एका युगाचा अंत!
क्रिकेटचा किंग, चेस मास्टर, विक्रमवीर, रन मशिन यासारखी अनेक बिरुदावली ज्याच्या नावापुढे लागली आहेत तो भारताचाच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम फलंदाज, भारताचा कोहिनूर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारीत असल्याची घोषणा केली आणि संपूर्ण क्रिकेट विश्व हळहळले. विराटने काढलेल्या शतकांपैकी ९५ टक्के शतके भारताच्या विजयास कारणीभूत ठरली आहेत यावरून त्याच्या शतकांचे मोल लक्षात येते. धावांचा पाठलाग करताना तर त्याने सव्रााधिक शतके झळकावली आहेत हे विशेष.
मागील आठवड्यात रोहित शर्मा या भारताच्या माजी कर्णधारानेही कसोटीतून निवृत्ती स्वीकारली होती.. तेंव्हापासून विराटच्या निवृत्तीची चर्चा होऊ लागली होती मात्र आगामी इंग्लंड दौऱ्यात विराट खोऱ्याने धावा काढेल आणि मगच कसोटीतून निवृत्त होईल अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. मागील दोन वर्षात विराट कोहली कसोटीत अपेक्षित कामगिरी करू शकला नसला तरी आगामी इंग्लंड दौऱ्यात तो चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देईल अशी अपेक्षा असतानाच त्याने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केल्याने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला रामराम केल्याने भारतीय संघाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. कारण रोहित आणि विराट या दोघांनी मिळून मागील चौदा वर्षात भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. भारतीय क्रिकेटचे जय विरू असलेल्या या दोन ज्येष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीचे कसोटी क्रिकेटमधील ‘रोको' युग संपले असे म्हणावे लागेल. निवृत्त कधी होणार आहात?, असे विचारण्याआधीच निवृत्ती घेणे योग्य असते असे उदगार दिग्गज कसोटीपटू विजय मर्चंट यांनी निवृत्तीच्या अनुषंगाने काढले होते. कधी जाणार? असे क्रिकेट चाहत्यांनी विचारण्यापेक्षा का गेलास ? असे विचारणे केंव्हाही चांगले असा विचार करूनच कदाचित या दोघांनी निवृत्ती स्वीकारली असेल. काहीही असो मात्र या दोघांच्या निवृत्तीचे कसोटीतील एका युगाचा अंत झाला असेच म्हणावे लागेल.
क्रिकेट या खेळाने जगाला अनेक महान खेळाडू दिले. सचिन तेंडुलकर हा त्यापैकीच एक महान खेळाडू. क्रिकेटमधील दैदिप्यमान कामगिरीने तो क्रिकेटचा देव बनला. जवळपास दोन तप त्याने क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. भारताला अनेक अविश्वसनीय विजय त्याने मिळवून दिले. २०१३ साली त्याने निवृत्ती स्वीकारली. निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी त्याने विक्रमांचे एव्हरेस्ट गाठले. तो निवृत्त झाल्यावर त्याच्या इतक्या क्षमतेचा खेळाडू पुन्हा भारताला मिळेल का? असाच प्रश्न संपूर्ण क्रिकेट विश्वाला पडला होता. ज्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते. त्या प्रश्नाचे उत्तर खुद्द सचिनकडे होते. सचिनला जेंव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुझा विश्वविक्रम कोणता खेळाडू मोडेल असे तुला वाटते तेंव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले ‘विराट कोहली'. सर्वांना त्यावेळी ही अतिशोक्ती वाटली; पण सचिनने विराटची गुणवत्ता हेरली होती. निवृत्त होण्यापूर्वी चार पाच वर्ष तो आणि विराट एकत्र खेळले होते त्यामुळे विराट कोणत्या क्षमतेचा खेळाडू आहे आणि तो काय करू शकतो हे सचिनला माहीत होते. त्यामुळेच सचिनने आपला वारसदार म्हणून विराटची निवड केली होती. विराटने सचिनचे म्हणणे अवघ्या दहा वर्षात खरे करून दाखवले आणि सचिनचा विश्वास सार्थ ठरविला. आज विराटनेदेखील सचिनप्रमाणे विक्रमांचे इमले चढवले आहेत; इतकेच नाही तर सचिनचे अनेक विक्रम त्याच्या दृष्टिक्षेपात होते. सचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराट लवकरच आपल्या नावे करेल असेच सर्वांना वाटत होते. त्याच्या नावे ८२ शतके आहेत. कसोटीत त्याने ३० शतके झळकावली आहेत. त्यामुळेच त्याच्याकडून ही अपेक्षा व्यक्त केली जात होती. आज तो ३७ वर्षाचा होत आहे. त्याचा फिटनेस जबरदस्त आहे. वीस वर्षाचा खेळाडू देखील त्याच्यासमोर फिका पडेल असा त्याचा फिटनेस आहे. त्यामुळे तो आणखी दोन तीन वर्ष सहज खेळू शकला असता. त्यामुळे त्याने हा विक्रम सहज मोडला असता मात्र त्याने विक्रमांचा विचार केला नाही. सचिननंतर सव्रााधिक शतके विराटच्याच नावावर आहेत. विराट केवळ विक्रमवीर बनला नाही तर तो आज जगातला महान फलंदाज बनला आहे. उत्तम खेळाडू ते महान खेळाडू बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अचंबित करणारा आहे. अवघ्या दहा वर्षात तो आज जगातला महान खेळाडू बनला आहे. त्याने धावांची टांकसाळ उभारली आहे. प्रत्येक सामन्यात तो खोऱ्याने धावा काढत आहे. त्याची बॅट म्हणजे जणू धावांची मशिन, त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होत आहे म्हणूनच आकाश चोप्रा त्याला ‘विराट द रन मशिन कोहली' असे म्हणतो.
विराटने काढलेल्या शतकांपैकी ९५ टक्के शतके भारताच्या विजयास कारणीभूत ठरली आहेत यावरून त्याच्या शतकांचे मोल लक्षात येते. धावांचा पाठलाग करताना तर त्याने सव्रााधिक शतके झळकावली आहेत म्हणूनच त्याला चेस मास्टर असेही म्हंटले जाते. विराटने शतक झळकावले म्हणजे भारत विजयी झाला असेच समीकरण बनले आहे. केवळ शतकच नव्हे, तर त्याच्या अनेक छोट्या मोठ्या खेळी भारताला विजय मिळवून देणाऱ्या ठरल्या. भारताला अनेक अविश्वसनीय विजय त्याने मिळवून दिले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा सामना आठवा. आपण तो सामना केवळ विराटमुळे जिंकू शकलो. हातातून गेलेला सामना त्याने ज्याप्रकारे खेचून आणला ते पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. तशी खेळी फक्त आणि फक्त विराटच खेळू शकतो ती खेळी म्हणजे फक्त एक उदाहरण आहे. तशा प्रकारच्या अनेक खेळी करून त्याने भारताला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. कठीण समय येता विराट कामी येई.... असे उगीच क्रिकेटप्रेमी म्हणत नाहीत. भारतीय कसोटी क्रिकेटचा तर खराखरा राजदूत होता. कसोटीत त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत. इतकेच नाही तर कसोटीत त्याने तब्बल ७ द्विशतके झळकावली आहेत. कसोटीत त्याने एकूण ९,२३० धावा काढल्या आहेत त्यात २५४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश अशा सर्वच देशात त्याने शतके झळकावली आहेत. केवळ फलंदाज म्हणूनच नाही, तर कर्णधार म्हणूनही त्याने देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराटचीच नोंद होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तब्बल ४० कसोटी सामने जिंकले आहेत. कर्णधार म्हणून त्याने ६८ कसोटीत भारताचे नेतृत्व केले. ६८ कसोटीत ४० विजय मिळवणारा विराट कोहली हा कसोटीतील भारताचा सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे. त्याच्या नंतर महेंद्रसिंह धोनीचा नंबर लागतो. कसोटी सामना जिंकण्यासाठी जी जिगर लागते जो संयम लागतो तो त्याच्याकडे होता. त्याची ती जिगर, तो संयम आता पुन्हा दिसणार नाही. पांढऱ्या जर्सी मध्ये तो पुन्हा मैदानात उतरणार नाही याची रुखरुख क्रिकेट चाहत्यांना कायम राहणार आहे असे असले तरी त्याने गेल्या १४ वर्षात भारतीय कसोटी क्रिकेटची जी सेवा केली आहे ती क्रिकेट चाहते कधीही विसरू शकणार नाही. - श्याम ठाणेदार