचा मोबाईल फोन काढला.
‘गोपाळ, तुला इन्स्टिट्यूटचे नांव देखील आठवत नाही? त्यासाठी देखील तुला फोन बघावा लागतो,' शेखर वैतागून म्हणाला.
गोपाळने त्याचा फोन शेखरला दिला. स्क्रीनवर दिसणारे सर्टिफिकेट बघून शेखर दचकला. गोपाळ सावरकर, हार्वर्ड बिझीनेस स्कूल. ज्याला मी ऑफिस बॉय समजलो, ज्याला मी पाचशे रुपये देत होतो तो गोपाळ हार्वर्ड बिझीनेस स्कूलचा टॉपर होता. शेखर मनातल्या मनात खजील झाला. शेखरची भाषा बदलली. ‘गोपाळ, तुम्ही पाच मिनिटे बाहेर बसा मी तुम्हाला ऑफर लेटर देतो.'
‘ज्युली ते समीर सानेंचे ऑफर लेटर तयार आहे का?' शेखरने विचारले. ‘लेटर तयार आहे सर. मी प्रिंट घेते आणि तुमच्याकडे सही साठी आणते.' ज्युली म्हणाली.
‘लेटर प्रिंट करू नको त्यात काही करेक्शन्स करायचे आहेत,' शेखर म्हणाला.
‘सॅलरी वीस लाखाऐवजी पंचवीस लाख कर' शेखर म्हणाला.
‘गुड डिसिजन सर! तो मुलगा खूपच इम्प्रेसिव्ह होता, मलाही खूप आवडला,' ज्युली म्हणाली.
‘नांवातही बदल कर,' शेखर म्हणाला.
‘सर, काही स्पेलिंग वगैरे बदलायचे का?'
‘नाही ज्युली, संपूर्ण नांवच बदलायचे. गोपाळ गंगाधर सावरकर असे नांव कर.'
‘सर पण या नांवाचा कोणीही कँडिडेट आज आला नाही, माझ्यासमोरच कँडिडेटची लिस्ट आहे आणि त्याच्यात हे नांव नाही सर.'
‘आता रिसेप्शनमध्ये कोण आहे?'
‘सर तो ऑफिस बॉय गोपाळ, त्याला तुम्ही अजून पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून मोठ्या आशेने बसलाय सर.'
‘ज्युली, तो ऑफिस बॉय नाही. तो आहे आपला नवीन सेल्स मॅनेजर, गोपाळ गंगाधर सावरकर. त्याचं टोपण नांव मी ठेवलंय देशभक्त.'
‘सर, काय टोपण नांव ठेवले म्हणालात तुम्ही? देशभक्त?' ज्युलीने आश्चर्याने विचारले.
गोपाळचे ऑफर लेटर तयार करून साहेबांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी चहाचा कप गोपाळ समोर ठेवत ज्युली म्हणाली, ‘सर चहा घ्या.'
‘मॅम, तुम्ही मला देशभक्त म्हणालात तरी चालेल.'
‘सर साहेबांनी तुमचं नाव देशभक्त ठेवलं हे तुम्हाला कसं समजलं?' ज्युलीने आश्चर्याने विचारले.
देशभक्तच्या सत्काराचा दिवस आला. देशभक्त सरांनी अगदी छोट्या अवधीत सहा कोटींचा बिझीनेस आणला म्हणून आपण आज त्यांचा सत्कार करणार आहोत, ज्युलीने अनाउन्स करताच देशभक्त स्टेजवर पोहोचला.
चेअरमन साहेबांचं प्रोग्रॅममध्ये अजिबात लक्ष नव्हतं, ते शेखरला काही प्रश्न विचारीत होते. गोपाळ पटकन म्हणाला, ‘चेअरमन साहेब शेखर सरांना विचारताहेत की देशभक्त आणि सावरकर एकच का?'
‘गोपाळ हे तुला कसं समजलं? चेअरमन साहेब आणि शेखर सरांनी एकाच वेळी विचारले.'
गोपाळच्या सत्कारानंतर चेअरमन साहेबांनी गोपाळला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून विचारले, ‘गोपाळ इतक्या कमी अवधीत इतका मोठा बिझीनेस तुम्हाला कसा आणता आला?' साहेब, मला लिप रीडिंगची कला अवगत आहे. दूर अंतरावरील दोन व्यक्तींमधे होणारे संभाषण मला त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून समजते आणि मला याचा खूप उपयोग होतो,' गोपाळने रहस्य उलगडले.
‘आय कान्ट बिलीव्ह धिस,' चेअरमन साहेब विस्मयाने म्हणालेत.
‘सर आपण शेखर साहेबांना बोलावून लगेचच हे टेस्ट करू' म्हणत गोपाळने शेखर साहेबांना बोलावले. चेअरमन साहेब आणि शेखर साहेब यांच्यात होणारे बोलणे गोपाळला दिसत होते; पण नक्कीच ऐकू येत नव्हते.
‘चेअरमन साहेब, शेखर साहेब म्हणताहेत गोपाळला फक्त एक लाख इन्सेंटिव्ह द्यावा आणि तुम्ही म्हणताहेत एक लाख इन्सेंटिव्ह आणि एक लाख रुपये पगार वाढ असे दोन्हीही द्यावे.'
कालांतराने सहा वर्षांनी शेखर साहेब रिटायर झाले, गोपाळ जनरल मॅनेजर झाला, ज्युली गोपाळची सेक्रेटरी झाली.
आता जेव्हाही सेल्स मॅनेजरचे इंटरव्ह्यू होतात त्यावेळी गोपाळ चहाचा कप ज्युलीपुढे ठेवत म्हणतो ‘ज्युली त्या दिवशी तुझ्यामुळेच मी जी एमच्या खुर्चीपर्यंत पोहोचलो आणि आता, जी एमच्या खुर्चीवर.' - दिलीप कजगांवकर